इस्लामी देशांत राज्यकर्त्यांविरोधात दाटलेली नाराजी आणि अमेरिकेने केलेली लादेनची हत्या यांचा संबंध होता. ओसामाचे भूत मतपेटीद्वारे इजिप्शियन जनतेने पुन्हा एकदा जिवंत केले. हे भूत गाडायचे, तर ओबामा यांना इजिप्शियन लष्करास आवरावे लागेल.
सत्तांतर सुलभ व्हावे यासाठी संस्कृती निर्माण करावी लागते. मग ते घर असो वा संस्था वा देश. हे झाले नाही तर काय होते त्याचा रक्तरंजित नमुना पश्चिम आशियाच्या वाळवंटात पाहावयास मिळत असून इजिप्त हे त्याचे ताजे उदाहरण आहे. पश्चिम आशियाच्या वाळवंटातील हा सर्वात मोठा देश. परंतु गेल्या काही महिन्यांतील राजकीय वावटळीमुळे झाकोळला गेला असून त्या काळातील हिंसाचारात ८००पेक्षा अधिकांचे प्राण गेले आहेत. जुलै महिन्यात अध्यक्ष महंमद मोर्सी यांना लष्कराने पदच्युत केल्यापासून या हिंसाचारास सुरुवात झाली. तो अजूनही थांबण्याची चिन्हे नाहीत आणि तो थांबावा अशी लष्करशहांची इच्छा आहे, असेही दिसत नाही. इजिप्तच्या तगडय़ा लष्कराने अध्यक्ष मोर्सी यांना पदावरून दूर केल्याने त्यांचे समर्थक हिंसाचारात गुंतल्याचे सांगितले जाते. ते अर्धसत्य आहे. मोर्सी हे मुस्लीम ब्रदरहुड या पक्षाचे. काही दशकांनंतर इजिप्तमध्ये झालेल्या निवडणुकांत ते अध्यक्षपदी रीतसर निवडून आले. वास्तविक त्यांची अध्यक्षपदी निवड हे अराजकास निमंत्रण असेल असा अंदाज पश्चिम आशियाच्या अनेक अभ्यासकांनी वर्तवला होता. त्यामागील कारण हे की मुदलात ब्रदरहुड ही संघटनाच लोकशाही नीतिनियमांसाठी ओळखली जात नाही. आज अल कईदा वा तालिबान आदी संघटना दहशतवादी म्हणून ओळखल्या जात असल्या तरी ब्रदरहुड हे सर्व या संघटनांचे मूळपीठ आहे, हे लक्षात घ्यावयास हवे. पन्नासच्या दशकात इजिप्त आणि परिसरात हसन अल बन्ना आदींनी या संघटनेची स्थापना केली आणि तिला अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष ड्वाइट आयसेनहॉवर यांचाही आशीर्वाद लाभला. पुढे या परिसरात कम्युनिझमच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी अमेरिकेने आधी ब्रदरहुड आणि मग त्या संघटनेच्या पोटातून आलेल्या अल कईदा आदी संघटनांचा वापर केला. वास्तविक इजिप्तला अरब महासत्ता बनवण्याचे स्वप्न पाहणारे अब्दुल गमाल नासर यांचा या ब्रदरहुडला विरोध होता. परंतु नासर हे सोव्हिएत रशियाच्या कलाने वागत असल्याने अमेरिकेने आणि अमेरिकेच्या तालावर नाचणाऱ्या इंग्लंडने त्यांचा कायमच द्वेष केला आणि त्यांची सत्ता अस्थिरच राहील यासाठी प्रयत्न केले. पुढे ब्रिटनने तर नासर यांचे नाक कापण्यासाठी सुवेझवर हल्ला केला आणि आपलेच हात पोळून घेतले. नंतर नासर गेले आणि सत्तेवर आलेले अन्वर सादात यांची हत्या झाली. त्यामागेही ब्रदरहुडच होती. परंतु त्यानंतर सत्ता ग्रहण करणाऱ्या होस्नी मुबारक यांनी मात्र ब्रदरहुडला कह्य़ात ठेवले आणि जवळपास तीन दशके सत्ता उपभोगली. त्यातून इजिप्तमधे मुबारकशाहीच निर्माण झाली आणि जनतेत त्यांच्या विरोधात असंतोष खदखदू लागला. २०११मधील तथाकथित बदलाच्या वाऱ्यांना इजिप्तमध्येच हवा मिळाली आणि मुबारक यांना सत्तात्याग करावा लागला. इजिप्त क्रांतीसंदर्भात सुखवस्तू आणि बोलघेवडय़ा ट्विटरीयांत बरेच स्वप्नाळू वातावरण होते. तो बावळटपणा होता हे आम्ही त्या वेळीही नमूद केले होते. त्या काळात समस्त इस्लामी देशांत आपापल्या राज्यकर्त्यांविरोधात दाटलेली नाराजी आणि अमेरिकेने पाकिस्तानात घुसून केलेली ओसामा बिन लादेन याची हत्या यांचा थेट संबंध होता हे आपण लक्षात घ्यावयास हवे. समस्त आखातात इस्लामी सत्तेविरोधात जनमताचा रेटा तयार झाला नसता तर ओसामा याची विनासायास हत्या करणे अमेरिकेस शक्य झाले नसते. ओसामासारख्याची हत्या होऊनही एकाही देशात अमेरिकेविरोधात नाराजीचा सूर उमटला नाही यातच या धोरणाचे यश आहे. त्यामुळे ओसामास नामशेष केल्यावर अमेरिकेचा या परिसरातील राजकीय रस संपला आणि ती तथाकथित इजिप्त क्रांतीही वाळवंटी हवेत विरली. परंतु त्यामुळे अनेक देशांत राजकीय अस्थैर्य निर्माण झाले असून त्या जगास आता त्यास तोंड द्यावे लागत आहे.
तेव्हा मोर्सी यांच्या निवडीमुळे ब्रदरहुडला पुन्हा एकदा खतपाणी मिळाले. त्यांच्या कारभारात अर्थातच सर्वसमावेशकता नव्हती आणि धर्माच्या वाढत्या प्रभावामुळे लष्करही अस्वस्थ होते. इजिप्तची लष्करी सत्ता समग्र आखाती देशात सर्वात सामथ्र्यवान म्हणून गणली जाते आणि तुलनेने ती निधर्मीही आहे. ती पोसली जाते अमेरिकेच्या मदतीवर. मोर्सी यांच्या अंदाधुंद कारभारामुळे लष्कर अस्वस्थ झाले असेल तर ते साहजिकच म्हणावयास हवे. तेव्हा मोर्सी यांच्या राजवटीचे काही खरे नाही, हे दिसत होतेच. अखेर लष्कराला हस्तक्षेप करावा लागला आणि मोर्सी यांची सत्ता आटोपती घ्यावी लागली. तेव्हापासून जनतेत मोठय़ा प्रमाणावर क्षोभ निर्माण झाला असून त्याचा गैरफायदा ब्रदरहुडने सोयिस्कररीत्या घेतला आहे. मोर्सी हे काही जनप्रिय नेते नव्हेत. त्यांच्यामागे लाखो समर्थक आहेत वा होते असेही नाही. परंतु त्यांच्या सत्ताच्युतीचे कारण पुढे करीत ब्रदरहुडने आपले बस्तान बसवले असून आताच्या हिंसाचारात त्याच संघटनेचा हात आहे. कोणत्याही आंदोलनाची सुरुवात जरी प्रामाणिकपणे झाली तरी नंतर ते गुंडपुंडांच्या हाती जाते. हा इतिहास आहे आणि इजिप्तमध्ये जे काही सुरू आहे ते याच रक्तलांच्छित इतिहासाचा भाग आहे. त्यात लष्कराने भोंगळपणा दाखवल्यामुळे अधिकच भडका उडाला. मोर्सी यांना पदच्युत करताना पुढील निवडणुकीचे वा लोकशाही प्रक्रियेचे सूतोवाच लष्कराने वेळीच केले असते तर जनक्षोभ इतका उसळता ना.
तसे न केल्यामुळे आपल्याला आता लष्करी अंमलाखालीच राहावे लागणार असा सामान्य इजिप्शियन जनतेचा समज झाला आणि तसे होणे साहजिकच म्हणावयास हवे. आता हे हिंसाचाराचे लोण देशभर पसरले आहे आणि त्याच्या परिणामांना साऱ्या जगास तोंड द्यावे लागणार आहे. याचे कारण असे आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला सुवेझ कालवाही आता अशांत बनला असून अलेक्झांड्रिया या त्या परिसरातील सर्वात मोठय़ा बंदरासदेखील त्याची झळ लागली आहे. जागतिक अर्थव्यवस्था तोळामासा बनलेली असताना इजिप्तमधील ही अशांतता अधिक काळजी वाढवणारी आहे.
अशा परिस्थितीतून बाहेर पडण्याचा एकच मार्ग सध्या तरी दिसतो. तो वॉशिंग्टनमधून जातो. इजिप्तचे लष्करी सामथ्र्य हे अमेरिकेच्या मदतीवर अवलंबून आहे. तेव्हा अमेरिकेस हस्तक्षेप करावाच लागेल. अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा यांचे परराष्ट्र धोरण या संदर्भात मवाळ आहे आणि तेच शहाणपणाचे आहे. परंतु सध्या इजिप्तमध्ये जे काही झाले आहे त्या बाबत बघ्याची भूमिका घेणे अमेरिकेस- आणि त्यामुळे जगास- परवडणारे नाही. याचे कारण असे की तेथे जे काही झाले आहे ते अमेरिकेच्याच धोरणाची परिणती आहे. ओसामा हत्येविरोधात इस्लामी जगतात क्षोभ निर्माण होऊ नये म्हणून अमेरिकेने सर्वच देशांतील अशांततेस खतपाणी घातले वा अशांतता निर्माण होईल असे पाहिले. त्या धोरणाचा दुष्परिणाम असा की इजिप्तमध्ये झालेल्या निवडणुकांत पुन्हा कर्मठ अशा ब्रदरहुडलाच जनतेचा पाठिंबा मिळाला आणि ज्या कारणासाठी ओसामाला अमेरिकेने ठार केले त्या ओसामाचे भूत मतपेटीद्वारे इजिप्शियन जनतेने पुन्हा एकदा जिवंत केले. त्याचमुळे आज आसपासच्या अनेक देशांत ओसामाच्या अल कईदाचे समर्थक नव्याने एकत्र येताना दिसतात. तेव्हा हे भूत गाडायचे असेल तर ओबामा यांना इजिप्शियन लष्करास आवरावेच लागेल. ही आणि अशी भुते राजकीय सोयीसाठी वाढवली की काय होते याची आठवण करून देण्यास वर्ल्ड ट्रेड सेंटरचे कोसळलेले मनोरे पुरेसे आहेत.