एखाद्या गोष्टीची मनाला सवय का होते? तर त्या गोष्टीमुळे सुख मिळेल, या भावनेने आपण तिला चिकटतो आणि मग तिची सवयच लागते. अर्थात एखाद्या गोष्टीतून सुख मिळते, असा अनुभवही येतो आणि मग त्या गोष्टीच्या सवयीत आपण अडकतो. आपल्या सवयींची जडणघडण ही आपल्या इच्छाप्रकृतीनुसार झाली असते. आपल्या सवयींचे बीज आपल्या इच्छेतच असते आणि इच्छापूर्ती हाच सर्व सवयींचा अंतिम हेतू असतो. आपल्याला वाटते की इच्छा तर अनंत आहेत. प्रत्यक्षात सर्व इच्छा या एकाच इच्छेची प्रतिबिंबे आहेत. कायमचे सुखी व्हावे, हीच ती एकमेव इच्छा आहे! श्रीनिसर्गदत्त महाराज म्हणताते, ‘‘तुम्हाला सुखी असणेच हवे आहे. तुमच्या सर्व इच्छा, मग त्या कोणत्याही असोत, तुमच्या सुखाच्या इच्छेचेच प्रकटीकरण आहेत. मूलत: तुम्हाला आपले भले हवे आहे.’’ आता हे भले कशाने होईल, याचा निर्णय आपल्याला करता येत नाही. ज्या सुखाच्या आशेने आपण सवयींत अडकलो आहोत ते सुख खरं, शाश्वत आणि हितकारक आहे का, हा विचार आपण करीत नसतो. एखाद्याला गोड खायची सवय जडते आणि त्या सवयीचा गुलाम बनून तो इतकं गोड खात राहातो की ते आपल्या प्रकृतीसाठी हिताचं आहे की नाही, याचा विचारही त्याच्या मनाला शिवत नसतो. तेव्हा एखाद्या गोष्टीची आपल्याला सवय होते आणि आपण मग तिचे गुलामच होऊन जातो. ती सवय मोडणे मग कठीण होऊन जाते. श्रीनिसर्गदत्त महाराज म्हणतात की, ‘‘जर तुम्हाला एखादी सवय चटकन मोडता येत नसेल तर परिचित विचारपद्धतीचे निरीक्षण करा आणि तिच्यातील खोटेपणा पाहा. सवयीचे असेल त्याबद्दल शंका घेणे, हे मनाचे कर्तव्यच आहे. जे मनोनिर्मित असेल त्याचा नाश मनाने केला पाहिजे.’’ सवय आपण चटकन मोडू शकत नाही कारण तिला आपणच तात्त्विक पाठबळ दिलं असतं. सवयीच्या अमक्या गोष्टीशिवाय मी राहूच शकणार नाही, असा ग्रह मनाने केला असतो आणि मनच तो पक्का करीत असते. त्यामुळे आपला विचार, धारणा, कल्पना यांची उलटतपासणी आपण कधीच करीत नाही. ती केली तरी एखाद्या गोष्टीचे, सवयीचे आपण जे समर्थन करीत असतो त्यामागील आपल्या स्वार्थी सुप्त हेतंची जाणीव होईल. ही सवय सुटली तर खरा लाभ होऊ शकतो, हेदेखील उमगेल. सवयींच्या ज्या पिंजऱ्यात आपण अडकलो आहोत तो आपल्या मनानेच तयार केला आहे आणि तो पिंजरा आपणच मोडू शकतो, याची जाणीव होईल तेव्हाच सवय कायमची मोडण्याचे प्रयत्न सुरू होतील. आपण मागेच पाहिलं की मनाला आवर घालणं आपल्यालाही साधतं पण तो प्रयत्न तात्पुरता असतो. भांडण सुरू असताना पाहुणे आले आणि पती-पत्नी मनाला आवर घालून एकोप्याने वावरतात पण पाहुणे जाताच पुन्हा भांडू लागतात. तेव्हा मनाला आपण काही काळापुरती मुरड घालतो. परमार्थाच्या मार्गावर सर्वच सवयींना कायमची मुरड घालायची असतेच पण चांगला माणूस बनण्यासाठीही काही सवयींना कायमची मुरड घालावीच लागते.