आजच्या कार्तिक पौर्णिमेच्या मुहूर्तावर चि. सौ. कां. तुळस आणि कृष्णाच्या विवाहाची मंगलअष्टके म्हटली जातील आणि मग उद्यापासून ठिकठिकाणची मंगल कार्यालये विवाहोत्सुक आणि नातेवाईकांच्या वर्दळीने गजबजून जातील. लग्नाचा हंगाम सुरू झाला की सोनेखरेदीस बहर येतो. यंदाचे वर्षही त्यास अपवाद नाही. त्यामुळे विवाहमुहूर्ताना सुरुवात होत असतानाच सोन्याच्या भावाने उच्चांक गाठावा हे साहजिकच म्हणावयास हवे. भारतीय मनास सोन्याचे नेहमीच आकर्षण राहिलेले आहे. ते केवळ आभूषणांपुरतेच मर्यादित आहे, असे नाही. जे जे उत्तम, पवित्र त्याची तुलना सोन्याशी करण्याचा प्रघात आपल्या संस्कृतीत दिसतो. त्यामुळे आपल्याकडे सकाळचे निरागस कोवळे ऊन हे सोनपिवळे असते, उत्तम योग हा सुवर्णयोग वा मणिकांचन असतो आणि एखादी गोष्ट अपेक्षेपेक्षा चांगली झाली की ती सोन्याहून पिवळी असते. अर्थव्यवस्थेस आधुनिक चेहरा मिळण्याआधी देशाची वा प्रदेशाची संपत्ती सुवर्णहोनांत मोजली जायची आणि राज्यांचे कर्ज सोन्याच्या मोहरांतून फेडले जायचे. याचमुळे असेल पण आज एकविसाव्या शतकातही सोने हे समृद्धी आणि संपत्तीचे अंतिम मानक मानले जाते. त्याचमुळे गुरुपुष्य योगात एक ग्रॅम का होईना सोने खरेदी करण्यासाठी झुंबड उडत असते आणि मृत्यूनंतर पार्थिवमुखी सोन्याचा मणी तरी ठेवला जावा अशी अनेकांची इच्छा असते. या सुवर्णप्रेमी मानसिकतेत अजूनही बदल करावा अशी मानसिकता तयार झाली नसली तरी ती वेळ येऊन ठेपली आहे, हे निश्चित. याचे कारण असे की देशाच्या एकूणच निर्यातीपेक्षा आयातीत मोठय़ा प्रमाणावर वाढ होत असल्याने परकीय गंगाजळीवर मोठा ताण येऊ लागला असून याचे महत्त्वाचे कारण सोन्याचे प्रेम हे आहे. आयात आणि निर्यात यात तफावत वाढली की चालू खात्यातील तूट वाढत जाते. आयातीचे मोल हे आंतरराष्ट्रीय चलनातून म्हणजे डॉलर्समध्ये द्यावे लागते. त्याच वेळी निर्यातही मोठय़ा प्रमाणावर होत राहिली असती तर आंतरराष्ट्रीय चलनाचा, म्हणजे अर्थातच डॉलरचा ओघही वाढला असता. सध्या आपल्याकडे तसे होत नाही. म्हणजे डॉलर्स येण्याचे आणि जाण्याचे प्रमाण व्यस्त असून जेवढे डॉलर्स आपण कमावतो त्यापेक्षा अधिक गमावत आहोत. त्यातही आणखी एक गंभीर बाब ही की ही आयात जर उत्पादक घटकांसाठी होत राहिली असती तर त्यातून संपत्तिनिर्मिती तरी झाली असती. परंतु ती होत आहे, ती सोन्यासारख्या अनुत्पादक अशा घटकाच्या खरेदीत. त्याचमुळे हे प्रमाण कमी व्हायला हवे अशी गरज रिझव्र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर सुबीर गोकर्ण यांनी व्यक्त केली असून तिची नोंद घ्यायला हवी.
गेल्या वर्षभरात सोन्याच्या आयातीत प्रचंड वाढ झाल्याचे गोकर्ण यांनी नमूद केले. रिझव्र्ह बँकेच्याच आकडेवारीनुसार ही वाढ जवळपास ४० टक्के इतकी आहे. गेल्या वर्षी भारतीयांनी परदेशातून ४३०० कोटी डॉलर्सचे सोने आयात केले. यंदाच्या वर्षी हाच आकडा ६२०० कोटी डॉलर्सच्या घरात पोहोचला आहे. म्हणजे जवळपास साडेतीन लाख कोटी रुपये इतका पैसा भारतीयांनी यंदाच्या वर्षांत सोन्यात गुंतवला. हा आकडा प्रचंड म्हणायला हवा. विश्व सुवर्ण परिषदेकडील आकडेवारीनुसार गेल्या काही महिन्यांत एकूण १८० टन इतका प्रचंड सोनेसाठा आयात झाला. देशाच्या चालू खात्यातील तूट त्यामुळे नक्कीच वाढली, यात शंका नाही. २००८ पासून जगाची अर्थव्यवस्था खंगलेलीच असून त्यातल्या त्यात सुरक्षित म्हणून सोन्यात गुंतवणूक करावी असा विचार व्यक्तीच नव्हे तर अनेक सरकारेही करीत असतात. त्याचमुळे युरो चलनासमोरील संकटावर मात करण्याचा एक मार्ग म्हणून अनेक युरोपीय देशांनी मोठय़ा प्रमाणावर सोनेखरेदी केली. एक जानेवारी २००८ पासून सोन्याच्या भावात विक्रमी वाढ झाली तरीही सोनेखरेदीचा उत्साह कमी झालेला नाही. आपल्याकडेही हेच झाले. देशाची अर्थगती गोठलेली, उद्योगधंदे अनिश्चिततेच्या गर्तेत सापडलेले आणि सरकारही धोरणलकव्याने त्रस्त. अशा वेळी जनतेने स्वत:पुरते पाहात सोन्यात गुंतवणूक करण्याचा सोपा मार्ग निवडल्यास तीस दोष देता येणार नाही. तेव्हा ही सुवर्ण गुंतवणूक कमी व्हावी अशी इच्छा असेल तर एकंदर अर्थव्यवस्थेत सार्वत्रिक सुधारणा व्हायला हवी, यात शंका नाही.
आपल्याकडे सोनेखरेदी दोन कारणांसाठी होते. आभूषणे आणि गुंतवणूक म्हणून. यातील पहिल्या पर्यायाबाबत सरकार काय कोणीच काही करू शकत नाही. कोणी किती दागिने कोणत्या कारणांसाठी घालावेत हे काही सरकार सांगू शकत नाही आणि त्याने ते सांगूही नये. परंतु गुंतवणुकीच्या बाबत मात्र निश्चित असे धोरण सरकार आखू शकते. त्याच अनुषंगाने रिझव्र्ह बँकेने केयूबी राव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली असून ती सोन्याच्या प्रत्यक्ष गुंतवणुकीस पर्याय सादर करणे अपेक्षित आहे. आजही अनेक बँका वा वित्तसंस्थांनी सुवर्ण गुंतवणुकीसाठी वेगवेगळे निधी स्थापन केले आहेत. त्यात मासिक पातळीवर सर्वसामान्य ग्राहक जमेल तितकी गुंतवणूक करू शकतो. परंतु या निधी योजनांची मर्यादा ही की त्यातून प्रत्यक्ष सोनेखरेदी होत राहते आणि आयातीवरचा ताण काही कमी होत नाही. त्यामुळे याला पर्याय सुवर्णरोखे ठरू शकतात. परंतु त्याबाबत पुरेशी जागरूकता नाही. ती पहिल्यांदा गुंतवणूकदारांच्या मनात तयार करावी लागेल. सोन्याच्या गुंतवणुकीस आणखी एक परिमाण आहे. ते म्हणजे सोन्याच्या रोखताक्षमतेचे. अडीअडचणीला काही गरज लागल्यास सोन्याचे रोख पैशात रूपांतर सहजपणे करता येते, असा अनेकांचा अनुभव आहे. त्यामुळेही सर्वसामान्य गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक करणे पसंत करतो. ज्या देशात बँकिंग सेवांचा आणि तदअनुषंगिक पतपुरवठा यंत्रणांचा पुरेसा विकास झालेला नाही त्या देशात सोन्यात गुंतवणूक होत असेल तर ते साहजिकच म्हणावयास हवे. आपल्याकडे पतपुरवठा करणाऱ्या संस्थांची किती कमतरता आहे याचा अंदाज सोने तारण ठेवून कर्ज देणाऱ्या संस्थांच्या वाढीवरून बांधता येऊ शकेल. त्यामुळे सोन्याच्या बदल्यात होणाऱ्या पतपुरवठय़ाच्या गुणोत्तरात बदल करण्याचा प्रस्ताव रिझव्र्ह बँकेच्या विचाराधीन आहे. आज १०० रुपयांचे सोने गहाण ठेवल्यास ६० रुपयांचे कर्ज मिळते. तेव्हा सोन्यावर मिळणारे कर्ज अधिक महाग करणे हा एक उपाय असू शकतो. आज बिगरबँकिंग वित्तसंस्था सोन्याच्या बदल्यात पतपुरवठा करण्यात आघाडीवर आहेत. हे क्षेत्र अनियंत्रित वा अर्धनियंत्रित आहे आणि तेथे व्यावसायिकतेचा अभाव आहे. त्यामुळे याबाबतच्या व्यवहारात पारदर्शकता नाही वा कमी आहे. त्या तुलनेत अधिक व्यावसायिक असलेल्या बँका सोन्याच्या बदल्यात कर्ज देण्याच्या फंदात पडत नाहीत. तेव्हा त्याबाबतही निश्चित धोरण आखणे रिझव्र्ह बँकेस अनिवार्य आहे. राव समितीने याबाबतचा विचार निश्चितच केला असेल.
तेव्हा सोन्याची कौले चढवण्याचे स्वप्न पाहणारी अर्थव्यवस्था त्याच सोन्याच्या आयातीने त्रस्त असणे हा विरोधाभास असला तरी ते वास्तव आहे. रामायणात लंकेत सोन्याच्या विटा होत्या आणि आपल्याकडेही सोन्याचा धूर निघेल इतके वैभव होते, असे म्हटले जाते. परंतु आज त्याच सोन्याच्या धुराने अर्थव्यवस्थेची घुसमट होत आहे आणि त्यास आपण सगळेच जबाबदार आहोत.
सोन्याचा धूर
आजच्या कार्तिक पौर्णिमेच्या मुहूर्तावर चि. सौ. कां. तुळस आणि कृष्णाच्या विवाहाची मंगलअष्टके म्हटली जातील आणि मग उद्यापासून ठिकठिकाणची मंगल कार्यालये विवाहोत्सुक आणि नातेवाईकांच्या वर्दळीने गजबजून जातील. लग्नाचा हंगाम सुरू झाला की सोनेखरेदीस बहर येतो. यंदाचे वर्षही त्यास अपवाद नाही.
First published on: 28-11-2012 at 01:09 IST
मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Golden smoke