ग्रँटा हे त्रमासिक पुस्तकाच्या आकाराचेच नव्हे, तर प्रकाराचेही असते. प्रत्येक अंक विशेषांक, ‘नव्या लिखाणाचे नियतकालिक’ हा लौकिक जपूनसुद्धा वाचनीय, अशी ग्रँटाची ख्याती १९७९ पासून आहे. लिखाणातील नवेपणा कसा असावा, याचा आदर्श ‘ग्रँटा’तून मिळत राहिलेला आहे. इतका की, ‘ग्रँटा’ हे केम्ब्रिजमधून वाहणाऱ्या कॅम नदीचे मूळ स्थानिक नाव आणि याच केम्ब्रिज विद्यापीठाचे विद्यार्थी-नियतकालिक म्हणून सन १८८९ मध्ये सुरू झाले होते, वगैरे इतिहासात कुणालाही काडीचाही रस नसला, तरीदेखील ‘ग्रँटा’विषयी वाचकांना आदर मात्र आहेच. अर्थात, ग्रँटाने भारताकडे पाहण्यास १८ वर्षे घेतली, हा फारतर नापसंतीचा मुद्दा असू शकतो. ग्रँटाचे पुनरुज्जीवन १९७९ मध्ये झाले, त्यानंतर १८ वर्षांनी- १९९७ च्या मार्चमध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवाचे औचित्य साधून ‘ग्रँटा’चा भारत विशेषांक निघाला. त्यात आर. के. नारायण, व्ही. एस. नायपॉल, सलमान रश्दी, अरुंधती रॉय अशा अनेकांचा समावेश होता. त्या वेळी ग्रँटाचे संपादक होते इयान जॅक! ते दोन वर्षांपूर्वीच निवृत्त झाले, पण भारतीय (केवळ इंग्रजी नव्हे, सर्वच भाषांतले) साहित्य समजून घेण्याची उत्कट इच्छा व तयारी असलेले इयान जॅक हेच पुन्हा, २०१५ सालच्या जानेवारीत प्रकाशित झालेल्या ‘ग्रँटा’चे अभ्यागत संपादक म्हणून परतले आहेत. त्यांचा ठसा या अंकावर असल्याने दलित साहित्य, कन्नड नवसाहित्य, गेल्या दोन दशकांत वाढलेला ‘डायास्पोरा’ किंवा भारतीय वंशाच्या पण भारतीय नागरिक नसलेल्या लेखकांचा पसारा.. अशा सर्व प्रवाहांचे प्रतिबिंब ‘इंडिया : अनदर वे ऑफ सीइंग’ ही मध्यवर्ती कल्पना असलेल्या ताज्या अंकात दिसते आहे.
 अंक हाती पडल्यावर महाराष्ट्रीय किंवा मराठीप्रेमी वाचकांनी आधी काय वाचावे, हे सोपेच असते.. अंकाच्या मलपृष्ठावरच, या अंकातील कथात्म साहित्य लिहिणाऱ्यांची यादी देताना अरुण कोलटकर यांचा खास उल्लेख आहे.. ‘भारताच्या उत्कृष्ट, परंतु अत्यंत अन्याय्यरीत्या दुर्लक्षिले गेलेले गद्यलेखक’ (कवी नव्हे) असा! कोलटकर काय लिहिताहेत म्हणून वाचायला जावे, तर त्यांचा ‘चिरीमिरी’ हा कवितासंग्रह वाचलेल्यांना पहिल्या २०० शब्दांतच ही गोष्ट कुणाची हे कळेल.. हे तर बळवंतबुवा! जिलबी वगैरे खाऊ खाण्यासाठी, वयाच्या ११-१२व्या वर्षी वडिलांच्याच दुकानात आण्या-दोन आण्यांची नाणी चोरणारा बळवंत्या.. हे बळवंतबुवा सत्तरीपार असताना कोलटकरांशी त्यांच्या गप्पा रंगत, त्यांत ज्या आठवणी निघत त्यात समाजदर्शन आणि नीतिशास्त्रीय भूमिका असत. हे सारे अर्थात, कोलटकरांनी टिपले म्हणून. कोलटकरांची लेखणी अशी की, उत्तम इंग्रजीत अस्सल देशी अनुभव उतरतो, तोसुद्धा    ११-१२ वर्षांच्या मुलाच्या वयसुलभ उत्कंठेतून.
महाराष्ट्रीय जीवनाचे प्रतिबिंब असणारी आणखी एक कथा या अंकात आहे.. अंजली जोजफ यांची ‘शूज’. नायक आणि निवेदक एक चर्मकार. वडिलांचा धंदा सांभाळणारा, दोन मुलगे आहेत म्हणून खूष असलेला आणि एका मुलाचा तर शहरात फ्लॅटही आहे म्हणून सुखावलेला. तरुणपणी या नायकाला दारूची सवय लागली. ती कशी लागली, दारूमुळे कुटुंब हा प्राधान्यक्रमावरला विषय कसा उरलाच नाही.. याची तपशिलवार कबुली नायक देतो. अधूनमधून आणि अखेरीस स्वतच्या पत्नीबद्दल बोलतो. अखेर वाचकाला कळते.. ही कथा त्याची नसून ‘तिची’ आहे! त्याला फक्त एवढेच म्हणायचे आहे की, बुटांच्या जोडय़ासारखीच ही माझी जोडीदारीण माझ्यासह होती.
‘शूज’मध्ये संवेदनशीलता थेटपणे वाचकाला भिडणारी आहे, तर ‘पायर’मध्ये अशा थेट संवेदनशीलतेचा अभाव हाच (लेखकाच्या) आईच्या निधनापेक्षा वाचकाला धक्कादायक वाटू शकणारा आहे. लेखक अमिताव कुमार हे परदेशात असतात. आईच्या अंत्यसंस्कारांसाठी बिहारमध्ये, घरी येणे झाल्यावर त्यांनी घरचे आणि दारचे वातावरण कसे पाहिले, एवढाच या दीर्घ निबंधवजा लिखाणाचा जीव. स्वतच्या तुटलेपणातूनही लेखकाला दिसत राहतात, ते भावनांचे आकृतिबंध आणि त्या भावना व्यक्त करण्याचे संकेत! ही सांकेतिकता वाचकापर्यंत भिडवण्याचे काम या लेखाने केले आहे. लेखासोबत एक छायाचित्रही आहे, लेखकानेच टिपलेले. गंगेच्या पाण्यावर, तिरडीवरून फेकून दिलेले हार हेलकावे खाताहेत. थोडय़ा वेळाने ते नाहीसे होतील, खूप वेळ राहून कुजतील. तसेच भावनांचे होत असते का? हा प्रश्न वाचकाला छळेल.
इथे वाचनाला बरेच फाटे फुटतील, एव्हाना ‘ग्रँटा’चा अंक हाताळून आपल्या परिचयाचा झाला असेल आणि प्रत्येक लेखापूर्वी वापरलेली दृश्यकलाकृती (छायाचित्र, रंगचित्राचा फोटो आदी) लक्षपूर्वक निवडली आहे हे जाणवेल, गौरी गिल या छायाचित्रकर्तीने टिपलेल्या फोटोंवर राजेश वनगड या वारली कलावंताने केलेल्या वारली-चित्रांच्या फोटोंचा खास विभाग पाहून, ‘वारली आर्ट’युक्त उशीचे अभ्रे वापरणाऱ्या वाचकाला उशीच उसवल्याचाही अनुभव आलेला असेल.. आमच्या जंगलांची उसवण, आमच्या भूमीचे उजाड होणे आम्ही रोजच्यारोज सहन करतो आहोत आणि आमच्या पुढल्या पिढय़ांनी संस्कृती जपलीच तर ‘तुमची इच्छा’ म्हणून आमच्या संस्कृतीच्या जपणुकीचं काम आम्ही करत राहू, हा आशय वनगड यांनी  पोहोचवला आहे. अर्थात, यासाठी कष्ट घेऊन पाहण्याची तयारी हवी. उपमन्यू चटर्जीनी ‘ऑथेल्लो सक्स’ नावाची दीर्घकथा लिहिली आहे, तीदेखील नीट- सारे संदर्भ समजावून घेत वाचली तरच भिडेल. त्या मानाने, नील मुखर्जी यांची कथा फार म्हणजे फारच सोप्पी आहे. अशा सोप्प्या कथांमधला कार्यकारणभाव मात्र वाचकापर्यंत धड कधी पोहोचत नाही, तोच अडथळा या कथेतही आहे. एक अनिवासी भारतीय (अमेरिकास्थ) बाप आपल्या सहा वर्षांच्या मुलावर भारताचे संस्कार व्हावेत म्हणून आग्रा-फत्तेपूर सिक्री दाखवतो आहे.. या मुलाची आई अमेरिकी. मुलाला भूत म्हणजे काय हे माहीत नाही इतपत ठीक.. पण राजाराणीच्या गोष्टीसुद्धा त्याने ऐकलेल्या नाहीत. त्याचे लहानपण हे लेखकाने अनुभवलेल्या बंगाली बालपणापेक्षा निराळे आहे. बालसुलभ धावणे- सतत मोठी माणसेच दिसतात म्हणून कंटाळणे हे मात्र या मुलातही आहेच. फत्तेपूर सिक्रीला अकबराने बांधवून घेतलेल्या मोठय़ा द्यूत-पटावर (ज्यावर सोंगटय़ांऐवजी माणसे असत).. फुल्ली मारलेल्या चौकोनांपैकी एकावर हा मुलगा जाऊन बसतो. ‘कळत नाही का.. असं नसतं बसायचं.. आवरा त्याला आवरा..’ असे करवादलेले बोल या मुलाच्या बापाला कुणाकडून तरी ऐकावे लागतात. त्याच रात्री मुलगा प्राण गमावतो. या कथेचे नाव, ‘द राँग स्क्वेअर’! पण तो चौकोन चुकीचा का, कसा याचे यत्किंचितही दिग्दर्शन लेखक करीत नाही, हे काही चांगल्या गूढकथेचे लक्षण नव्हे.
अंकातला काही मजकूर ‘समाधान देणारा’ वाटत नाही, तरीही वाचनीय आहे. उदाहरणार्थ, ब्रिटिश-भारतीय लेखक हरी कुंझरू यांनी स्वतच्या शैलीवरले प्रेम आणि भारतीय तरुणांच्या आशाआकांक्षांविषयीचे निरीक्षण यांची घातलेली सांगड म्हणजे त्यांचा दीर्घलेख. यात आशाआकांक्षांविषयी लेखकाची भूमिका अस्फुटच राहाते. किंवा, गांधीजींच्या लंडन-मुक्कामाचा सॅम मिलर यांनी घेतलेला पुनशरेध. मिलर यांचा हा शोध वाचनीय आहेच, नायपॉल यांनी गांधींच्या लंडनविषयक अनुभवकथनावर केलेली टीका खोडून काढणे, ही कामगिरीदेखील मिलर उत्तम करताहेत. पण तो लेख आणखी दीर्घ हवा होता, कदाचित आणखी काही त्यातून मिळाले असते, असा चटका लावून संपतो. मुंबईतील मजूरवस्तीत दररोज जाऊन, तिथले जीवन जवळून पाहून मगच पुस्तक लिहिणाऱ्या कॅथरीन बू यांनी त्याच वस्तीतील – मुंबईच्या अंधेरी-सहार भागातील ‘अण्णावाडी’मधील छायाचित्रे का मांडावीत, असे वाचकांना वाटेल. हा निव्वळ सहकाऱ्यांना श्रेय देण्याचा, उतराई होण्याचा प्रकार आहे असे दिसते. पण या वस्तीतली मुले संगणकावर गेम खेळताहेत, किंवा पौगंडावस्थेतील नाजुक भावनांतून एका मुलाने एका मुलीचे (तिच्या आईची संमती घेऊन) टिपलेले छायाचित्र इथे आहे.. त्यातून छायापत्रकारितेच्या पुढला आणि भावोत्कट म्हणावा असा अनुभव मिळेल. ‘डबल इन्कम फॅमिली’ ही दीप्ती कपूर यांची कथा तपशिलांनी खच्चून भरल्याने लांबली आहे, परंतु हे तपशीलच इथे महत्त्वाचे आहेत- त्या तपशिलांतून, नोकरांशी ‘चांगले’ वागून ‘सज्जनपणा’ मिरवणारा धनिकवर्ग आणि या धनिकवर्गाच्या अस्तित्वावरच जगणे अवलंबून असलेला नोकरवर्ग अशा दोन बाजू लख्खपणे दिसू लागतात.
अमन सेठी यांचा ‘लव्ह जिहाद’बद्दलचा लेख या अंकात आहे. या लेखातील मते ही, सेठी यांची प्रामाणिक मते आहेत आणि ही लेखकीय मते अर्थातच कोणाही विचारी माणसाप्रमाणे, लव्ह जिहाद म्हणून जी प्रकरणे बाहेर काढली जातात त्यांत ‘जिहाद’ असू शकत नाही, उलट मुस्लिमांविरुद्ध योजलेले प्रचारतंत्रच त्यातून दिसते, अशी आहेत. पण म्हणून सहारणपूरला राहणारे ‘हिंदुत्ववादी’ कार्यकर्ते विजयकांत चौहान यांच्या मतांचा अनादर अमन सेठी अजिबात करीत नाहीत.. उलट, चौहान यांची मते अशीच का आहेत, याबद्दल अमन यांना कुतूहल आहे! त्या कुतूहलशमनाची कथा उलगडण्यासाठी लेख हेच स्वरूप योग्य ठरते.
ग्रँटाच्या साऱ्या लेखांमधून, भारतमाता वगैरेंबद्दल न बोलतासुद्धा भारतावर प्रेम करता येते, भारतीय वास्तवाकडे प्रेमादराने पाहूनसुद्धा त्यावर बारीक नजर ठेवता येते, अगदी एकाच भारतीयाच्या भावनांचा पट मांडूनसुद्धा देशाच्या स्थितीबद्दल भेदकपणे बोलता येते, असा विश्वास लेखकांनी वाचकांना दिला आहे. इयान जॅक हे भारतातील प्रादेशिक भाषा-साहित्याबद्दल जितकी आस्था बाळगतात, तिचे त्याच प्रमाणात प्रतिबिंब या अंकात दिसेलच असे नाही. अखेर हा अंक इंग्रजीतील नव्या लिखाणाचाच आहे. ही काही अंकाची त्रुटी नव्हे. उलट, हे लिखाण वाचल्यास ‘सगळे इंग्रजी लेखक भारताबद्दल अस्संच का लिहितात?’ हा जुना प्रश्न गळून पडेल आणि निरनिराळे इंग्रजी लेखक, भारताकडे निरनिराळय़ा पद्धतींनी पाहाताहेत याचे समाधान वाटेल.
नव्या लिखाणाचे किंवा एकाच विषयावरल्या विविधांगी कथा-लेखांचे संपादन करताना, संपादक सहृदय असावाच लागतो. वण्र्यविषयावर त्याचे प्रेमही असावे लागते आणि त्या प्रेमाच्या पुढे जाऊन,  संपादकाने विषय पोहोचवायचा असतो. इयान जॅक भारतप्रेमी आहेत, हे निराळे सांगायला नकोच. पण ग्रँटाचे संपादक म्हणून त्यांनी जगाची भारताकडे पाहण्याची नजर आणि भारताचा स्वतकडे पाहण्याचा दृष्टिकोन यांची उत्तम सांगड घालणारे मिश्रण या अंकातून दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा