आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण करणाऱ्या तिघा महापुरुषांच्या अंत्ययात्रा व स्मारक यांबाबत संयमच पाळला गेला होता. याची आठवण आजच्या  महात्मा फुले स्मृतिदिनी होणे साहजिक आहे..  
आपल्या प्रत्यक्ष कृती व लिखाणाद्वारे १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात सामाजिक क्रांतीची भूमिका मांडणारे कृतिशील विचारवंत महात्मा जोतीराव फुले यांचा आज स्मृतिदिन. आज महात्मा फुले यांच्या निर्वाणाला शतकाहून अधिकचा काळ लोटला आहे. महामानवाच्या मृत्यूचेही ‘भव्य सोहळे’ होण्याचा तो काळ नव्हता; महामानवांच्या अंत्ययात्रांचा भव्यपणा लाखोंच्या आकडय़ात मोजला जाऊ लागला तो विसाव्या शतकापासून. म. फुले यांच्या (काही काळ) समकालीन असलेल्या लोकमान्य टिळकांच्या मुंबईतील निर्वाणानंतर..
मृत्यूपूर्वी काही काळ म. फुले पक्षाघातासारख्या आजाराने ग्रस्त होते. त्यांचा उजवा हात काम करीत नसूनही ‘सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक’ म. फुले यांनी धैर्याने डाव्या हाताने लिहून पूर्ण केले. त्यांच्या अनुयायांनी ते त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित केले.
आपल्या मृत्यूनंतर आपल्या देहावर कोणत्या प्रकारे संस्कार व्हावेत याचा स्पष्ट उल्लेख म. फुले यांनी त्यांच्या मृत्युपत्रात केला होता. त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना त्यांच्या मृतदेहाचे ‘दफन’ करायचे होते; परंतु ही गोष्ट त्यांच्या नातलगांस अथवा सहकाऱ्यांस माहीत होती की नाही, हे कळावयास मार्ग नाही. शेवटी त्यांच्या मृतदेहाचे ‘दहन’ करण्यात आले.
२८ नोव्हेंबरला पहाटे दोन वाजता  म. फुले यांचे पुण्यात राहत्या घरात निधन झाल्यानंतर सकाळी ही वार्ता पुणे शहर व आसपासच्या परिसरात पसरली. मोठय़ा संख्येने जनसमुदाय त्यांच्या वाडय़ावर जमला. महात्मा फुले यांच्या देहास स्नान घालून तो देह खुर्चीवर बसविण्यात आला. जेणेकरून लोकांना त्यांचे व्यवस्थित दर्शन होईल. सकाळी १० वाजता अंत्ययात्रेला सुरुवात झाली. या शिस्तबद्ध अंत्ययात्रेत पुणे शहरातील सर्व जाती-धर्माचे लोक व म. फुले यांचे सहकारी सहभागी झाले होते. कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे, म. फुले यांचे सहकारी व त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करणारे डॉ. विश्राम घोले, म. फुले यांचे स्नेही कृष्णराव भालेकर, मोरो विठ्ठल वाळवेकर, या मान्यवरांचा यात समावेश होता. हजारोंचा सहभाग असलेली महायात्रा दोन तास चालली. नदीकिनारी म. फुले यांच्या दत्तकपुत्राने- यशवंतने- अग्नी दिला. तिसऱ्या दिवशी अस्थी गोळा करून, त्या मोठय़ा समारंभाने वाजतगाजत पालखीतून आणल्या व म. फुले यांच्या इच्छेप्रमाणे घरात जी समाधी केली होती त्यात ठेवल्या.
म. फुले यांच्या मृत्यूची दखल ‘बडोदावत्सल’, ‘ज्ञानोदय’, ‘इंदुप्रकाश’ या वर्तमानपत्रांनी घेतली. ‘केसरी’ व ‘सुधारक’ या विख्यात साप्ताहिकांनी म. फुले यांच्या मृत्यूची दखलही घेतली नाही.
महाराज सयाजीराव गायकवाडांचा म. फुले यांच्यावर विशेष लोभ होता. सयाजीरावांनी म. फुले यांचे स्नेही मामा परमानंद यांना पत्र लिहून जोतीरावांची स्मृती चिरंतन राहावी म्हणून स्मारक उभारण्याची इच्छा व्यक्त केली; परंतु आजारपणामुळे परमानंद यांना या विचारास मूर्त रूप देणे शक्य झाले नाही. पुढे, जोतीरावांचे सहकारी कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे यांनी मामा परमानंद यांच्या मृत्यूनंतर (१८९३) ‘दीनबंधू’त लिहिलेल्या लेखात जोतीरावांच्या स्मारकासाठी सयाजीराव गायकवाड यांच्या सांगण्यावरून परमानंद कसे प्रयत्नरत होते, याविषयी उल्लेख आहे. ‘ते जोतीरावांचे काही स्मारक करण्यासंबंधाने आम्हांस आग्रहाने सुचवीत, पण आमच्यामध्ये सर्वच ‘जोतीराव’ झाल्यामुळे त्याकडे कोणी लक्ष दिले नाही,’ असे लोखंडे म्हणतात. १९२५ साली पुणे नगरपालिकेने म. फुले यांचा पुतळा उभारण्याचे ठरविले, तेव्हा वाद(!) झाला.
लोकमान्यांचे बुलेटिन व  स्मारक
१९२० साली मुंबईत लोकमान्य टिळक यांचे झालेले देहावसान आजही आठवले जाते, ते त्यांच्या भव्य अंत्ययात्रेमुळे. मृत्यूपूर्वी काही दिवस अगोदरच लो. टिळक सरदारगृहात वास्तव्यास आले होते. त्यांच्या प्रकृतीत चढउतार होतच होते. याविषयीच्या बातम्या मुंबईतील वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध होत होत्या. दर तासाला सरदारगृहातून ‘हेल्थ बुलेटिन’ काढले जात होते. ते सरदारगृहाच्या दारावर सामान्य जनतेसाठी लावले जाई. पुण्यात लोकमान्यांच्या प्रकृतीची माहिती कळविण्यासाठी पुण्यातील लो. टिळक यांचे स्नेही कॉन्ट्रॅक्टर रानडे यांच्या घरी त्या वेळी ‘टेलिफोन’ होता, त्याचा उपयोग झाला होता!
१ ऑगस्टला पहाटे पाऊण वाजता टिळक यांनी अखेर देह ठेवला. तात्काळ ही बातमी सर्वदूर कळाली. पुण्यातील लो. टिळक यांचे चाहते पहाटेच मुंबईकडे येण्यास निघाले. पुण्याहून सर्व मेल, एक्स्प्रेस गाडय़ा गर्दीने फुलून मुंबईकडे रवाना झाल्या. तरीही स्थानकातील गर्दी हटेना, हे पाहून रेल्वेने ‘स्पेशल ट्रेन’ सोडली. काहींचा असा आग्रह होता की, अंत्यसंस्कार पुण्यात करावेत, पण मुंबईतील अनुयायांनी येथेच अंत्यसंस्कार करण्याचा आग्रह धरला. मुंबई-पुणे प्रवासाला त्या काळी पाच तास लागत, हा मुद्दाही महत्त्वाचा ठरला.
गिरगावातल्या सोनापूर स्मशानभूमीत दहनसंस्कार करणे गर्दीमुळे शक्य होणार नव्हते. कारण गर्दी अनावर झाल्यास चेंगराचेंगरी होण्याचा धोका होता. यामुळे गिरगाव चौपाटीच्या प्रशस्त जागेत दहन केल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही, हे लक्षात आले.
पण ‘नेहमीचे ठिकाण’ सोडून दुसरी एखादी सार्वजनिक जागा शोधायची, तर पोलिसांखेरीज सरकारची परवानगी गरजेची होती. लोकमान्यांचे अनुयायी यासंबंधी मुंबईच्या पोलीस कमिशनरांना जाऊन भेटले. स्मशानयात्रेचा मार्ग ठरविणे पोलीस कमिशनरांना जरुरीचे वाटत होते. अंत्यविधीची जागा ठरल्याविना अंत्ययात्रेचा मार्ग ठरत नव्हता. शेवटी मुंबईचे पोलीस कमिशनर व लो. टिळकांचे अनुयायी यांना चौपाटीवर अंत्यसंस्कार हाच सोयीचा मार्ग दिसला. त्या वेळी मुंबईचे गव्हर्नर पुण्यात होते. त्यांच्याशी तारायंत्राद्वारे संपर्क साधून परवानगी घेण्यात आली.. अखेर एका ‘अटी’वर ही मान्यता देण्यात आली. ‘आज दहन करण्याला चौपाटीची परवानगी आम्ही विशेष प्रसंग म्हणून देतो. तरीही  या दहनभूमीवर पुढे आम्ही कोणताही हक्क सांगणार नाही, अशी कबुली आधी पाहिजे.’ अखेर ही अट मान्य केल्यावरच अंत्ययात्रेला परवानगी मिळाल्याचा उल्लेख न. चिं. केळकर लिखित टिळक-चरित्रात (खंड ३) आहे. अंत्ययात्रेच्या वेळी सरकारी कार्यालये चालू असली तरी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीविषयी शिथिलता पाळण्यात आली होती. शहरातील इतर व्यवहार ‘उत्स्फूर्त’पणेच बंद होते. लाखोंचा समुदाय अंत्ययात्रेत होता आणि मार्गाच्या दुतर्फा लोक गर्दीने उभेही होते. इमारतींच्या गॅलऱ्यांतही माणसे उभी होती.   पंडित नेहरू, बॅ. जीना, शौकत अली, यांसारखी मंडळी अंत्ययात्रेत सहभागी झाली होती. महात्मा गांधींनी स्वत: लो. टिळकांना ‘खांदा’ दिला. तब्बल चार तासांनी अंत्ययात्रा गिरगाव चौपाटीवर पोहोचली व मावळत्या सूर्याच्या साक्षीने लो. टिळकांच्या देहाला अग्नी देण्यात आला.
तिसऱ्या दिवशी  लोकमान्यांचा अस्थिकलश घेऊन ‘स्पेशल ट्रेन’ पुण्यात पोहोचली. पुणे स्टेशनपासून लोकमान्यांच्या अस्थिलकशाची मिरवणूक निघाली. हजारो लोक तीत सहभागी झाले. दोन तासांनी मिरवणूक गायकवाड वाडय़ात पोहोचली.
इतमाम आणि व्यक्तिपूजा
लो. टिळकांच्या स्मारकाची चर्चा सुरू असताना ‘मूकनायक’ ने लिहिले – ‘टिळकांच्या नावाला व कर्तबगारीला साजेल अशा स्मारकाची भूमिका ठिकठिकाणांहून होत आहे. याबद्दल कोणालाही आदरच वाटेल आणि तशा लोकोपयोगी संस्था अस्तित्वात येणेही तितकेच स्तुत्य आहे. पण.. त्यांना कोणी दत्ताचे स्वरूप देत आहेत, तर कोणी चतुर्भुज बनवत आहेत. अशा रीतीने अज्ञ समाजात त्यांचे व्यर्थ देव्हारे माजवून अज्ञ जनतेला भलत्याच मार्गाचे वळण लावले जात आहे, ते केव्हाही गैरशिस्तच आहे.’ व्यक्तिपूजेला विरोध, ही भूमिका डॉ. आंबेडकर ‘मूकनायक’मधूनही सातत्याने मांडत. यानंतर मुंबईत लो. टिळकांचे ‘स्मारक’ गिरगाव चौपाटीवर उभे राहिले, पण ३६ वर्षांनी.. देश स्वतंत्र झाल्यावर!
म. फुल्यांना गुरुस्थानी मानणाऱ्या डॉ. आंबेडकरांची ‘न भूतो..’ अशी महाप्रचंड अंत्ययात्रा मुंबईकरांनी अनुभवली. स्वतंत्र भारतातील मुंबईतील ही पहिलीच दहा लाख जनतेच्या सहभागाची अंत्ययात्रा. ६ डिसेंबरच्या पहाटे झोपेतच डॉ. आंबेडकरांचे नवी दिल्लीतील त्यांच्या २६ अलीपूर रोड या निवासस्थानी निर्वाण झाले. सकाळी दूरध्वनी व आकाशवाणीवरून हे वृत्त वाऱ्यासारखे पसरले. मोठय़ा संख्येने लोक डॉ. आंबेडकरांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी जमू लागले. पंतप्रधान नेहरू डॉ. आंबेडकरांच्या निवासस्थानी आले.
डॉ. आंबेडकरांचे कार्यक्षेत्र खऱ्या अर्थाने मुंबईत राहिल्यामुळे व मुंबईवर त्यांचे विशेष प्रेम असल्यामुळे अंत्यसंस्कार मुंबईत करण्याचा निर्णय झाला. पार्थिव नेण्यासाठी भारत सरकारने इंडियन एअरलाइन्सच्या विशेष विमानाची सोय केली. आकाशवाणीवरून निधनाची बातमी प्रसारित होत असल्यामुळे दुपापर्यंत नवी दिल्लीतील डॉ. आंबेडकरांच्या निवासस्थानी गर्दी उसळली. तेथून विमानतळापर्यंत पार्थिव देह नेला, तो फुलांनी सजवलेल्या ट्रकवरून, पाच तासांच्या मिरवणुकीने. ६ डिसेंबरच्या रात्री नवी दिल्लीहून विशेष विमान मुंबईकडे निघाले व ७ डिसेंबरच्या पहाटे सांताक्रुझ विमानतळावर पोहोचले.
विमानतळावरसुद्धा हजारो आंबेडकर अनुयायी जमले होते. सांताक्रुझ विमानतळ ते डॉ. आंबेडकरांचे दादर येथील राजगृह निवासस्थान येथपर्यंत पोहोचण्यास शववाहिनीस दोन तास लागले.
७ डिसेंबर रोजी भारतातील सर्व प्रमुख वर्तमानपत्रांचे पहिले पान डॉ. आंबेडकरांच्या  निधनाच्या बातमीने भरून गेले होते. न्यूयॉर्क टाइम्स, लंडन टाइम्स, मँचेस्टर गार्डियनने अग्रलेख व विशेष वार्तापत्राद्वारे या दु:खद घटनेची दखल घेतली. मुंबईत शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृहे बंद राहिली. महापालिकेचा नोकरवर्ग, विशेषत: सफाई कामगार कामावर गेला नाही. नागपूर, अहमदाबाद येथे बंद पाळण्यात आला. कापड गिरण्या बंद राहिल्या, रेल्वे हमाल कामावरून घरी परतले.
गिरगाव चौपाटीवर डॉ. आंबेडकरांवर अंत्यसंस्कार व्हावेत ही डॉ. आंबेडकरांच्या अनुयायांची मागणी तत्कालीन राज्य सरकारने मान्य केली नाही.
दुपारी दीड वाजता राजगृह (दादर) येथून मुंबईच्या इतिहासातील ‘न भूतो..’ अशा अंत्ययात्रेला सुरुवात झाली. तब्बल चार तासानंतर ती दादर हिंदू स्मशानभूमीत आली. संध्याकाळी सात वाजता हा ‘ज्ञानसूर्य’ दृष्टिआड झाला. या प्रसंगाचे धावते समालोचन आकाशवाणीवरून झाले, ते त्यावेळी तेथे सेवेत असलेल्या पु. ल. देशपांडे यांनी केले होते.  घटना मसुदा समितीचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री, राज्यसभा सदस्य असूनही शासकीय दुखवटा नाही, याबद्दल या वेळी निषेध व्यक्त झाला. दुसऱ्या दिवशी शिवाजी पार्कवर सर्वपक्षीय शोकसभा झाली. तब्बल सहा लाख लोक त्यासाठी जमले. सरकारने शासकीय दुखवटा जाहीर न केल्याबद्दल सरकारवर टीका करण्यात आली. आचार्य अत्र्यांनी ‘मराठा’तून सलग तेरा दिवस, तेरा अग्रलेख लिहून डॉ. आंबेडकरांचा मोठेपणा वर्णिला. जिथे अंत्यसंस्कार झाले , तेथील  लहानशी जागा संबंधित बौद्ध संस्थेकडे सुपूर्द केली. तिथे कालांतराने एक छोटे स्मारक उभे राहिले. ती ‘चैत्यभूमी’.
आज स्मारकाचे राजकारण सुरू असताना, महाराष्ट्राला घडवणाऱ्या तिघाही महापुरुषांची व त्यांच्या महायात्रांची तसेच स्मारकांबाबत पाळले गेलेल्या औचित्याची आठवण येणे साहजिक आहे. महात्मा फुले यांच्यावरील अंत्यविधी त्यांच्या इच्छेविरुद्ध केला गेला तो लोकांच्या प्रेमादरापोटीच, हेही लक्षात घेणे गरजेचे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा