पुराणातल्या देवदानवांच्या किंवा प्राचीन काळातील राजेमहाराजांच्या कथांचं प्रत्येकालाच आकर्षण वाटत असतं. कधी श्रद्धेच्या पोटी तर कधी त्यातील सुरसतेमुळे लहानपणी गोष्टींच्या पुस्तकांतून किंवा टीव्ही वाहिन्यांवरील पौराणिक कार्यक्रमांमधून हिंदू संस्कृतीबाबतचं कुतूहल शमवण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करत असतो. याच पौराणिक कथांना वेगळा साज चढवत अनेक इंग्रजी कादंबऱ्या साहित्यक्षेत्रात अवतरल्या आहेत.
देवादिकांच्या दैवी शक्तीचं वर्णन ‘कॉमन सेन्स’ पद्धतीच्या बुद्धीला पटेल, अशा प्रकारे करणाऱ्या भारतीय लेखकांच्या इंग्रजी कथा-कादंबऱ्यांचा ट्रेंड सध्या रुजतो आहे.
हिंदू धर्मातील पौराणिक कथा हा सर्वसामान्यांपासून संशोधकांपर्यंतच्या प्रत्येकाच्याच आकर्षणाचा विषय राहिला आहे. लहानपणी गोष्टीरूपात वाचलेल्या देवदानवांच्या आख्यायिकांची इतकी भुरळ पडलेली असते की, मोठेपणीदेखील त्यांच्याबाबतची जिज्ञासा कमी होत नाही. त्यामुळेच पुराणातल्या गोष्टींवर आधारित मालिका, चित्रपट आणि पुस्तकांना नेहमीच पसंती मिळत असते. केवळ भारतातीलच नव्हे, तर पाश्चिमात्य देशांतील साहित्यिक, अभ्यासकांनीही या कथांचा आधार घेऊन आपापल्यापरीने त्यांची मांडणी केली. मात्र, यातील बहुतांश जणांचा सूर या गोष्टी कशा खऱ्या-खोटय़ा आहेत, हे ठरवण्याचा होता. नेमका हाच दृष्टिकोन टाळून अलीकडच्या काळात प्रकाशित झालेल्या पुस्तकांनी पुराणातल्या कथांची मांडणी केली आहे. अमिष त्रिपाठी यांचे ‘इमॉर्टल्स ऑफ मेलुहा’ आणि ‘सीकेट्र्स ऑफ नागाज’ असो की अश्विन सांघी यांचे ‘द चाणक्य चांट’ आणि ‘ द कृष्णा की’ असो, पुराणातील आख्यायिकांचे कथासूत्र म्हणून वापर करून त्यातून निर्माण केलेल्या काल्पनिक कादंबऱ्या अनेक अर्थानी वेगळय़ा ठरतात. त्यांची ओघवती शैली, प्रत्येक घटनेबाबतचा सखोल अभ्यास, कोणतेही मतप्रदर्शन करता गोष्ट सांगण्याचा प्रयत्न याबरोबरच बुद्धीला पटेल अशा पद्धतीने पुराणातील व्यक्तिरेखांची मांडणी यामुळे या कादंबऱ्या वैशिष्टय़पूर्ण ठरल्या आहेत. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपासून रेल्वेस्थानकांवरील वृत्तपत्रांच्या स्टॉल्सपर्यंत ही पुस्तके ‘बेस्टसेलर’ ठरत आहेत.
अमिष त्रिपाठी हे कलकत्ता आयआयटीतून उत्तीर्ण होऊन स्टँडर्ड चार्टर्ड, आयडीबीआय अशा बहुराष्ट्रीय बँकांत वरिष्ठ पदांवर १४ वर्षे काम करून ३८ व्या वर्षी निवृत्त झाले. सुरुवातीपासून इतिहासतज्ज्ञ बनण्याची इच्छा असलेल्या अमिष यांनी मग साहित्याची वाट धरली. ‘इमॉर्टल्स ऑफ मेलुहा’ हे २०१० साली प्रकाशित झालेले त्यांचे पहिले पुस्तक. ‘भगवान शिव हे देव नसून एक मनुष्य असते तर..’ या मूळ कल्पनेतून साकार झालेल्या ‘शिवा ट्रायलॉजी’ या तीन पुस्तकांच्या मालिकेतील हे पहिलं पुस्तक अल्पावधीतच भारतातील सर्वाधिक खपाचं पुस्तक बनलं. त्यापाठोपाठ अमिषने याचा दुसरा भाग ‘सीक्रेट्स ऑफ नागाज’ हे पुस्तक प्रकाशित केलं आणि आता ‘ओथ ऑफ वायुपुत्राज’ हे त्यांचं पुस्तक येत्या काही महिन्यांत बाजारात येत आहे. हिमालयाच्या पर्वतरांगांतील कैलास पर्वतावरील गण जमातीचा प्रमुख असलेला शिव काही कारणाने आपल्या जमातीसह मेलुहा या प्रांतात स्थलांतरित होतो आणि तेथील राजा-प्रजा त्याला नीलकंठ समजून भक्तिभावाने त्याची सेवा करते. हाच शिवा पुढे आपले युद्धकौशल्य आणि शौर्य यांच्या जोरावर मेलुहाच्या सूर्यवंशी राजाला अयोध्येच्या चंद्रवंशी राजावर विजय मिळवून देतो. तेथून त्याचा पुढचा प्रवास सुरू होतो, अशी एकामागून एक गोष्टींची गुंफण घालून अमिषने साकारलेली ही मालिका वाचकांच्या पसंतीस उतरली आहेच; पण प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माता करण जोहरने या पुस्तकाच्या चित्रपटाचेही अधिकार विकत घेतले आहेत.
अमिषच्या ‘इमॉर्टल्स ऑफ मेलुहा’च्या मागेपुढेच अश्विन सांघी यांचं ‘द चाणक्य चांट’ हे पुस्तक प्रकाशित झालं. भारतीय राजकारण आणि युद्धकारणातील महान नीतितज्ज्ञ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाणक्यासारखाच दुसरा चाणक्य सध्याच्या युगात जन्म घेतो आणि भ्रष्टाचार, घोटाळे, हिंसाचार यांनी बरबटलेल्या भारतीय राजकीय व्यवस्थेला आव्हान उभे करतो, या आशयाची ही कादंबरीही वाचकांनी डोक्यावर घेतली; तर अश्विन यांचीच ‘द कृष्णा की’ ही अलीकडेच प्रकाशित झालेली कादंबरी श्रीकृष्णाचे अस्तित्व सिद्ध करणारे ऐतिहासिक पुरावे उजेडात आणणाऱ्या एका इतिहास प्राध्यापकाची कथा आहे. हिलादेखील पौराणिक संदर्भ आहेतच.
पौराणिक किंवा इतिहासातील आख्यायिकांचा आधार घेऊन काल्पनिक कादंबरी उभी करणारे अश्विन आणि अमिष हे दोनच लेखक नाहीत, तर ‘पॅलेस ऑफ इल्यूजन’ ही चित्रा बॅनर्जी दिवाकरूनी यांची द्रौपदीवर आधारित कादंबरी, मनरीत सिंग सोधी यांची ‘द ताज कॉन्स्पिरसी’ ही मुघल इतिहासावरून प्रेरित झालेली कादंबरी अशी आणखीही काही उदाहरणे देता येतील.
या सर्व कादंबऱ्या इतिहास किंवा पुराणावर आधारित आहेत. मात्र त्या त्यातील खऱ्या-खोटय़ाला सिद्ध न करता त्यातील संदर्भाना आपल्या कल्पनेतून फुलवतात. ख्रिश्चन धर्मातील विविध कथा, घटनांचा आधार घेऊन तयार करण्यात आलेल्या काल्पनिक कादंबऱ्यांनी गेल्या काही वर्षांपासून आंतरराष्ट्रीय साहित्यक्षेत्रात मानाची जागा मिळवली आहे. डॅन ब्राऊन या लेखकाच्या ‘दा विंची कोड’ या कादंबरीने तर विक्रीचे नवे उच्चांक गाठले. ख्रिश्चन धर्मातील वादग्रस्त प्रथा-रीतिरिवाजांना धक्का देणारी ही कादंबरीही तितकीच वादग्रस्त ठरली. मात्र, तेथील जनतेने ती सामावून घेतली. ‘काल्पनिक इतिहास किंवा पौराणिक कथा’ हा प्रकार आता भारतीय वाचकांनाही पसंत पडत आहे. अमिष म्हणतो त्याप्रमाणे, ‘जसजसा एखाद्या देशाचा आत्मविश्वास वाढत जातो, तसतसे तेथील लोक आपल्या संस्कृतीच्या इतिहासात डोकावून पाहू लागतात. त्यामुळेच ऐतिहासिक काल्पनिक कादंबऱ्यांना चांगला वाचक मिळत आहे.’ केवळ भारतीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय लेखकही या प्रकाराच्या साहित्यनिर्मितीत आता आघाडीवर आहेत.
भारतीय संस्कृतीचा इतिहास अतिशय उत्कंठावर्धक, वैशिष्टय़पूर्ण आणि मनोरंजक गोष्टी, घटनांनी भरलेला आहे. त्यामुळे त्यातून कथासूत्र शोधणे फारसे कठीण नाही. मात्र, त्याला संशोधनाची, अभ्यासाची आणि आकर्षक मांडणीची जोड देऊन कादंबरी निर्माण करण्याचे कसब या सर्वच साहित्यिकांनी अचूक साधले आहे. मात्र, त्यांचे आणखी एक वेगळेपण म्हणजे, या कादंबऱ्या इतिहासातील न पटणाऱ्या गोष्टी किंवा दैवी शक्ती म्हणून मानल्या गेलेल्या घटनांना दैवी असे स्वरूप न देता बुद्धीला पटेल अशा प्रकारे त्यांची मांडणी करतात. त्यामुळे सध्याच्या शहरी संस्कृतीतील सुशिक्षित, नास्तिक वाचकवर्गालाही त्या वाचनीय वाटतात.

Story img Loader