मोठमोठय़ा पदांमुळेच जिथे माणसे ओळखली जातात त्या शहरात, दिल्ली सरकारने स्थापन केलेल्या ‘सामुदायिक विकास समिती’च्या सदस्य, ही शांता वाघ यांची सध्याची ओळख.. यापेक्षा महत्त्वाचे आहे ते त्यांचे समाजकार्य आणि त्यामागे असलेल्या तळमळीतून आलेली, गरिबांशी आणि सरकारी/ बिगरसरकारी यंत्रणांशी संवाद साधण्याची त्यांची क्षमता. ही क्षमताच त्यांच्या संघर्षांची ऊर्जा आहे..
आपण जिथे राहतो, त्याच वस्तीतील गरिबांना हक्क मिळवून देण्यासाठी संघर्ष करणे ही सोपी गोष्ट नव्हे. दिल्लीसारख्या निर्ढावलेल्यांच्या शहरात आपल्या वस्तीतील लोकांच्या मानवी हक्कांसाठी अर्धशिक्षित शांता वाघ यांनी केलेला संघर्ष महत्त्वाचा ठरला आहे. प्रस्थापितांना समजेल अशा कायदेशीर मार्गाने संघर्ष करीत गरिबांसाठी जगण्याचे घटनादत्त अधिकार खेचून आणण्याची क्षमता शांता वाघ यांनी सिद्ध केली आहे.
दिल्लीतील वंचित व उपेक्षितांच्या वस्त्यांमध्ये सरकारने दिलेल्या हमीनुसार अन्नाच्या अधिकाराचे पालन वस्त्यांमध्ये होते की नाही, याची वस्तुस्थिती जाणून घेण्याचा हय़ूमन राइट्स लॉ नेटवर्क आणि अन्य स्वयंसेवी संस्थांनी प्रयत्न केले असता नांगलोईच्या भीमनगर वस्तीतील स्वस्त धान्य दुकान उघडतच नसल्याचे निदर्शनाला आले. गर्भवती महिलांना पोषक आहार उपलब्ध करून देण्याच्या सरकारच्या हमीची अंमलबजावणीच होत नव्हती. त्या दुकानातून शांता वाघांना रेशनकार्डावर धान्य मिळायचे. पण तो दुकानदार इतर गरिबांचे बीपीएल कार्ड फेकून द्यायचा. त्याच्यावर दबाव आणण्यासाठी शांता वाघांनी सहा महिने रेशन उचललेच नाही. पण त्या दुकानदाराने, तुम्हाला जे करायचे ते करा, अशा शब्दांत धुडकावून लावले. शेवटी त्याच्या विरोधात हय़ूमन राइट्स लॉ नेटवर्कच्या माध्यमातून दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. या प्रक्रियेत शांता वाघांनी पुढाकार घेतला आणि दहा बीपीएल कार्डधारकांचे प्रकरण लढताना समुदायाचे नेतृत्व केले. वस्तीतील लोकांमध्ये त्यांच्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी माहिती दिली. परिणामी स्वस्त धान्य दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याच्या दुकानाचा परवाना न्यायालयाने रद्द केला. भीमनगरवासीयांच्या रेशनची व्यवस्था दुसऱ्या दुकानातून करण्यात आली. या यशामुळे शांता वाघ यांच्या नेतृत्वाला धार चढली.
नांगलोईच्या ज्वालापुरीतील बाराशे लोकवस्ती असलेल्या भीमनगरमधल्या झोपडपट्टीत राहणाऱ्या शांता वाघ या वस्तीतील समुदायाचे नेतृत्व करतात. अनधिकृत झोपडपट्टीतील पक्के घर हीच त्यांची मिळकत. आपले हक्क मिळविण्यासाठी काय करावे, हे गरिबांना ठाऊक नसते. कुणाचे रेशन कार्ड बनले नाही, सरकारी इस्पितळांमध्ये अर्भकांच्या शुश्रूषेची व्यवस्था झाली नाही, रेशन दुकानदार किंवा रेशन कार्ड करणारी कार्यालये ऐकत नसतील तर स्थानिक नेत्यांना गाठून, सरकारी कार्यालयांमध्ये जाऊन वस्तीतल्यांचे प्रश्न सोडविण्याचे किंवा कायदेशीर मार्गाने न्यायालयात दाद मागून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे शांता वाघ यांचे प्रयत्न असतात. आपल्या वस्तीतील बहुतांश लोकांना बीपीएल रेशन कार्ड मिळवून देण्यात शांता वाघ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आरोग्यसेवेपासून वंचित राहणाऱ्या, रुग्णवाहिकेसाठी ताटकळत राहणाऱ्या, घरे तोडल्या गेलेल्या लोकांना मदत मिळवून देण्यासाठी कोणाशी संपर्क करायचा, कोणाला फोन करायचा, कोणाला गाठायचे हे शांता वाघ यांना ठाऊक आहे. स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून मुंडका वार्ड क्रमांक ३०च्या सदस्य बनल्या. दिल्ली सरकारने स्थापन केलेल्या सामुदायिक विकास समितीच्या त्या नांगलोई क्षेत्राच्या अध्यक्ष आहेत. सुवर्णजयंती शहरी रोजगार योजनेच्या माध्यमातून झोपडपट्टीतील बेरोजगारांना स्वयंरोजगारासाठी-चहा, कापडाच्या किंवा किराण्याच्या दुकानासाठी बँकांकडून कर्ज मिळवून देणे, त्यांची ओळखपत्र तयार करून देण्यातही त्यांची भूमिका महत्त्वाची असते. सध्या रेहडी पटरी संघटनेसाठी त्यांचा संघर्ष सुरू आहे.
गरिबांचे बीपीएल रेशन कार्ड तयारच होत नाही. श्रीमंतांचीच होतात, अशी त्यांची तक्रार असते. नांगलोई क्षेत्र खूप मोठे आहे. आपल्याच वस्तीत काम केले पाहिजे, असे आवश्यक नाही, असे त्या म्हणतात. शांता वाघ यांच्या कार्यात हरयाणा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रातील लोकही सहभागी झाले आहेत. तुमच्यासाठी मीच लढणार काय, तुम्हीही लढा, असे ठणकावून सांगत गरिबांमध्ये हक्क मिळविण्यासाठी त्या संघर्षांची प्रेरणा निर्माण करतात. त्यांच्या झोपडपट्टीत अशोक वानखेडे यांच्यासह दहा-पंधरा मराठी कुटुंबे आहेत. आरोग्यसेविका जानकी आणि शहजाद यांच्यासारख्या सक्रिय लोकांची त्यांना मदत होते. वस्तीतील कष्टकरी महिला आपापल्या कामांमध्ये व्यस्त असतात. त्यामुळे त्यांचा वेळ वाया जाणार नाही, याचीही काळजी त्या घेतात. काम करण्यासाठी त्या लोकांकडून पैसे घेत नाहीत. लाच घेतली असती तर आपल्यावर झोपडपट्टीत राहण्याची वेळ आली नसती. बंगल्यात राहून ऐषारामात जगता आले असते. समाजात चार चांगले लोक असतील तर चार वाईटही असतात. काही लोक केलेली मदत लक्षात ठेवतात. काहींना कितीही मदत केली तरीही त्याविषयी कृतज्ञता नसते. कुणाचे काम केले तर चांगले शब्द नाही तर वाईट तर बोलतील, अशा निरपेक्ष भावनेने त्या काम करीत असतात.
वस्तीतील लोकांच्या लहानसहान समस्या स्थानिक अधिकारी, लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून कशा सोडवायच्या किंवा त्यासाठी कायद्याची कशी मदत घ्यायची, याबाबतीत शांता वाघ यांच्या माध्यमातून समुदाय जागरूक आणि विकसित झाला. स्वत:चे आणि समुदायाचे प्रश्न आपल्या पातळीवर सोडविण्यात शांता वाघ यांचे नेतृत्व सक्षम झाले. अधिकारांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी हे दुर्मीळ आणि आदर्श मॉडेल आहे, असे ‘नजदीक’ या स्वयंसेवी संस्थेच्या अॅड. जयश्री सातपुते यांना वाटते. अनेक सरकारी व बिगरसरकारी संस्थांशी त्यांचा संपर्क आहे. शांता वाघ यांनी विकसित केलेल्या या आदर्श मॉडेलची सर्वत्र पुनरावृत्ती झाली तर ते स्वयंपूर्ण होऊन गरिबांचे प्रश्न स्थानिक पातळीवरच सुटायला हातभार लागेल, असे सातपुते यांचे मत आहे.
पन्नाशीच्या घरात असलेल्या शांता वाघ यांचा जन्म उस्मानाबाद जिल्हय़ातील उदगीरमधील लोणी गावचा. वडील शंकरराव कांबळे घरबांधणी, रस्त्यांची कामे यासारख्या ठेकेदारीच्या व्यवसायात दिल्ली, भोपाळ, भिलाईसारख्या शहरांमध्ये काम मिळेल तिथे सहकुटुंब जायचे. अशा फिरस्तीत शांता वाघ यांचे आठवीपर्यंत शिक्षण झाले. दिल्लीत असताना चंद्रविलास वाघ यांच्याशी त्यांचा विवाह झाला. चाळीसगावमधील शिक्षकीचा पेशा सोडून दिल्लीत स्थायिक झालेले शिवाजी वाघ त्यांचे सासरे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिकवणीनुसार समाजसेवा करायचे. संसदेसमोर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी शिवाजी वाघ यांनी दिल्लीत दादासाहेब गायकवाड यांच्यासोबत आंदोलन केले. सासऱ्यांकडे लोकांची सतत वर्दळ असायची. ते अनेकांची कामे करीत. शांता वाघ विवाहानंतर त्या घरकामातच व्यस्त असायच्या. पण अशी परिस्थिती ओढवली की त्यांना पोट भरण्यासाठी काम करावेच लागले. त्यासोबतच त्यांनी सामाजिक कार्यही सुरू केले. त्यांचे पती चंद्रविलास दिल्ली विकास प्राधिकरणात नोकरी करीत होते. नोकरी सोडून त्यांनी चहाचे दुकान सुरू केले. दहा वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. शांता वाघ यांना दोन मुले आहेत. अठराविश्वे दारिद्रय़ आणि शैक्षणिक उपेक्षेचा फटका त्यांनाही सहन करावा लागला आहे. त्यांच्या मुलाला आरक्षणाचा फायदा मिळू शकला नाही. आठवीपर्यंत शिकलेला त्यांचा मोठा मुलगा नंदू ड्रायव्हर आहे. पतीच्या निधनानंतर त्याने घर चालविण्याची जबाबदारी स्वीकारली. घरचा चहाच्या दुकानाचा व्यवसाय आणि एसटीडी पीसीओचे काम त्याने सांभाळले. त्याची कमाई सहा हजार रुपये. घरात तीन सदस्य. धाकटा मुलगा अशोक बारावीनंतर पुढे कसा शिकेल, याची चिंता त्यांना भेडसावत असते. शांता वाघ यांचा नातेवाईकांशी फारसा संबंध येत नाही. दिल्लीतच राहणारे त्यांचे दोन्ही दीर, प्रेमनगरमधील सुधाकर वाघ आणि निहाल विहारमधील मधुकर हयात नाहीत. दिल्लीतील ठेक्याची कामे संपल्यानंतर वडील आणि दोन्ही भाऊ चंद्रपूरमध्ये शेती करतात. त्यांच्या थोरल्या भगिनी पद्मनाबाई माने उदगीरला राहतात.
डॉ. आंबेडकरांनी संविधानाद्वारे दिलेले पूर्ण अधिकार समाजातील वंचित, उपेक्षित वर्ग पदरी पाडून घेऊ शकत नाही. त्याची माहिती पुस्तकांतूनही दिली जात नाही. आंबेडकरांनी दिलेल्या अधिकारांची माहिती करून घ्या, असे त्या लोकांना सांगतात. दलित युवकांनी शिक्षण आणि बुद्धीच्या बाबतीत कुणापेक्षाही कमी ठरू नये. ऐषारामात पडू नये. समाजाप्रतीची आपली जबाबदारी समजून समाजाला जागरूक आणि संघटित करून खरी सेवा करावी, असे विचार त्या महिला व मुलांच्या बैठकीत मांडतात. अंत:करणात काम करण्याची भावना असली तर मनुष्य बरेच काही करू शकतो. मग तो पुरुष असो वा महिला. जन्म वाया जाऊ नये. काही तरी करायला हवेच. येणाऱ्या पिढीला प्रेरणा देणे आवश्यक आहे. शहरांमध्ये आरक्षणाचा लाभ गरिबांऐवजी सुखवस्तूंनाच मिळतो, असा निष्कर्ष काढताना शिक्षणव्यवस्थेतील विषमतेवर त्या नेमकेपणाने बोट ठेवतात. चांगल्या घरचे लोक आपल्या मुलांना चांगल्या शाळांमध्ये शिकवतात. गरिबांच्या मुलांना सरकारी शाळेत शिकावे लागते. ते दहावी पास झाले, तरी अकरावीत नापास होतात. त्यांना चांगले शिक्षणच उपलब्ध होणार नसेल तर आरक्षणाचे फायदे कसे मिळणार, पैसा नसेल तर बारावीनंतर गरिबाचा मुलगा शिकेल कसा, असा त्यांचा सवाल असतो. समान शैक्षणिक वातावरणाचा लाभ गरिबांना मिळावा, अशी त्यांची अपेक्षा असते.
पैशासाठी हपापलेल्या दिल्लीसारख्या शहरात झोपडपट्टीत राहून समाजाच्या उत्थानाचा विचार करणाऱ्या शांता वाघ यांचे चिंतन भल्या भल्यांना अंतर्मुख करणारे आहे.. आयुष्यात सुख असते तर हक्कांची जाणीवच झाली नसती. आयुष्यात सदैव दु:खच मिळाले. सुख कधी मिळालेच नाही आणि मिळणारही नाही आशाही नाही. ऊन, थंडी, वारा, पाऊस, वादळ यांची पर्वा न करता गोरगरिबांच्या प्रश्नांसाठी लढण्यातच त्यांना सुख लाभले आहे. त्यांच्या मते झोपडपट्टीत सारेच दलित असतात. खाणे, पिणे, जगणे आणि शिक्षणाची विपन्नावस्था असलेले म्हणजे दलित अशीच त्यांची व्याख्या आहे. बाबासाहेबांनी, जोतिबा फुले, सावित्रीबाईंनी आमच्यासाठी एवढा संघर्ष केला आता आम्ही त्यांचे काम पुढे चालविले नाही तर जगण्याला अर्थ काय, असा त्यांचा प्रश्न असतो.
जगण्याच्या संघर्षांतील ‘सुख’
मोठमोठय़ा पदांमुळेच जिथे माणसे ओळखली जातात त्या शहरात, दिल्ली सरकारने स्थापन केलेल्या ‘सामुदायिक विकास समिती’च्या सदस्य, ही शांता वाघ यांची सध्याची ओळख.. यापेक्षा महत्त्वाचे आहे ते त्यांचे समाजकार्य आणि त्यामागे असलेल्या तळमळीतून आलेली, गरिबांशी आणि सरकारी/ बिगरसरकारी यंत्रणांशी संवाद साधण्याची त्यांची क्षमता. ही क्षमताच त्यांच्या संघर्षांची ऊर्जा आहे..
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 08-06-2013 at 12:52 IST
TOPICSरेशन
मराठीतील सर्व राजधानीवर मराठी मोहोर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Happiness of conflicts in life