योगायोगांवर वा नशिबावर विश्वास असो किंवा नसो, आपले सर्वाचे नशीब हे की, आपण जिवानिशी वाचलो आहोत. बेछूट गोळीबार आपल्यावर झालेला नाही, एखादा पूल वा घुमट आपल्यावर कोसळलेला नाही, खुनाखुनी आणि अन्य जीवघेण्या गुन्हेगारी कारवाया आपल्यापासून अद्याप तरी दूर आहेत.. या साऱ्या जुन्या गोष्टी झाल्या. ताजे समाधान असे की, जगाचा अंत वगैरे काही झालेला नाही आणि आपल्यासकट जग टिकलेले आहे. २१ डिसेंबर ही तारीख काळीकुट्ट ठरणार आणि त्या तारखेनंतर जग असणारच नाही हे जे ठोकताळे होते, ते पार खोटे ठरलेले आहेत. अशा ठोकताळय़ांना प्रसिद्धी देण्याचे काम इंटरनेटसारख्या माध्यमांतून जितके होत होते, तितके वृत्तपत्रे वा चित्रवाणी वाहिन्यांवरून होत नव्हते, हाही कुणाला नशिबाचाच भाग वाटेल. पण खरे नशीब हे की एरवी आपापली भाषा, आपापला धर्म, आपापल्या घराण्याचे नाव बुडणार म्हणून चिंतित होणारा आणि प्रसंगी तेवढय़ामुळे आक्रमक होणारा मानवी स्वभाव, जगच बुडणार आहे अशा भीतीवर मात्र विश्वास ठेवत नव्हता. एक मनोरंजक बातमी, अशा दृष्टीनेच त्या जगबुडीच्या चर्चेकडे पाहिले जात होते. मनोरंजनासोबत काही ज्ञानही मिळाले असेल.. प्राचीन माया संस्कृतीची कालगणना २१ डिसेंबर २०१२ रोजी थांबणार, हे निश्चित असल्यामुळे त्या दिवशी जगबुडीही ठरलेलीच, हा हवाला भंपक असला तरी माया कालगणनेबद्दलचे कुतूहल जागे करणारा होता. ही माया कालगणना २० दिवसांचा महिना मानते, असे १८ महिने मिळून त्यांचे वर्ष होते आणि अशा ३९४ वर्षांचा एक समूह मानून अशा १३ समूहांपर्यंत मोजावे, इतकी झेप त्या कालगणनेने घेतली असल्याची माहिती उपलब्ध आहे. काही तज्ज्ञांनी गेल्या तीनचार वर्षांत आणखी संशोधन केले आणि मायांचे वर्ष २० गुणिले १८अशा ३६० दिवसांचेच नसून वर्षांअखेरीस पाच दिवसांचा एक महिना येई त्यामुळे ३६५च दिवसांचे ते वर्ष होते आणि ३९४ नव्हे, तर ४०० वर्षांचा एक समूह माया मानत असत, अशीही जोड दिली. या हिशेबाने मायांची कालगणना फार तर ५२०० वर्षांची ठरते. मग काही जण त्याहीपुढे गेले आणि तुन- कातून – बक्तून ही नावे महिना- वर्ष- वर्षसमूह यांची नसून तुन म्हणजे ३९४ वर्षांचा समूह आणि कातून म्हणजे ७९०० वर्षांचा, तर बक्तून म्हणजे १५८०० वर्षांचा समूह. तुन- कातून – बक्तून हे एकमेकांपेक्षा अनुक्रमे मोठी मोजमापे सुचवत जाणारे शब्द पाहिले तर आपली भाषा ज्ञानभाषा व्हावी अशी आस माया संस्कृतीत होती, हे स्पष्टच दिसते. पण प्राचीन माया लोक शब्दांवर विसंबून राहिले नाहीत. त्यांची परंपरा मौखिक नव्हती. चित्रलिपीतील पट, पिरॅमिडसारखी शिल्पे यांतून ज्ञान सर्वासाठी खुले असावे, अशी त्या काळच्या माया लोकांची धारणा असल्याचे सिद्ध करता येते. काही पिरॅमिड आजही आहेत आणि ती फक्त देवालये वा प्रार्थनास्थळे नव्हती, तर कालगणनेसारखे ज्ञान तेथे चित्रलिपीत आणि कोरीव स्वरूपात होते असे तज्ज्ञांनी शोधले आहे. हे खुले ज्ञान इतके खुले आहे की, आजच्या संशोधकांनी त्याचे लावलेले अर्थ निरनिराळे आहेत आणि त्यांत सुसूत्रता नाही.
संस्कृती लोकांमुळेच टिकते. मायांच्या कालगणनेप्रमाणे २१ डिसेंबर २०१२ हा दिवस अखेरचा, हे जरी खरे मानले तरी माया संस्कृती अगोदरच इतिहासजमा झालेली आहे. इतकी की, चिचेन इट्झा या प्राचीन माया शहरातील महत्त्वाचा पिरॅमिड आजच्या मेक्सिकोत आहे त्याला स्थानिक मेक्सिकन लोक कॅस्टिलो म्हणतात! हा शब्द स्पॅनिश. म्हणजे आपल्याच पूर्वजांनी बांधलेल्या वास्तूला आपण काय म्हणायचे, हे मेक्सिकनांनी पाश्चात्त्य आक्रमकांना खुशाल ठरवू दिले. जगबुडी होणार नाही, अशी खूणगाठ बांधलेले हौशी पर्यटक २१ डिसेंबर रोजी या कॅस्टिलोला भेट देण्यासाठी यावेत म्हणून मेक्सिकोच्या सांस्कृतिक खात्याने एक योजना आखली, अमेरिकी व अन्य पर्यटन कंपन्यांशी करार केले आणि इथे जे परदेशी पर्यटक येतील, त्यांना माया संस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी माया लोकनृत्यांचा कार्यक्रम ठेवला. संस्कृती लोकनृत्यांपुरती का होईना, टिकून आहे. पण पूर्वज फक्त नाचत होते का? त्यांनी तर कालगणनेसारख्या ज्ञानशाखेत, जागतिक व्यापारात या पूर्वजांनी माया संस्कृती म्हणून स्वत:ची ओळख तयार केली होती. आज ‘लॅटिन’ अमेरिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दक्षिण अमेरिकेतील पाच-सहा देश या माया संस्कृतीने एके काळी भारलेले होते. तो काळ कधीच सरला. माया संस्कृतीपुरती जगबुडी कधीच होऊन गेली.
आपली भाषा मरेल, आपली संस्कृती मरेल, आपल्या राज्याच्या राजधानीचे शहर राज्यापासून तोडले जाईल, धर्मबुडव्यांमुळे किंवा आक्रमकांमुळे आपला धर्म बुडेल अशी भीती माणसांना असते. संस्कृतींची सरमिसळ होत असताना आणि ती आकर्षकही असताना अशी भीती वाटणे रास्तच म्हणायला हवे. महत्त्वाचे हे की, जगायचे आहे आणि स्वत:चे अस्तित्व अस्मितेसकट टिकवायचे आहे, अशा जीवनेच्छेची धुगधुगी कायम ठेवण्यासाठीच ‘हे सारे जाणार, बुडणार’ अशी भीती उपयोगी पडत असते. आरोग्य का टिकवायचे, या प्रश्नाचे साधे उत्तर म्हणजे रोग होतील किंवा मृत्यू लवकर येईल याची भीती. लहान मुलांना सदाचार शिकवताना अनेकदा भीतीही दाखवावी लागते. भीतीमुळे माणूस कार्यप्रवण होतो आणि बचावाचे मार्ग शोधतो. जी भीती स्वाभाविक असते, तिच्यापासून वाचण्यासाठी प्रयत्न करणे हा मनुष्यस्वभाव आहे. मात्र जी भीतीच अस्वाभाविक आहे, जिला कुठलाही आधार नाही, जो आधार म्हणून सांगितला जातो आहे तो पुरेसा तर्कशुद्ध असल्याचे सिद्ध होऊ शकत नाही, अशी भंपक भीतीदेखील माणूस कशी काय स्वीकारतो?
जगबुडीबद्दलचे भाकीत, हे याला अपवाद ठरले कारण ती भीती भंपकच असली, तरी ती फार कमी जणांनी स्वीकारली. एक इतिहासजमा संस्कृती काहीतरी सांगते, त्यावर आपण विश्वास ठेवायचा हे मानवी मनाला पटले नाही. उलट, अशी भीती आहे म्हणे, असे म्हणत तिची खिल्ली अनेकांनी उडवली. एरवी कुठल्यातरी भंपक भीतीने माणसे कार्यप्रवण होतात, तेव्हा त्यांचा समूह एखाद्या नेत्याचे ऐकणारा असतो. यासाठी समूह असावा लागतो आणि नेताही. ‘आपण हम दो हमारे दो आणि ते मात्र हम पाँच हमारे पच्चीस’ ही भीती भारतात दाखवण्याचा प्रयत्न काहींनी केला, त्याच्या किमान दोन दशके आधी हिटलरने ज्यूंची लोकसंख्या आपल्या ‘आर्यन’ जर्मनीत वाढेल, अशी भीती दाखवली होती आणि हिटलरला त्या वेळच्या ‘आर्यन’ जर्मनांनी विकासपुरुष मानल्यामुळे लोकांनीही ती स्वीकारली होती. ती भीती भंपक आहे की कशी, याचा विचार त्या वेळच्या हुकूमशहालाच विकासपुरुष मानणाऱ्या एका जनसमूहाने केला नाही. पुढे सद्दामचा इराकच जगावर रासायनिक हल्ले करणार अशी भीती जॉर्ज डब्ल्यू. बुश यांनी जगाला दाखवली, तेव्हा ती मान्य करणारा समूह त्यांनी संयुक्त राष्ट्रांतील आपल्या देशाचे वजन वापरून तयार केला. लोकांनी युद्ध केले की छळ केला, हा भाग निराळा पण ते कार्यप्रवण झाले.
अस्वाभाविक, तर्कहीन भीती दाखवून एखाद्या समूहातील लोकांना कार्यप्रवण करता येते, पण जग बधत नाही. प्रसारमाध्यमांनी जग कितीही जवळ आणले, तरी त्यांना वा अन्य कुणालाही, एखाद्या भंपक भीतीची लाट जगभर पसरवणे आज अशक्यच आहे आणि उद्या-परवाही अशक्यच राहील. नानापरीच्या समूहांनी बनलेल्या जगात तर्कवादाचा अभावित विजय होत असतो, हा नशिबाचा भाग नक्कीच नव्हे.
नशीब! वाचलो..
योगायोगांवर वा नशिबावर विश्वास असो किंवा नसो, आपले सर्वाचे नशीब हे की, आपण जिवानिशी वाचलो आहोत. बेछूट गोळीबार आपल्यावर झालेला नाही, एखादा पूल वा घुमट आपल्यावर कोसळलेला नाही, खुनाखुनी आणि अन्य जीवघेण्या गुन्हेगारी कारवाया आपल्यापासून अद्याप तरी दूर आहेत
First published on: 22-12-2012 at 12:32 IST
मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: God we save