‘रुग्णसेवेच्या ‘भावे प्रयोगा’ला समाजाच्या ‘टॉनिक’ची गरज’ ही बातमी ‘लोकसत्ता’मध्ये २६ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झाली आणि सकाळी सातपासूनच माझ्या मोबाइलवर कॉल यायला सुरुवात झाली. आमच्या संस्थेला असलेली साहाय्याची गरज पहिल्या पानावरील बातमीत अधोरेखित करण्यात आली होती आणि आतील पानावर रुग्णसेवेचा ‘भावे प्रयोग’ हा संस्थेच्या कार्याची छायाचित्रांसह माहिती देणारा विस्तृत लेखही प्रसिद्ध झाला होता. महाराष्ट्राच्या वेगवेगळय़ा भागांतून मला फोन येत होते, अनेकजण संस्थेला मदत करण्याची इच्छा प्रदर्शित करत होते तसेच संस्थेचे कौतुकही करत होते. केवळ अर्थसाहाय्यच नाही, तर इतर काय मदत केली, तर ती तुम्हाला उपयुक्त ठरेल, अशीही विचारणा करणारे फोन सुरू होते. फोनवरून चौकशीचा हा अखंड क्रम आणि मदतीचा ओघ पुढे कितीतरी दिवस सतत सुरू राहिला. समाजाच्या सर्व थरांतील मंडळी साहाय्यासाठी पुढे झाल्याचे त्यावरून माझ्या अगदी सहजच लक्षात येत होते.
ज्यांनी कधी संस्था पाहिलेली नाही, संस्थेशी काही पूर्वपरिचय नाही अशी कितीतरी मंडळी केवळ ‘लोकसत्ता’ने केलेल्या आवाहनानुसार मदतीसाठी पुढे आल्याचा तो अनुभव आम्ही कधीच विसरू शकणार नाही. ‘लोकसत्ता’च्या विश्वासार्हतेचीच ती साक्ष होती, जी मी अनुभवली. संस्थेशी आणि संस्थेचे संस्थापक कै. द. प्र. भावे गुरुजी यांच्याशी संबंधित मंडळींच्याही आठवणींना ‘लोकसत्ता’मधील लेखामुळे उजाळा मिळाल्याचे अनेकांनी आवर्जून फोन करून सांगितले. अशी अनेक मंडळी भावे गुरुजींवरील प्रेमापोटी साहाय्यासाठी पुढे आली. आर्थिक मदत देण्यासाठी जसे अनेक जण पुढे आले, तशाच पद्धतीने संस्थेला इतर स्वरूपात मदत करण्यासाठीही मंडळी पुढे आली, हे मला विशेष वाटले. आमची अपेक्षा अर्थसहाय्याची होती आणि लोक त्याबरोबरच इतरही साहाय्याची तयारी दर्शवत होते, हाही अनुभव खरोखरच नोंदवण्यासारखा आहे.
पुण्यातील काहीजणांनी संस्थेत रोज येऊन रुग्णसेवेचे काम करण्याची तयारी दर्शवली आहे. जिल्हा परिषदेत कामाला असलेल्या संगमनेरच्या एकाने संस्थेचे संकेतस्थळ विनामूल्य तयार करून देण्याचे आश्वासन दिले आहे, काही मंडळींनी संगणक आणि आनुषंगिक गोष्टी भेट म्हणून देण्याची तयारी दर्शवली आहे, भाषेवर व भाषांतरावर प्रभुत्व असलेल्या एकाने संस्थेचा सर्व महत्त्वाचा पत्रव्यवहार नि:शुल्क करून देण्याचे आश्वासन दिले आहे, काही मंडळींनी संस्थेला डायलायझर हे उपकरण देण्याची तयारी दर्शवली आहे.. समाजाकडून होत असलेल्या साहाय्याच्या अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील.
संस्थेचे संस्थापक भावे गुरुजी हे सोलापुरात हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक होते. ते दरवर्षी शाळेतील विद्यार्थ्यांना संस्था पाहण्यासाठी बोलवत असत. तुम्ही मोठे झालात, की रुग्णसेवेचे असेच काम करा किंवा असे काम करणाऱ्यांना मदत करा, तीच माझी गुरुदक्षिणा असेल, असे गुरुजी सांगत असत. तो संस्कार विद्यार्थ्यांवर किती खोलवर रुजला होता त्याचे दर्शन या बातमीमुळे झाले. बातमी व लेख ज्या दिवशी प्रसिद्ध झाला, त्याच दिवशी पहिला फोन गुरुजींचे मुंबईतील एक हुशार व लाडके विद्यार्थी बा. गं. कुरनूरकर यांचा आला. संस्थेच्या कार्याचे कौतुक करून त्यांनी देणगी देत असल्याचे सांगितले. ते त्याच दिवशी सायंकाळी परदेश दौऱ्यावर जाणार होते. म्हणून तातडीने बँकेत जाऊन धनादेशाचे वगैरे सर्व सोपस्कार पूर्ण करून ते परदेशी गेले आणि दोनच दिवसांत कुरनूरकर यांच्याकडून एक लाख रुपयांची देणगी प्राप्त झाली. भावे गुरुजी आणि आईवडिलांच्या स्मरणार्थ त्यांनी ही देणगी दिली आहे. गोव्याचे रमेशचंद्र पावसकर तसेच सोलापूरचे पाडगावकर कुटुंबीय आणि बंधुभगिनी यांनीही संस्थेला अतिशय तत्परतेने मोठी रक्कम देणगी म्हणून दिली.
८० वर्षांपूर्वी सोलापुरात आणि नंतर पुण्यात सुरू झालेले रुग्णसेवेचे आमच्या संस्थेचे कार्य सर्वस्वी समाजाच्याच पाठिंब्यावर सुरू आहे. या आमच्या कार्याची दखल ‘लोकसत्ता’ने घेतली, त्यामुळे संस्था सर्वदूर पोहोचली. ‘लोकसत्ता’ने आवाहन करताच समाजाने उत्स्फूर्त सहाय्य केले, प्रतिसाद दिला, विश्वास दाखवला.. हा सारा अनुभव आमच्यासाठी खूप मोठा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा