समोरच्यास अपमान वाटेल असे बोलून आपल्याला हवे ते काम त्याच्याकडून करवून घेण्याची एक रीत असते. ती रीत गुगल या बलाढय़ इंटरनेट सेवा कंपनीचे अध्यक्ष एरिक श्मिड यांनी गुरुवारी वापरली. भारतातील इंटरनेट सेवा पाहिल्यावर १९९४ मध्ये अमेरिकेत इंटरनेटची जी स्थिती होती त्याचीच आठवण येते, असा वाग्बाण श्मिड यांनी सोडला. परंतु टोला हाणायचा तर तो झोंबला पाहिजे आणि झोंबण्यासाठी तो नेमकेपणाने मारला पाहिजे, हा साधा नियम बहुधा श्मिड विसरले. नेमकेपणाऐवजी अतिशयोक्तीचा आधार त्यांनी घेतला. अमेरिकेत १९९४ साली उपलब्ध असलेल्या इंटरनेटचा वेग असेल १० किलोबाइट प्रतिसेकंद, त्या तुलनेत भारतात आज सर्वदूर पोहोचलेल्या इंटरनेटचा वेग किमान दहापट अधिक आहे. भारतात इंटरनेटचा प्रसार झालेला नाही, हे श्मिड यांना ठसवायचे होते आणि त्यासाठी अमेरिकेत १९ वर्षांपूर्वी इंटरनेटधारकांचे तेथील लोकसंख्येशी जे प्रमाण होते तेच आज आहे, असे म्हणायचे होते. ते सांगण्यासाठी भारताला श्मिड यांच्यासारख्या हुशार अध्यक्षाची जरुरी नाही. गुगलने दिल्लीत काही स्थानिक प्रायोजकांसह गुरुवारी भरवलेल्या ‘बिग टेंट’ या चर्चासत्रात गुगलच्याच प्लस सेवेद्वारे खुल्या गप्पाटप्पांच्या (हँगआऊट) कार्यक्रमात श्मिड यांनी हे विधान केले. त्याअगोदर भारत हा कसा संधींचा देश आहे, इथे सॉफ्टवेअर जाणणाऱ्यांची कमतरता अजिबात नाही आदी नेहमीची गुढय़ातोरणे त्यांनी उभारलीच होती, पण श्मिड यांना भारतातील इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या ग्रामीण भागातही वाढलेली पाहायची आहे आणि शहरी भागात गुगल प्ले, गुगल अमुक- गुगल तमुक यांसारख्या उत्पादनांचा खप वाढवायचा आहे.. हे सारे या जगड्व्याळ कंपनीला हवे आहे विनाविलंब!  म्हणून आत्ताच्या थ्री-जी संदेशवहनाऐवजी फोर-जीचा उपाय योजला नाही, तर भारतासारखा एवढा चांगला देश मागेच पडणार, असा लकडा त्यांनी भारतभेटीदरम्यान अनेकदा, अनेकांकडे लावला. भारतात सध्या मोबाइलधारक ६० कोटी, परंतु इंटरनेटधारक मात्र तेराच कोटी आणि ब्रॉडबॅण्डधारक तर अवघे दोन कोटी, अशी उतरंड आहे. आधार कार्डाची चौकशी इंटरनेटवरून करण्यासाठी सायबर कॅफेच्या संचालकालाच आपापला क्रमांक सांगणारे लोक, त्याच कॅफेमध्ये बसून अर्थार्जनापासून खऱ्या-खोटय़ा प्रेमापर्यंत काहीही करू शकणारे तरुण, हे श्मिड यांच्या लेखी इंटरनेटधारक नसले, तरी इंटरनेटचा लाभ त्यांना मिळतो आहे. श्मिड यांच्या किंवा कुणाच्याही व्यवसायासाठी असे लाभधारक कामाचे नाहीत. त्यांना हवे आहेत थेट ग्राहक. फोर-जी आले की इंटरनेट फोनधारकांची संख्या वाढेल, अँड्रॉइडच्या क्षमता वापरणाऱ्यांना फोनवर इंटरनेट कमी खर्चात उपलब्ध होईल आणि त्याच वेळी अँड्रॉइडसाठी हिंदीच्या सेवा विस्तारण्याचा गुगलचा कार्यक्रम यशस्वी होऊन सार्वत्रिक वापरात आलेला असेल, अशी गुगलची भारतीय विस्तारनीती आहे. मात्र भारतीय धोरणकर्त्यांचे आजचे प्राधान्यक्रम त्यासाठी बदलावे लागतील आणि त्यासाठी दाम तर हिंदी सेवेच्या विकासासाठी खर्च होतच असल्याने आता साम किंवा भेद असे मार्ग वापरावे लागतील, याचा अंदाज श्मिड यांना आहे. यापैकी बुद्धिभेदनीतीचा एक भाग म्हणून गप्पाटप्पांतही त्यांनी भारताबद्दल टोलेबाजीचा सूर लावला.

Story img Loader