डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या ही बातमी कानावर पडली. आश्चर्य खचितच वाटलं नाही.
पुरोगामी विचारांचा अंगीकार करणारं महाराष्ट्र सरकार त्यांच्या अंधश्रद्धा निर्मूलनाविषयीच्या (जादूटोणाविरोधी) कायद्यास विधिमंडळात वर्षांनुर्वष अनेकदा तांत्रिक आणि कारकुनी कारणं देत मान्यता देऊ शकलेलं नाही, हे वास्तव आहे.
हत्येमागील कारणं सर्व जगास ठाऊक आहेत. सरकार मारेकऱ्यांना पकडेल इतकंच. प्रश्न उरतो तो इतकाच की मारेकरी ज्या विचारांनी प्रेरित आहेत आणि ज्या संघटनेचे सदस्य आहेत अथवा संबंधित आहेत, त्या संघटनेविषयी सरकारनं काय पावलं उचलली?
मूळ सवाल असा आहे की, सरकार आणि एकूणच शासकीय यंत्रणेला आता वाटणारं दु:ख हे म्हातारी मरण्याचं आहे की काळ सोकावण्याचं?
– गिरीश सुधाकर जोशी, नाशिक
विचारांशी प्रतिवादाचे बळ नसावे?
‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’चे अध्यक्ष आणि ‘साप्ताहिक साधना’ चे प्रमुख संपादक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण हत्येची बातमी ‘लोकसत्ता’च्या संकेतस्थळावर वाचताना सुन्न झालो. स्वत: डॉक्टर असूनही त्या व्यवसायाकडे आपली पाठ फिरवून केवळ समाजकार्य आणि जनजागृतीसाठी डॉक्टरांनी आपले आयुष्य वेचले.
एस एम. जोशी, मधू लिमये यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वांच्या आदर्शाचे त्यांनी खरेखुरे अनुकरण केले, आपली परखड मते मांडली. कदाचित वर्तमान सामाजिक स्थितीला आणि भविष्यातील कालप्रवाहाला त्यांच्या विचारांशी प्रतिवाद करण्याचे बळ नसावे, असा या दुर्दैवी घटनेचा अर्थ असावा. डॉ. दाभोलकर यांना त्रिवार अभिवादन.
पम्मी प्रदीप खांडेकर, माहीम