द गार्डियन या ब्रिटिश, इंग्रजी वृत्तपत्राच्या १९४ वर्षांच्या इतिहासातील पहिली महिला ‘प्रमुख संपादक’ होण्याचा मान कॅथरीन व्हायनर यांनी वयाच्या ४४ व्या वर्षी मिळवला आहे. गार्डियनला पावणेदोनशेहून अधिक वर्षे झाली, तरी या दैनिकाचे ११ संपादक आजवर झाले. यावरून प्रत्येक संपादकाला मिळणाऱ्या दीर्घ कार्यकाळाची कल्पना येते.
कुणाही बडय़ा माध्यमसमूहाच्या भक्ष्यस्थानी न पडता स्कॉट ट्रस्ट या संस्थेकडेच मालकी असलेले, स्वतंत्र बाण्याचे आणि जगभरातील अनेक देशांत पोहोचलेले ‘द गार्डियन’ हे दैनिक आहे. यापूर्वी इंडिपेंडंट आणि सन या दैनिकांच्या रविवार आवृत्त्या, तसेच स्टार आणि इव्हनिंग स्टँडर्ड ही सनसनाटी दैनिके यांच्या संपादकपदी महिला होत्या. वॉशिंग्टन पोस्ट अथवा अन्य काही दैनिकांची मालकी महिलांकडे होती. भारतातही काही मोठय़ा इंग्रजी दैनिकांच्या स्थानिक आवृत्त्यांची संपादकपदे महिलांकडे होती वा आहेत. पण महत्त्वाच्या आणि गंभीर इंग्रजी दैनिकाच्या संपादकपदी स्वकर्तृत्वावर पोहोचलेल्या कॅथरीन या बहुधा पहिल्याच.
वयाच्या २६ व्या वर्षीपासून कॅथरीन ‘द गार्डियन’मध्ये आहेत. २००८ पासून या पत्राच्या डेप्युटी एडिटर पदावर त्या आहेत. मिररच्या संपादक आणि माध्यमसम्राट रूपर्ट मरडॉक यांच्या विश्वासू सहकारी रिबेका ब्रूक्स यांनी बेकायदा चालविलेले फोन टॅपिंग उघड करणारी बातमी त्यांच्या काळात आली होती. अशा अनेक बातम्या त्यांच्या कार्यकाळात आल्या. पुढे त्यांची बदली सिडनी येथे झाली. जे महत्त्वाचे पद कॅथरीन यांना मिळाले आहे, त्यासाठी २६ उमेदवार होते. संपादक-निवडीचे काम स्कॉट ट्रस्टच्या सदस्यांसह एकंदर ८३९ तज्ज्ञांकडे होते. निवडणुकीतील उमेदवारांप्रमाणे प्रत्येकाने आपापली भूमिका लिखित स्वरूपात जाहीर करावी, प्रचाराचे भाषण करावे अशीच गार्डियनची संपादक निवड-प्रक्रिया असते. त्या मतपरीक्षेस कॅथरीन उतरल्या. ‘आजचे वृत्तपत्र तरुणांना हवेसे वाटणारे आणि डिजिटल युगाला साजेसे हवे, समाजमाध्यमांच्या युगातही छापील दैनिक हेच वाद-चर्चाचे व्यासपीठ व्हावे, बातमीदारीवरील भर आणि जागतिक भान सोडता कामा नये, व्यावसायिकता सांभाळताना अगदी जाहिरात विभागाशीही सहकार्य करायलाच हवे आणि वृत्तपत्र हे केवळ गंभीर माध्यम नसते याहीकडे लक्ष पुरवायला हवे’ अशा प्रकारची तेरा सूत्रेच कॅथरीन यांनी निवड-प्रक्रियेदरम्यान ‘प्रचारा’त मांडली होती, ती आता त्यांच्या कारकीर्दीत धसाला लागणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा