विवेक दर्पण आयनां दाऊ। वैराग्य चिमटा हालऊं।। संत सेना महाराज यांच्या अभंगातला हा चरण बुवांनी पुन्हा म्हटला..
ज्ञानेंद्र – विवेक दर्पण.. फार छान रूपक आहे हे.. आरसा जसं आहे तसं रूप दाखवतो, तसं विवेकाच्या निकषावर आपली प्रत्येक कृती तपासली तर ती योग्य की अयोग्य हे स्पष्टपणे स्वत:ला कळेल..
हृदयेंद्र – या रूपकातून आणखी एक छटा जाणवते..
बुवा – (कौतुकमिश्रित स्वरांत) कोणती?
हृदयेंद्र – आरसा खरं रूप दाखवतो, पण मी माझ्याच प्रेमात असल्यानं त्या ‘मी’च्या भिंगातूनच ते रूप न्याहाळतो आणि माझा मीच मला सर्वोत्तम भासतो! तसं विवेक सत्य काय नि असत्य काय, हे स्पष्ट सांगतो, पण ‘मी’च्या भ्रमांधळ्या दृष्टीमुळे मी मला पटतं, भावतं तेच खरं, तेच सयुक्तिक, तेच योग्य मानू शकतो! म्हणजेच आरसा सत्यच प्रतिबिंबित करीत असला तरी मी माझ्या मनोदृष्टीप्रमाणे त्याकडे पाहातो आणि त्यातलं मला हवं तेच पाहातो!
बुवा – व्वा! हे ही खरंच आहे, पण तरीही एक सांगू का? प्रत्येकाला काय योग्य, काय अयोग्य हे कळत असतंच. आपण वागतोय ते चूक की बरोबर, हे कळत असतंच. जो साधनापथावर आहे, त्याला ते तीव्रपणे कळतं. प्रश्न आहे तो कळलेलं वर्तणुकीकडे वळण्याचा! त्यासाठी वैराग्याचा अभ्यास पाहिजे.. म्हणून सेना महाराज चिमटय़ाचं रूपक वापरतात!
योगेंद्र – नाना, हा चिमटा नेमका काय असतो हो? आणि काय काम करतो?
नाना – आजकाल सर्व यांत्रिक गोष्टी आल्यात आणि ते चांगलंही आहे म्हणा.. रोज नवनवी उपकरणं येत आहेत त्यामुळे तो जुना चिमटा आज माहीतही नसेल.. पण थांबा कागदावर काढून दाखवतो.. (नानांनी काढलेल्या रेखाकृतीकडे सर्वजण उत्सुकतेनं पाहातात) हं.. हा पहा साधारण असा असतो चिमटा..
योगेंद्र – याचं काय काम?
नाना – केसांचं लेव्हलिंग म्हणा.. हा असतो धारदार त्यामुळे अगदी सफाईनं, नाजूकपणे पण वेगानं तो चालवला जातो.. आता ही कमळाच्या आकारासारखी पाती दिसायला एकच दिसतात, ती दोन असतात.. खाली वळलेले हे आकडे दिसतात ना ते दाबले की ही पाती सरमिसळ होत जास्तीचे केस कापून टाकतात..
हृदयेंद्र – ओहो.. आता लक्षात येतंय.. केस कुठे कमीजास्त आहेत, हे आरशातनं कळतं आणि त्यांना नीट आकार देण्यासाठी हा चिमटा वापरला जातो.. तसं विवेकाचा आरसा दाखवतो की माझी जगाकडची ओढ कुठे आहे, कशी आहे.. ती तोडण्यासाठी वैराग्याचा चिमटा कामी येतो.. अर्थात वैराग्याच्या अभ्यासाशिवाय जगाच्या ओढीला मुरड घालणं शक्य नाही..
बुवा – तर म्हणून सेनामहाराज काय म्हणतात? ‘मी’पणाची बारीक हजामत करायची ना? तर मग विवेकाच्या आरशात पहावं लागेल आणि वैराग्याच्या चिमटय़ानं हा ‘मी’पणा पोसणारी जी ओढ आहे, जी आसक्ती आहे ती सफाईनं, अलगदपणे कापत रहावी लागेल.. मग उदक शांती डोई चोळूं। अहंकाराची शेंडी पिळूं।। आता उदक शांती डोई चोळूं, म्हणजे शांतरसाचं उदक म्हणजे पाणी डोक्याला चोळू, हा अर्थ आहेच. आणखी एक अर्थ जाणवतो पहा.. मंगल प्रसंगी किंवा गृहप्रवेशाच्या वेळी उदक शांती हा एक महत्त्वाचा विधी असतो पहा.. तो कशासाठी असतो? तर घरात शांतता नांदावी, सौख्य नांदावे, भरभराट व्हावी यासाठी.. (डोक्यापासून खालवर उजव्या हाताची बोटं नेत अर्थात देहाकडे लक्ष वेधत..) आता हेदेखील घरच आहे ना? हा देह साधनेसाठी साह्य़भूत ठरणार आहे, तेव्हा या घराचीही उदक शांती हवीच!
हृदयेंद्र – व्वा! अगदी खरं आहे..
बुवा – तेव्हा विवेकानं योग्य काय, अयोग्य काय कळलं. वैराग्याच्या अभ्यासानं ते साधण्याचा प्रयत्नही सुरू झाला.. पण म्हणून अंतर्मन.. हे घर शांत, आनंदी, संपन्नतेच्या अनुभूतीतच गढेल, याची खात्री नाही! कदाचित त्या वैराग्यानं खळबळ आणि अशांती वाढेलही! त्यासाठी उदक शांती हवीच!!
चैतन्य प्रेम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा