‘कॉम्प्लान जाहिरातीतील भूत अमिताभना महागात पडणार?’ ही बातमी (लोकसत्ता, ३ मे) वाचून हसावे की रडावे, ते कळेना. अंधश्रद्धेमुळे लोकांच्या होणाऱ्या फसवणुकीला आळा घालणे, या उद्दिष्टाला कोणाचाच आक्षेप असण्याचे कारण नाही. पण त्याचा अतिरेक करून जिथे तिथे आपले महत्त्व सिद्ध करण्याचा प्रयत्न मात्र योग्य नव्हे.
 कॉम्प्लानच्या भुताच्या गोष्टीच्या जाहिरातीवर बंदी आणायची असेल तर हॅरी पॉटरच्या चित्रपटांवरदेखील बंदी आणणार काय? लहान मुलांना अल्लाउद्दीनच्या दिव्याची गोष्ट सांगितल्यास तो गुन्हा ठरणार काय? पौराणिक कथा किंबहुना सर्वच धर्मातील विविध कथांमध्ये चमत्कार असतो, त्यांच्यावरही बंदी आणणार काय?  ख्रिस्ती धर्मात संतपद मिळण्यासाठी ज्या अटी आहेत, त्यांत एक अशी अट आहे की त्या व्यक्तीने किमान दोन चमत्कार केलेले असले पाहिजेत. तसे घडल्याची खात्री झाल्यावरच रोमच्या सर्वोच्च धर्मगुरूंनी मदर तेरेसांना संतपद दिले. अशा प्रकारे जगभर चमत्कारांचे समर्थन करणाऱ्यांचा अंनिस जाहीर निषेध करणार काय?
देवकी देशमुख

अंनिसला स्थानमाहात्म्य  इतके महत्त्वाचे वाटते?
‘दरमहा निषेध, पण रहदारी न रोखता’ हे पत्र (लोकमानस, ६ मे ) वाचले. हत्या झाली तिथे एकत्र जमल्याशिवाय कार्यकर्त्यांना प्रेरणा घेता येत  नसेल   तर  दाभोलकर समजून घेण्यात  ही  मंडळी कमी  पडतात असे मला वाटते . स्थानमाहात्म्य हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीला महत्त्वाचे वाटत असेल तर  त्यांनी अयोध्येला  राम मंदिर बांधण्यास भाजपला पाठिंबा द्यावा. आपली ती  संवेदनशीलता आणि इतरांचा प्रतिगामीपणा ही भूमिका घेऊ नये.
सागर पाटील, कोल्हापूर</strong>

हत्यारी भक्तांची ऐसी..
घडे देश-सेवा!
बीड जिल्ह्यातील आंधळेवाडी राष्ट्रीय पातळीवर झळकले आणि प्रश्न पडला लोकशाहीची खरी व्याख्या कोणती मानायची? अब्राहम िलकनकृत की दादा कोंडकेंनी केलेली व्याख्याच मार्मिक!
आंधळेवाडीत जे घडले त्यात कर्मचाऱ्यांचा कितीसा दोष आहे? समोरची  आलेली देशभक्त मंडळी साधनसामग्रीनिशी येतात. त्यांना हत्याराच्या साह्याने देशसेवा करायची असते. मतदान केंद्रावर पोलीस शिपाई असले, तरी देशसेवकांपेक्षा संख्येने कमीच. शेवटी पोलीसही माणूसच. सर सलामत तो पगडी पचास. मग जे व्हायचे तेच होते. केंद्र ताब्यात घेतले जाते. आपल्या नेत्याशिवाय कोणीच देशसेवा करू शकत नाही यावर भक्तांची निस्सीम श्रद्धा असते. तिथे तुमच्या आमच्या मताला किंमत ती काय.. आणि आपण थोडेच त्यांच्याइतके सच्चे देशप्रेमी आहोत? यात रगडला जातो तो म्हणजे पापभीरू कर्मचारी/ शिक्षक!
काकासाहेब जमदाडे, शेवगाव

यांनी वाल्यालाही वाल्मीकी बनू दिले नसते!
‘लेखक-कलाकार मोदींविरोधात एकवटले’ ही वाराणसीत ४ मे रोजी परिषद होणार असल्याची बातमी १४ एप्रिलच्या ‘लोकसत्ता’त वाचली होती. त्या परिषदेचा आँखो देखा सविस्तर वृत्तांत वाचावयास मिळाला नाही.
समाजशास्त्र, मानसशास्त्र म्हणते संधी द्या, माणूस बदलू शकतो. पण आपले बुद्धिवादी म्हणतात एकदा जो शिक्का त्यांनी मारला आहे तो न पुसण्यासाठी. रामायण महाकाव्य लिहिणारा वाल्मीकी ऋषी अगोदर वाल्या कोळी होता. येणाऱ्या-जाणाऱ्या वाटसरूंना लुटत असे, विरोध झाल्यास ठार मारीत असे. नारदमुनींनी उपदेश केल्याने, वाटमारी सोडून तपस्या करू लागला. त्याचा वाल्मीकी ऋषी व्हायला काही वष्रे लागली. पण तपस्येला सुरुवात केल्यावर पाच-सात वर्षांत, अशा बुद्धिवादी मंडळींनी त्याचा तपोभंग करून त्याला ‘खुनी, वाटमाऱ्या’ म्हणून त्याची र्हुे केली असती तर शक्यता आहे तो कधीच वाल्मीकी ऋषी झाला नसता. कदाचित निराशेतून पुन्हा आपल्या पूर्व आयुष्याकडे वळला असता. या बुद्धिवादी लोकांना मोदी हे वाल्या होण्यातच आनंद आहे की ते सुधारायला निघाले आहेत, त्यासाठी त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत, मदत करायची आहे?
.. याची माहिती, परिषदेचा वृत्तान्त न वाचल्यामुळे अद्याप मिळालेली नाही.
श्रीधर गांगल, ठाणे</strong>

यंदाच्या निकालांनंतरही उपद्रव धूमधडाक्यात?
लोकसभा निवडणुकीचे निकाल १६ मे रोजी जाहीर होतील. हा विजय साजरा करताना फटाक्यांमुळे ध्वनी /हवा प्रदूषण होते हे माहीत असूनही फटाक्यांची आतषबाजी होणार. पाच-पाच मिनिटे वाजणाऱ्या फटाक्यांच्या माळा लावून विजयोत्सव, ‘डीजे’च्या तालावर मिरवणुका काढून साजरा होणारच! सायंकाळनंतर पक्षी आपल्या ‘घरटय़ात’ येतात, ते घाबरून या सर्व प्रकारच्या आवाजामुळे सरभर होतात, आजारी, वृद्ध व्यक्तींनाही त्रास होतो हे सर्व माहीत असूनही कोणीही जाणता लोकसेवक हे थांबवू शकणार नाही.
निदान स्थानिक प्रशासनाने शहरात/गावात भर चौकात/ रस्त्यात/ सार्वजनिक ठिकाणी या गोष्टींचा ‘उपद्रव’ कमीत कमी होईल यासाठी निवेदनवजा आवाहन करावे व विजयोत्सव शांततेत ‘संपन्न’ होईल असे पाहावे. मतदारांनीही आपल्या मतदारसंघातील उमेदवारांस तशी विनंती करावी.
मधुकर घारपुरे, सावंतवाडी

हे नसते, तर?
‘लोकसत्ता’ने ठळकपणे छापलेली ‘अशोक चव्हाण यांना धक्का’  या मथळ्याची बातमी वाचली. ‘सत्तातुराणाम् न भयं न लज्जा’ हेच खरे. नेत्यांची राजकीय धडपड ही पराकोटीची केविलवाणी आहे आणि हे खुद्द त्यांना तसेच त्यांच्या सुजाण निकटवर्तीयांना कळत नाही हे आपले दुर्दैव आहे. लोकशाहीची याहून अधिक विटंबना या देशात यापूर्वी झाली नसेल असे राहून राहून वाटते. हे असेच चालू रहाणार असेल तर निवडणुकांना काहीही अर्थ उरलेला नाही. सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोग नसता तर काय झाले असते याची कल्पनाच करू शकत नाही.
मंगेश नाबर

कायमचे मृत्यूच्या दारात..
‘रुळावर की सुळावर ’ या अग्रलेखात (६ मे) म्हटल्याप्रमाणे रेल्वे प्रशासनाची परिस्थिती तर  दारुण आहेच परंतु या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांची झालेली हेळसांडही तितकीच संतापजनक आहे!  अपघातग्रस्तांपकी एक तृतीयांश प्रवाशांना नागोठण्यापासून थेट  शीवपर्यंत (सुमारे १३० कि.मी.)  कुडबुडय़ा वाहनांद्वारे हलवावे लागावे आणि त्यात काहींचा मृत्यू व्हावा ही बाब खचितच शरमेची आहे. ब्रिटिशांनी मुंबईत उत्तम सरकारी रुग्णालये  स्थापन केली, पण स्वातंत्र्यानंतरच्या  ६६ वर्षांतही आपण अशा रुग्णालयांची साखळी उभारू शकलो नाही.
नागोठण्यापासून इंदापूर, वडखळ, पेण , पनवेल ते नवी मुंबईपर्यंत कुठेही  अपघातग्रस्तांचे तडफडणारे जीव वाचविण्याची सोय नसावी याची खंत न वाटण्याइतके निबर पालकमंत्री नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यांना लाभलेले आहेत.  असे अपघात होतच राहतील आणि सामान्य प्रजेचे प्राण कायमचे मृत्यूच्या दारांत टांगलेले रहातील.
राजीव मुळ्ये,  दादर (मुंबई)

दोषी कोणाला धरायचे?
दिवा- सावंतवाडी गाडीचे डबे भिसे िखडीत घसरून रविवारी झालेल्या भीषण अपघाताचे प्राथमिक कारणही अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रवाशांच्या  म्हणण्यानुसार गाडी अतिवेगात असल्यामुळे हा अपघात झाला तर रेल्वे प्रशासनाच्या म्हणण्यानुसार तेथील  जमीन खचल्यामुळे  अपघात झाला.  म्हणजे या घटनेत गाडीच्या चालकाला  दोषी धरायचे की रेल्वे प्रशासनाला ?  नाही तरी आजकाल कोकण रेल्वेवर  कधी दरड  कोसळली, तर कधी लोहमार्ग खचला, कधी चुकून रेल्वे फाटक उघडे राहिले, अशा एक ना दोन कारणांनी अपघात होतच असतात..  इतका निष्काळजीपणा रेल्वे प्रशासनाकडून  कसा काय घडू शकतो?
 तरी आपल्याकडे स्थानिक रहिवाशांमध्ये माणुसकी शिल्लक आहे..   ते  अनेकांचे प्राण वाचवतात, जखमींना मदत करतात; याबद्दल त्यांचे आभार मानावेत तेवढे  थोडेच आहेत.
– गुरुनाथ व. मराठे, बोरिवली (पूर्व)

Story img Loader