हिंदू वसतीस्थानांतून मुसलमानांना हाकलून द्या असा आदेश देणारे तोगाडिया काय किंवा मोदीसमर्थक नसलेल्यांना पाकिस्तानातच जागा आहे असे पक्षाच्या नेत्यांसमोर सांगणारे गिरिराज सिंग काय..  हिंदु संस्कृतीचे हे इतके बोलघेवडे प्रचारक भाजपला किंवा संघ परिवाराला तरी परवडणार आहेत का? मग जिथल्या तिथे त्यांचे कान न उपटता  त्यांच्या वक्तव्यांपासून दूर राहण्याची परिवाराची भूमिका कोठे नेणार आहे?
पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहणारे भारतीय जनता पक्षाचे नरेंद्र मोदी यांच्यासमोर एका वेळी जेमतेम एक घर चालू शकणारी काँग्रेस, तिरके चालणारी समाजवादी यादवी वा अडीच घरांत दुडकणारे आम आदमी आदींपैकी एकाचेही आव्हान नाही. असले तरी ते आव्हान हाताळणे मोदी यांना जड जाणार नाही. परंतु मोदी यांच्यासमोर खरी डोकेदुखी असेल ती गिरिराज सिंग वा प्रवीण तोगडिया अशा नावांनी वावरणारे परिवारातील घटक यांची.
गिरिपर्वतावरून र्निबध गडगडणाऱ्या एखाद्या दगडधोंडय़ाप्रमाणे हे गिरिराज सिंग बरळले आणि मोदी यांना विरोध करणाऱ्यांनी पाकिस्तानात जावे असा फतवा काढून बसले. हे गिरिराज बिहारचे. नवादा मतदारसंघातून यंदाची लोकसभा निवडणूक ते लढवीत असून मोदी लाटेवर स्वार होऊन हा संन्यासी वस्त्रातील राजकारणी संसद सदस्य बनण्याचे स्वप्न पाहात आहे. त्यांनी हे तारे जेव्हा तोडले तेव्हा त्यांच्यासमवेत भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी हेदेखील होते. परंतु या गिरिराजाचे कान तिथल्या तिथे उपटावेत असे गडकरी यांना सुचले नाही वा सुचले असेल तरी जमले नाही. भारत हा फक्त मोदी समर्थकांचा प्रांत आहे, असे त्यांचे म्हणणे असून ज्यांना कोणाला भावी पंतप्रधानास विरोध करावयाचा असेल त्याने पाकिस्तान गाठलेलाच बरा, अशी त्यांची मसलत. गिरिराज यांची राजकीय समज कितपत ते मोजण्याचा मापदंड उपलब्ध नाही. परंतु ती मोजण्याच्या किमान पातळीपर्यंतदेखील असणार नाही, असे मानावयास हरकत नाही. याचे साधे कारण असे की मोदी विरोधकांनी पाकिस्तानात जावे अशी त्यांची प्रामाणिक इच्छा जर खरोखरच अमलात आणावयाचे ठरले तर साधारण पंचवीस टक्के भाजप रिकामा होईल याची त्यांना जाण नसावी. खेरीज, लालकृष्ण अडवाणी वा काही प्रमाणात सुषमा स्वराज किंवा गेलाबाजार जसवंत सिंग यांचे काय करणार हादेखील प्रश्नच आहे. हा सर्व नेतागण हा मोदी समर्थक आहे, असे या गिरिराज सिंग यांना वाटते की काय? या सद्गृहस्थांच्या नावात गिरिराज आहे. याचा अर्थ ते स्वत:स गिरिपर्वताचे राजे म्हणवतात. त्यांच्या नावातील हा पर्वत लोकशाहीतील नसावा. कारण तसा तो असता तर मतभेद असणाऱ्याशीदेखील जुळवून घ्यावे लागते हे लोकशाहीचे तत्त्व आहे, हे त्यांना समजले असते. या गिरिराजाने संतवाङ्मयाचे परिशीलनदेखील केले नसावे. निंदकाचे घर असावे शेजारी असे म्हणणारा महाराष्ट्रातील संत तुकाराम त्यांना ठाऊक नसावा. अर्थात या गिरिराजास संत तुकाराम माहीत नसणे हे तुकारामाच्या मोठेपणाचे लक्षण मानावयास हवे. तसा तो असता आणि या तुकारामाने नवनरेंद्रगाथा गाण्यास अनुमती दिली नसती तर या गिरिराजाने तुकारामाची पाठवणीदेखील पाकिस्तानात करावी असा फतवा काढण्यास मागेपुढे पाहिले नसते. या गिरिराजाने आपल्या वाक्चातुर्याने एका दगडात कायद्याचे दोन पक्षी मारलेले दिसतात. याच भाषणासाठी त्यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो आहे बिहार प्राणी संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याचा. जी मंडळी गोमांसाची निर्यात करतात त्यांना केंद्र सरकार अनुदान देते आणि जे येथे राहून गोपालन करतात त्यांच्यावर मात्र करवाढीने अन्याय करते, असाही युक्तिवाद या गिरिराजाने केला आहे. हे गिरिराज कडवे हिंदुत्ववादी असल्याने गोपालन हा त्यांच्या राजकीय कार्यक्रमाचा भाग असणार हे उघड आहे. हिंदुत्ववादी असूनही या गिरिराजाच्या बौद्धिक परिघाच्या जवळपासदेखील सावरकर आले असण्याची शक्यता नाही. त्यामुळे गाय ही माता, ३३ कोटी देवांचे वसतिस्थान वगैरे काहीही नाही, ती फार फार तर उपयुक्त पशू आहे, हा सावरकरांचा युक्तिवाद त्यांच्या तोळामासा विचारव्यवस्थेस झेपणारा नाही. तेव्हा अशा एकाच ठिकाणी भाषण करून दोन दोन गुन्हे दाखल करून घेण्याचे पुण्य या गिरिराजाने आपल्या पदरी जोडले आहे. त्या पुण्यतीर्थाचा लक्षणीय वाटा असा पुण्यवान उमेदवार दिल्याबद्दल भाजपच्या कमंडलूतही पडण्यास हरकत नसावी.
त्यांना प्रवीण तोगडिया या ज्येष्ठ हिंदुबंधूने साथ दिली असून या दोघांच्या पुण्याईच्या तेजाने समस्त परिवाराचे डोळे दिपून काही काळ त्यांना डोळ्यांवर गंगाजलाचा अभिषेक करावा लागेल, हे नि:संशय. हिंदू वसतिस्थानांतून मुसलमानांना हाकलून द्या असा आदेश या तोगडियाने दिला आहे. असे काही बरळण्यातील त्यांचे कौशल्य लक्षात घेता त्यांचे नामकरण तोगडियाऐवजी तोडदिया असेच करावयास हवे. भावनगर येथील एक घर मुसलमानाने विकत घेतल्याने हे तोडगिरिराज यांची राजकीय समज कितपत ते मोजण्याचा मापदंड उपलब्ध नाही.दिया संतप्त झाले आणि आपल्यासमवेत असलेल्या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातील कनिष्ठ तोडदियांना त्यांनी या मुसलमान कुटुंबास हाकलून लावण्याचा आदेश दिला. या तोडदिया यांचे म्हणणे असे की हिंदू इलाक्यातील संपत्ती अल्पसंख्याकांना विकण्यास बंदी घालण्यात यावी आणि विद्यमान करार रद्द समजला जावा. तसा तो रद्द झाला नाही तर पुढील कारवाईसाठी तोडदिया यांनी सरकारला ४८ तासांची मुदत दिली आहे. या काळात सदर मुसलमान कुटुंबाने जागा सोडून देऊन स्थलांतर केले नाही तर बजरंग दल आणि विहिंपचे कार्यकर्ते या घरावर हल्ला करतील. या हल्ल्यासाठी साधनसंपत्ती काय असावी याबाबतही तोडदिया यांनी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून दगड, काठय़ालाठय़ा, सडके टोमॅटो या अस्त्रांचा पुरेसा साठा घेऊन तेथे येण्यास कार्यकर्त्यांना फर्मावले आहे. ही अशी संपत्ती अल्पसंख्याकांना अजिबात विकली जाऊ नये म्हणून राम दरबार भरवण्याचा तोडदिया यांचा मानस आहे. अशा प्रकारच्या दरबारांत हिंदूंकडून मुसलमानांना झालेल्या संपत्ती विक्री व्यवहाराला स्थगिती देण्यात येईल. हे सगळे दामटून करता येईल याचा विश्वास त्यांना आहे. कारण आपल्या देशात राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना अद्याप फासावर लटकावण्यात आलेले नाही, तेव्हा घरांवर हल्ला केलाच आणि पोलिसांनी पकडले तर त्या लहानशा पापाला फारशी काही शिक्षा होणार नाही, असा त्यांचा अनुभवाधारित निष्कर्ष आहे.
खरे तर हिंदू संस्कृतीचे हे इतके बोलघेवडे प्रचारक समस्त परिवाराने सत्कार करावा या योग्यतेचे आहेत. परंतु येथे झाले उलटेच. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि ज्येष्ठ भाजप नेते अशा दोघांनी या दोघांचा निषेध केला असून संघाने तर या दोघांना चार हात दूर ठेवणेच पसंत केले आहे. हा या दोघांवरही अन्याय आहे. या आणि अशा मुक्त विचारी मंडळींना खरे तर परिवाराने उत्तेजन द्यावयास हवे. त्यांच्या तेज:पुंज विचारप्रकाशामुळे जनतेच्या मनातील अज्ञानाचा अंधार दूर होण्यास निश्चितच मदत होईल. २००२ साली गोध्राकांड आणि नंतर तेथील दंगलीत जे काही घडले त्यामुळे सहन कराव्या लागलेल्या राजकीय विजनवासापासून दूर जाण्याचा प्रयत्न मोदी करीत असताना हे असले गिरिराज आणि तोडदिया त्यांना पुन्हा तेथे नेताना दिसतात. त्यांच्या या ‘कर्तबगारीस’ दस्तुरखुद्द नरेंद्र मोदी हेदेखील गिरिराज.. तोडदिया.. असे म्हणून दाद देतील.

Story img Loader