संगीताची बाजारपेठ आभासी झाली आणि त्यामुळे त्याच्या व्यापाराचे नियमही बदलले. एचएमव्हीने या सगळ्या बदलांना सामोरे जाताना नव्या मूल्यांचा स्वीकार करणे आवश्यक होते. मात्र तसे झाले नाही ..
थॉमस अल्वा एडिसनने लावलेल्या सगळ्या शोधांमुळे मानवी जीवनात जी सांस्कृतिक क्रांती झाली, त्याबद्दल साऱ्या जगाने त्याचे सतत स्मरण केले पाहिजे. माणसाचा आवाज साठवून ठेवता येईल आणि पुन्हा ऐकता येईल, असे फोनोग्राफ हे यंत्र त्याने विकसित केले नसते, तर आज जगात हजारो कोटी रुपयांची संगीताची बाजारपेठ बहरली नसती. आवाज साठवणे ही माणसाच्या दैनंदिन जगण्याशी थेट संबंधित नसणारी गोष्ट संगीताशी जोडली गेली आणि त्यातून सर्जनशीलतेला वाव देणारी आणि त्याच वेळी संगीताकडे एक क्रयशील वस्तू म्हणून पाहणारी दृष्टी विकास पावली. इंग्लंडमध्ये संगीतकार एडवर्ड एल्गर याने १९२१ मध्ये सुरू केलेल्या ‘हिज मास्टर्स व्हॉइस’ या ध्वनिमुद्रणांची विक्री करणाऱ्या कंपनीच्या अस्तित्वाला घरघर लागल्याची बातमी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होत असतानाच भारतात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी ‘एलएम म्युझिक’ या नावाने आपली स्वत:ची कंपनी सुरू करीत असल्याची घोषणा केली. हे सारे घडत असताना त्यापूर्वी अगदी काहीच दिवस भारतीय संगीताच्या बाजारात ‘आयटय़ून्स’ या स्टीव्ह जॉब्ज याच्या डिजिटल संगीतातील जगातील अग्रेसर कंपनीने पाऊल ठेवले. या साऱ्या घटना एकाच वेळी घडत असताना, त्यांचे परिणाम मात्र वेगवेगळे आहेत आणि त्यामागील कारणेही विविध आहेत. ‘एचएमव्ही’ हे नाव भारतीय संगीताच्या क्षेत्रात ज्या दिमाखाने वावरत होते, त्याला इतिहासजमा होऊनही आता तीन दशके उलटून जात आहेत. मात्र या सगळ्या सांगीतिक व्यवहारांचे मूळ एडिसनच्या फोनोग्राफमध्ये होते आणि त्याला आपल्या या शोधाने साऱ्या जगात किती आशादायी त्सुनामी आल्या, हे मात्र समजू शकले नाही. राइटबंधूंनी केलेल्या विमानाच्या प्रयोगाने आणि एडिसनच्या फोनोग्राफने नंतरच्या पन्नास वर्षांत इतकी मोठी झेप घेतली, याचे कारण त्यातील व्यावसायिकतेमध्ये आहे.
संगीत ऐकण्याने चित्तवृत्ती उल्हसित होतात आणि त्याचा अनुभव पुन:पुन्हा घ्यावासा वाटतो, या मानवी भावनांचे उत्तम बाजारपेठीय उत्पादनात रूपांतर करण्याचे काम एचएमव्हीने केले. प्रचंड प्रमाणात तोटा होत असल्याने या कंपनीने आपला बाडबिस्तरा गुंडाळण्याचे ठरवले आहे, याचे खरे कारण अभिजातता आणि व्यावहारिकता यांची योग्य सांगड कंपनीच्या व्यवस्थापनाला घालता आली नाही. त्यामुळे या घटनेने एका युगाचाच अंत होत असल्याचे आपण सारे अनुभवतो आहोत. भारतात ध्वनिमुद्रणाचे तंत्र १९०२ मध्ये आले, तेव्हा येथे ब्रिटिशांचीच राजवट होती. या तंत्राने त्या काळी आपले सारे लक्ष संगीतावरच केंद्रित केले याचे कारण तेव्हाच्या सामाजिक परिस्थितीत संगीताला फारच प्राधान्य होते. भारतातील झाडून सगळ्या संस्थानांमध्ये राजगवई हे पद अतिशय मानाचे मानले जात होते आणि उच्च दर्जाच्या संगीतकारांकडून संगीताच्या क्षेत्रात सतत नवे प्रयोग होत होते. तंत्र आणि कला यांचा एक अपूर्व संगम ध्वनिमुद्रणाच्या तंत्राने निर्माण झाला असला, तरी त्यामुळे संगीतासमोर अनेक अवघड आव्हानेही उभी राहिली. तंत्राचा हा रेटा विसाव्या शतकातच इतका ताकदवान झाला की, त्यामुळे अनेक क्षेत्रांची पडझड झाली. अनेक गोष्टींची त्वरेने पुनर्माडणी करणे भाग पडले. संगीताच्या बाबतीत तंत्राने आव्हान दिले, तरी त्याचा संगीताच्या सर्वागीण विकासाला उपयोगच झाला. संगीत दूपर्यंत पोहोचण्याची शक्यता तंत्रामुळे व्यक्त झाली आणि कलावंताला प्रत्यक्ष न जाताही त्याचे संगीत जगातल्या कोणत्याही ठिकाणी पोहोचवता येणे शक्य झाले. विनाइलच्या तबकडय़ा आणि ते ऐकण्याचे ग्रामोफोन यंत्र ही त्या काळातील सद्भिरुचीची लक्षणे मानली जात असत. कारण तंत्रज्ञान प्राथमिक अवस्थेत असल्याने त्याची बाजारपेठ निर्माण झाली नव्हती.
इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीनंतरच्या सामाजिक बदलांमध्ये कलांचा वाटा नेहमीच महत्त्वाचा मानला गेला. त्यातही संगीताने तेथील समाजाला एका नव्या रुचीची गोडी लावली. उत्तम संगीताची जाण निर्माण होणे आणि त्याचा व्यवसाय होणे या गोष्टी एकापाठोपाठ कशा घडतात, हे एचएमव्हीने सिद्ध केले. गेल्या नव्वद वर्षांत या कंपनीने संगीताच्या क्षेत्रात आपला जो दबदबा निर्माण केला, तो केवळ उत्तम संगीताच्या जोरावर. मार्क बॅरॉड या प्रसिद्ध चित्रकाराने १८६८ मध्ये तैलरंगात काढलेल्या ग्रामोफोनसमोर बसून एक कुत्रा गाणे ऐकतो आहे, हे चित्र संगीतासाठी मानचिन्ह बनवण्याचे कार्य एचएमव्हीने केले. एचएमव्हीची फक्त इंग्लंडमध्ये २३९ विक्री केंद्रे आहेत. आर्यलडमध्येही कंपनीची मोठी यंत्रणा कार्यरत आहे. आता या कंपनीच्या व्यवहारांवर प्रशासक नेमण्यात आल्याने तिच्या व्यवहारांवरही मर्यादा येणार आहेत.
तंत्रज्ञानातील बदलांचा संगीताच्या व्यवसायाशी थेट संबंध निर्माण झाला, तो गेल्या वीस वर्षांत. म्हणजे जागतिकीकरणाच्या प्रक्रियेला वेग आल्यानंतर जगातले सगळेच व्यवहार आणि व्यापार अधिक वेगाने आणि मुक्तपणे होऊ लागले आणि त्यामुळे संगीताचे इकडून तिकडे जाणे खूपच सुलभ झाले, पण तरीही ध्वनिमुद्रिकांचा व्यवसाय करणाऱ्या एचएमव्हीसारख्या कंपनीला सुरुवातीच्याच काळात नभोवाणीने आव्हान दिले. त्याला यशस्वी टक्कर देत असतानाच कॅसेट या नव्या तंत्राचा उदय झाला. स्वस्त आणि ‘यूजर फ्रेंडली’ कॅसेट प्लेअरमुळे संगीताचा प्रसार सुलभ झाला. नंतर आलेल्या तंत्रज्ञानाने संगीत सर्वच वयोगटांतल्या सर्वाना ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे मिळणे शक्य झाले. इंटरनेटमुळे संगीताची उपलब्धता अधिक वाढली. या सगळ्याचा संगीताच्या व्यापाराशी थेट संबंध होता, हे अनेकांना उशिरा लक्षात आले. एचएमव्हीबाबतही असे घडले नसेल, असे म्हणता येणार नाही. संगीताची बाजारपेठ आभासी झाली आणि त्यामुळे त्याच्या व्यापाराचे नियमही बदलले. एचएमव्हीने या सगळ्या बदलांना सामोरे जाताना नव्या मूल्यांचा स्वीकार करणे आवश्यक होते. तसे झाले नाही म्हणून तोटा वाढत गेला. इतका की तो भरून निघणे कठीण झाले. गेल्या महिन्यातील नाताळच्या काळात खूप विक्री होऊन तोटा कमी होईल, अशी आशा कंपनीला वाटत होती. परंतु ती फोल ठरली आणि त्यामुळे कंपनी प्रशासकांच्या हाती जाणे अटळ बनले. गेल्या नव्वद वर्षांत एचएमव्हीने रसिकांच्या मनात जे स्थान निर्माण केले आहे, ते अढळ आहे. काळाच्या अचाट सामर्थ्यांपुढे एचएमव्हीचे अस्तित्व नामशेष होणे ही त्यामुळेच क्लेशदायक बाब म्हटली पाहिजे.
संगीताच्या बाजारी..
संगीताची बाजारपेठ आभासी झाली आणि त्यामुळे त्याच्या व्यापाराचे नियमही बदलले. एचएमव्हीने या सगळ्या बदलांना सामोरे जाताना नव्या मूल्यांचा स्वीकार करणे आवश्यक होते. मात्र तसे झाले नाही ..
First published on: 19-01-2013 at 12:01 IST
मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: H m v music company in crises