आंतरराष्ट्रीय संबंधांचा पसारा आणि गुंता वाढलेला असताना, एखाद्या देशाच्या सरकारने कुणा गटाला अतिरेकी ठरवावे आणि बाकीच्या सर्व देशांनी तो त्या देशाच्या सरकारचा अंतर्गत मामला मानून गप्प राहावे, असे होत नाही. होऊ शकत नाही. आपलेच उदाहरण घ्यायचे तर, भूतकाळात आपण खलिस्तानवादी अतिरेक्यांचा बंदोबस्त करत होतो तेव्हा कॅनडा आदी देशांना हे अतिरेकी आहेत हे कबूल नव्हते. काश्मिरातील दहशतवाद्यांना अतिरेकी मानताच येणार नाही हे पाकिस्तानी सरकारचे मत तर आजही जगजाहीरच आहे आणि आपण नक्षलवाद्यांना अतिरेकीच ठरवले तरी चीनसारख्या देशांना ते मान्य नसेल, हेही उघड आहे. तरीही प्रत्येक देश आपापल्या मते अतिरेकी कोण हे ठरवत असतो, त्यापैकी अनेक गट आधी अमेरिकेतर्फे प्रसृत होणाऱ्या जगभरातील पुंड-गटांच्या यादीत आणि मग संयुक्त राष्ट्रांच्याही यादीत स्थान मिळवून ‘निर्विवाद अतिरेकी’ ठरत असतात. या गोष्टी लक्षात घेतल्यास, सौदी अरेबियातील ‘अतिरेक्यां’च्या यादीवर जगाने नाराज का असावे, हे समजून घेता येईल. सौदी अरेबियाने त्या देशातील नास्तिक हेदेखील ‘अतिरेकी’ ठरवणारा कायदा गेल्या महिन्यात- ६ मार्च रोजी अमलात आणला, त्यावर नापसंती व्यक्त करणाऱ्या बातम्या गेल्या दोन दिवसांतच वृत्तपत्रांतून आल्या आहेत.  वास्तविक, याच कायद्याखाली मानवी हक्क पायदळी तुडवण्याचा परवाना सौदीने कसा घेतला आहे, असा इशारा देणारे पत्रक ‘ह्यूमन राइट्स वॉच’ या आंतरराष्ट्रीय संघटनेने २० मार्च रोजीच काढले होते. मात्र अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी गेल्या शनिवारीच सौदीस भेट देऊन तेथील राजाशी चर्चा केली, तेव्हा मानवी हक्कांचा विषयच न काढता उभय देशांतील तेलमैत्रीचे संबंध सुधारण्यावर भर दिला. त्यानंतर प्रामुख्याने इस्रायली (आणि अरबद्वेष्टय़ा) प्रसारमाध्यमांनी हा प्रश्न लावून धरल्याने तो जगापुढे आला. सौदी अरेबियाचे राजे आणि त्यांच्या आप्त-इष्टांचे मंत्रिमंडळ यांनी ‘दहशतवादविरोधी कायद्या’त मार्चच्या पहिल्या आठवडय़ाअखेर दुरुस्ती करून, पहिल्याच कलमाद्वारे ‘नास्तिकवादाचा फैलाव करू पाहणाऱ्यांना अतिरेकी समजून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल’ असे जाहीर केले. राज्य कसे चालवावे आणि लोकांनी कसे वागावे याचे सारे नियम वहाबी इस्लामच्या दावणीला बांधणारा सौदी अरेबिया हा देश. त्यातूनच, महिलांनी वाहने चालवूच नयेत, वगैरे निर्बुद्ध कायदेकानू तेथे अमलात आहेत. त्या निर्बुद्धनीतीच्या मालिकेतील हे आणखी एक कलम, म्हणून जगाने त्याकडे दुर्लक्षच केले असते. पण सौदी अरेबियातील तरुण सुशिक्षितांना या इस्लामी चिरेबंदीचा इतका वीट आला आहे की, तेथे आता या नियमांऐवजी इस्लामचा -धर्माचाच- तिटकारा मूळ धरू लागला आहे. २००८ पासून अनेक सौदी तरुण हे इस्लामी कायदेकानूंची केवळ खिल्ली उडवली म्हणून कैदेत आहेत, ‘सौदी अरेबियन लिबरल्स’ ही वेबसाइट बंदच पाडून तिचा संपादक रईफ बदावी याला चाबकाच्या फटक्यांची आणि सात वर्षांच्या कैदेची शिक्षा झाली, त्याला या नव्या कायद्यामुळे तर फाशीसुद्धा होऊ शकेल.  काफर (बिगरमुस्लीम) आणि मुलहिद (नास्तिक किंवा मूळचे मुसलमान असूनही धर्म न पाळणारे) यांत इस्लाम फरक करतो, त्यापैकी मुलहिदांवर पहिली कुऱ्हाड चालली तेव्हा अमेरिकेसारखा देशही गप्प बसला. नास्तिकांना अतिरेकी आणि पर्यायाने देशद्रोही ठरवणारे कायदे करणे हा एकतर आस्तिकतेचा अतिरेक आहे किंवा निर्बुद्ध राजेशाही टिकवून धरण्यासाठी केलेली धूळफेक आहे, हे सौदी अरेबियाला सांगण्याची संधी जगदेखील घालवणार, अशी चिन्हे त्यातून दिसली. ही डोळेझाक सौदी तरुणांचे जीव घेणारी ठरेल.