सगुणभक्ती करावी आणि भक्तीने नाम घ्यावे! उपासनेच्या क्रमाचा हा पूर्वार्ध आहे. सगुण म्हणजे सरूप. आपल्या नित्याच्या जीवनातही नाम आणि रूप हे अभिन्नच असतं. एखाद्याचं नाव घेताच त्याचं रूपही आपल्या मनात येतं आणि एखाद्या परिचयाच्या व्यक्तीचं रूप डोळ्यासमोर येताच त्याचं नावही मनात येतंच. उलट सगुण रूप सदोदित टिकेल असं नाही, त्या व्यक्तीचं नाव मनात कायमचं राहू शकतं. त्यामुळे मूर्तीच्या निमित्तानं, प्रतीकाच्या निमित्तानं ज्याची भक्ती केली जात आहे त्याचं नामही घ्यायला श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात. श्रीसमर्थ रामदास म्हणतात, ‘प्रभाते मनी राम चिंतीत जावा। पुढे वैखरी राम आधी वदावा।’ प्रभात म्हणजे साधनेची पहाट. साधकावस्थेच्या प्रारंभी मनात रामाच्या रूपाचं चिंतन करावं, रामाच्या नामाचं चिंतन करावं. मग डोळ्यापुढे जे ‘वैखरी’ म्हणजे व्यक्त जग आहे त्याचा ‘आधी’ म्हणजे पाया हा परमात्माच आहे, हे जाणून त्यानुसार आचरण करावं. तेव्हा सगुणाची भक्ती आणि त्याचं नाम जे घ्यायचं आहे त्या उपासनेची पूर्ती आपलं समस्त जीवन आणि आपल्या जीवनातील घडामोडींचा ‘आधी’ म्हणजे आधार भगवंतच आहे, हे जाणण्यातच आहे. थोडक्यात माझी उपासना, माझी भक्ती आणि माझं जगणं यात एकरूपता आली पाहिजे. ती एकरूपता जोवर येत नाही तोवर समरसता येणार नाही. ती एकरूपता येत नाही तोवर आचार, विचार आणि उच्चार यात एकवाक्यता येणार नाही. ती एकरूपता येत नाही तोवर ‘मी’ या एकाचा अंत होणार नाही. तो होत नाही तोवर खरा एकांत कधीच लाभणार नाही. जगणं आणि भक्ती यात एकरूपता नसेल तर ‘जगाकडून मला काहीही अपेक्षा नाहीत, दाता एक रामच आहे’, हे ज्ञान निव्वळ शाब्दिक ठरेल. खरी निर्भयता, खरी निश्िंचती, खरी नि:शंकता जगण्यात येणार नाही. तेव्हा सगुणाची भक्ती आणि त्याचं नाम जे घ्यायचं आहे त्याचा हेतू ‘मी’ आणि ‘माझे’च्या अशाश्वत सगुण-गुंत्यातून सुटणं आणि नश्वर अशा ‘मी’च्या नावलौकिकाच्या ओढीत अडकण्यापेक्षा शाश्वत परमात्म्याच्या नामात रमणं, हाच आहे. उपासनेच्या या विकासासाठी प्रत्येक धर्माने, पंथाने सगुणाची प्रतीकं निर्माण केली आहेत. मग ती प्रतीकं मूर्ती असो, समाधी असो, दिव्यनामाचं चिन्ह वा अक्षररूप असो किंवा एखादा शिलाखंड असो. प्रतीक काहीही असलं तरी दिव्यत्वापर्यंत पोहोचण्यासाठीच ते उत्पन्न झालं आहे. त्या प्रतीकाच्या दर्शनानं त्या परमात्म्याचं स्मरण व्हावं, त्याचं नाम मनात यावं, हाच हेतू आहे. जेव्हा मन एका सगुण रूपाशी केंद्रित होईल तेव्हा श्रीमहाराज उपासनेच्या क्रमाचा जो उत्तरार्ध सांगतात तिकडे वाटचाल सुरू होईल. हा उत्तरार्ध म्हणजे- ‘नामात भगवंत आहे असे जाणावे, आणि भगवंताचे होऊन राहावे.’ नामात भगवंत आहे, हे जाणता कधी येईल? जेव्हा नाम नुसतं घेतलं जाणार नाही, तर ते भक्तीनं घेतलं जाईल. भक्ती म्हणजे समस्त विभक्तीचा अभाव. तेव्हा ऐक्य भावानं, एकरूपतेनं भगवंताचं नाम जेव्हा घेतलं जाईल तेव्हाच नामात तो आहे, याचा अनुभव येऊ लागेल. आता हा अनुभव म्हणजे काय?

Story img Loader