धर्माधिष्ठित नीतिमूल्यांच्या पलीकडेही मानवी नीतिमूल्ये असतात हे जाणणारा आणि त्यानुसार वागणारा समाज, हे एक स्वप्न आहे. ते पूर्ण करण्यासाठी समाजच समर्थ असायला हवा, कुणा चळवळीची गरजच लागू नये.. तरीही अंनिससारखी चळवळ २५ वर्षे टिकते तेव्हा ती टिकली कशी आणि तिचा परिणाम काय झाला, याकडे पाहायला हवे..
ही मोठीच मौज म्हणायची. विसंगतीजनक मौज. म्हणजे या उभ्या-आडव्या, साधुसंतांच्या, विचारवंतांच्या, पंडितांच्या आणि सुधारकांच्या महा-राष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन समिती नावाची चळवळ चालते. आपले थोर थोर नेतेगण ज्याचा शाहू-फुले-आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र असा उठता-बसता गौरव करतात त्या या राज्यात ही चळवळ मूळ धरते. आम्ही अंधश्रद्ध आहोत असे जेथील एक व्यक्तीही मान्य करणार नाही, अशा राज्यात ती फोफावते. ही मौज म्हणायची तर गेली २५ वर्षे ती सुरू आहे. या चळवळीचा प्रारंभ नागपुरातला. नव्वदच्या दशकात तेथील काही समविचारी तरुणांनी एकत्र येऊन मानवीय नास्तिक मंच नावाची संघटना उभारली. अंधश्रद्धाविरोधी काम सुरू केले. पण पुढे नावातील नास्तिक हा शब्द त्यांना खटकू लागला. तेव्हा संघटनेचे अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) असे नामांतर करण्यात आले. ही १९८९ ची गोष्ट. त्याला आज २५ वर्षे पूर्ण होत आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर हे या चळवळीचे आधारवड. त्यांच्या हत्येला आणखी दहा दिवसांनी एक वर्ष पूर्ण होईल आणि आमच्या पोलीस खात्याचे नाकर्तेपण असे की, अद्याप त्यांच्या खुनाचे सूत्रधार पकडले गेले नाहीत. या संतापजनक गोष्टीच्या पाश्र्वभूमीवर आज या चळवळीचा रौप्य महोत्सव आहे. म्हटले तर ही काही फार अभिमानाने मिरवण्यासारखी बाब नाही. समाजात सुधारकांची संख्या जास्त असणे ही काही कौतुकाची गोष्ट नसते. त्यांची संख्या जास्त याचा अर्थ त्या समाजात अजून बऱ्याच सुधारणा बाकी आहेत असा होतो. तेव्हा राज्यात अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम २५ वर्षे अविरत आणि जोमाने सुरू आहे हे त्या चळवळीतील कार्यकर्त्यांच्या जिद्दीचे प्रतीक मानले तरी एक समाज म्हणून आपल्यासाठी ती लाजिरवाणीच गोष्ट. पण कितीही लाज वगैरे वाटत असली, तरी हे मान्यच करायला हवे की समाजाला गरज आहे, म्हणूनच ही चळवळ टिकलेली आहे. तशी गरज नसती, तर ही चळवळ केव्हाच इतिहासजमा झाली असती. पण आजमितीला अडचण ही आहे की अनेकांना ही गरज असल्याचेच मान्य नाही. आणि असे म्हणणारांचा आवाज आज भलताच उंचावलेला आहे. अंनिससमोर खरे आव्हान आहे ते या कर्णकर्कश आवाजाचे. तसा हा आवाज सर्वच काळात होता. चक्रधरांनी जातिभेदापलीकडचे अध्यात्म मांडण्यास सुरुवात केली तेव्हाही तो होता. तुकारामांनी वेदप्रामाण्यापलीकडे जाऊन वाळवंटी ठायी भेदाभेद भ्रम अमंगळ अशी हाळी दिली तेव्हाही तो होता. आगरकरांची जिवंतपणी प्रेतयात्रा काढली गेली होती आणि जोतिबांना अगदी कालपरवाच फुले नावाची दरुगधी म्हणून हिणविण्यात आले होते. या सगळ्यात एक धागा समान आहे. वर्षांनुवर्षे रुजलेल्या धार्मिक परंपरांचा. त्यांना हात लावू पाहाल तर तुमची गय नाही. तुमची गाथा मग इंद्रायणीत बुडवलीच म्हणून समजा. सगळ्याच सुधारकांना हे भोगावे लागले आहे. पण त्यांनी सांडलेल्या रक्तातूनच समाजाची पावले सुधारणांच्या पायऱ्यांवर पडलेली आहेत.
अंनिसच्या कार्याला धर्मद्रोही म्हणून लेबले लावणे सोपे आहे. तसे ते लावलेही जाते. मुळात दहीहंडी वा गणेश उत्सव वा मंदिर-मशिदी यांतून होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाविरोधात कोणी आवाज उठवला तरी त्याला सनातन धर्माचा मारेकरी म्हणून दूषण लावले जाण्याचा हा काळ. अशा काळात अंनिससारख्या धार्मिक अंधश्रद्धांविरोधात लढणाऱ्या संघटनेला सुळी दिले जाते ही काही आश्चर्याची बाब नाही. आश्चर्य याचेच की, या अंधश्रद्धा मानवी नीतिमूल्यांना घातक आहेत याची जाणीव असूनही श्रद्धा म्हणून त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न सातत्याने एका वर्गाकडून केला जातो. तसे नसते, तर जादूटोणाविरोधी कायद्याला या महाराष्ट्रात एवढा विरोध झाला नसता. हा कायदा केवळ हिंदू धर्माच्या विरोधी आहे, असा अपप्रचार मोठय़ा प्रमाणावर गेला. त्यात तथ्य नाही हे पुराव्यानिशी पटवून देताना डॉ. दाभोलकरांना रक्त आटवावे लागले. पण एकदा डोळ्यांवर पट्टी बांधली की सूर्यप्रकाशातही अमावास्येचा अंधारच दिसतो. दाभोलकरांची हत्या झाली म्हणून, त्यातून निर्माण झालेल्या संतापाला घाबरून सरकारने हा कायदा मंजूर केला. अन्यथा या कायद्याचे ‘भविष्य’ फार काही चांगले नव्हते. धर्म आणि त्यापाठोपाठ येणारी विविध कर्मकांडे, त्यातील श्रद्धा आणि समजुती हे या ना त्या प्रकारे ज्यांच्या सामाजिक व राजकीय उपजीविकेचे साधन अशा लोकांचा या कायद्यालाच काय, अंनिसच्या अस्तित्वालाही विरोध आहे. यात सगळ्याच धर्मातील मरतडांचा समावेश होतो. पण तरीही ही संघटना केवळ हिंदूू धर्माच्या विरोधातच काम करते असा अपसमज जाणीवपूर्वक करून देण्यात आला आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. अंनिसने अंधश्रद्धांविरोधातील लढाईत कधीही धार्मिक पक्षपात केलेला नाही आणि एकाच धर्मातील अंधश्रद्धांशी लढण्यात प्रमाणाबाहेर अथवा व्यस्त प्रमाणात महत्त्व दिले, असेही कधी झालेले नाही. याचे कारण ही संघटना कार्य करते त्या समाजातच हिंदूंचे प्राबल्य आहे. येथील ८० टक्के लोक हिंदू आहेत. त्यांच्यातील अंधश्रद्धांविरोधात लढणारे लोकही प्रामुख्याने हिंदूच आहेत. तेव्हा केवळ हिंदूूंमधील अंधश्रद्धाच तुम्हाला दिसतात का, असा सवाल करण्यात अर्थ नसतो. असा प्रश्न विचारणे म्हणजे, तुम्ही स्वत:च्या घरातील कचरा का साफ करता? आधी शेजाऱ्यांच्या घरात सफाई करा असे म्हणण्यासारखे आहे. पण हे समजून न घेता देवा-धर्माच्या, श्रद्धा-भावनांच्या नावाखाली अंनिसला ठोकत बसले की आपली दुकाने चालविणे सोपे, असा हा सगळा व्यवहार असतो. अशा अडचणींचा मुकाबला करीत, पाण्यात राहून माशांशी वैर करीत ही संघटना गेली २५ वर्षे कार्य करीत आहे.
अंनिसने या २५ वर्षांत अनेक कार्यक्रम, अनेक मोहिमा हाती घेतल्या. त्यातील काही कार्यक्रम सनसनाटी निर्माण करणारे होते हे खरे. पण बुद्धिप्रामाण्य, विवेकनिष्ठा यांची जपणूक हाच या सर्व कार्यक्रमांचा हेतू होता. त्यात किती यश आले हा वादाचा मुद्दा. तसेही सुधारणांच्या चळवळींना असे पी हळद हो गोरी पद्धतीने यश मिळत नसते. मात्र या कार्यक्रमांनी खासकरून तरुण वर्गाला वैचारिक बळ दिले हे नक्की. मंदिरांच्या दारात वा मशिदींच्या प्रांगणात दिसणाऱ्या गोंगाटी गर्दीच्या तुलनेत असा वर्ग कमी असेल, पण जो आहे तो निश्चितच आपल्या जगण्याचा भार अन्य कोणत्याही अलौकिक शक्तींच्या खांद्यांवर टाकणारा नाही. धर्माधिष्ठित नीतिमूल्यांच्या पलीकडेही मानवी नीतिमूल्ये असतात हे जाणणारा आणि त्यानुसार वागणारा आहे. अशा नीतिमान लोकांची बहुसंख्या असणारा सुदृढ समाज हे किती सुंदर स्वप्न. अशा स्वप्नवत समाजात अंनिससारख्या संस्थांची काही आवश्यकताच नसेल. त्या चळवळींना रिटायरच व्हावे लागेल. खरे तर अंनिसचीही तीच इच्छा असेल. मात्र त्यासाठी समाजाला विवेकाचा आवाज तेवढा बुलंद करावा लागेल.