हे उद्रेक राजकारण्यांच्या आश्वासनाइतकेच बेगडी ठरू नयेत. नायक आणि खलनायक दोन्ही आपल्यामध्येच असतात. कोणत्या भूमिकेला प्राधान्य द्यायचे हे ठरवण्याचे संस्कार आपण अंगी बाणवले पाहिजेत..
जंगलात वणवे लागतात तेव्हा कितीतरी दिवस सारे रान जळत राहते. दिल्लीतल्या वासनाकांडामुळे पेटलेला लोकक्षोभाचा वणवा वाढतच चालल्याचे चित्र आहे. तरुणाई प्रक्षुब्ध झाली आहे. शासनाच्या नाकर्तेपणाचा कळस झालेला असल्याने कोणालाच सुरक्षितता वाटत नाही. जमाव रस्त्यावर उतरला आहे. आता आपण काय करायचे ते त्याला माहीत नाही. शासन भेदरून गेले आहे. पोलीस जमावावर पाणी, गॅस, काठय़ा यांचा मारा करून गर्दी उधळून लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. गृहमंत्री कारवाईची आणि भविष्यात सुरक्षा व्यवस्था चांगली करण्याची आश्वासने देत आहेत. थोडक्यात, अराजक माजले आहे.
कायदे करणे, कडक शिक्षेची तरतूद करणे, बसमध्ये-लोकलमध्ये पोलीस ठेवणे, रस्त्यावरची गस्त वाढवणे, फास्ट ट्रॅक कोर्ट, असे काय काय सुचवले जात आहे. स्त्रियांना असुरक्षित वाटते यासाठी बालविवाह करावेत असे म्हणण्यापर्यंत काहीजणांची मजल गेली. दिल्लीतल्या उद्रेकामध्ये रए इ उऌडकउए डठछ असेही फलक दिसले. टी.व्ही. चॅनेलवरच्या चर्चेत बलात्काराचे खटले चालू असलेल्या व्यक्तींना राजकीय पक्ष उमेदवारी देत असल्याची चर्चा झाली. हे तर भयानक आहेच, पण त्यांना लोक बहुमताने निवडून देतात हे त्याहूनही भयानक आहे.
हे सारेच प्रकार चेहऱ्याला काळे लागले आहे म्हणून आरसा स्वच्छ पुसण्यासारखे आहेत. कोणी, कोणाचे आणि कोणापासून रक्षण करायचे आहे? उद्या कुटुंबातल्या स्त्रियांचे घरातल्याच पुरुषांपासून रक्षण करायसाठी घराघरात पोलीस नेमण्याची पाळी येईल. कायद्याची अंमलबजावणी आपणहून करण्याची शिस्त ज्या समाजात नाही त्या समाजात अराजकच माजते. उपाय नुसत्या मलमपट्टीचेच नव्हे तर भलतीकडेच होत आहेत.
सर्वाना समान कायदा इथपासून सुरुवात करून त्यांतून स्वत:ला आणि स्वत:च्या नातेवाइकांना वगळण्याच्या पळवाटा शोधल्या जातात. त्याचा शेवट कोणालाच शिक्षा करायची नाही इथपर्यंत होतो. मग आपोआपच सारे समान होऊन जातात. आमच्या युवापिढीसमोर आदर्श म्हणजे बालिश हिंदी चित्रपटांतले नायक आणि खलनायक. त्यातले नायकसुद्धा मुलींची छेडखानी करण्यात पटाईत असतात. खलनायक तर वाटेल ते करायला मोकळे. कायदा पाळून कोणाला शिक्षा करता येत नाही असे वास्तव आहे. मग कायदा हातात घेऊन हिंसा करणे हाच न्याय करण्याचा उत्तम मार्ग असे ठसवले गेले आहे. नायक पोलीस अधिकारी असला तर तो युनिफॉर्ममध्ये बीभत्स नाच करत असतो आणि दुष्टांना शिक्षा करण्याचे काम स्वत:च करून टाकतो. वासना चालवणारी दृश्ये असलेला चित्रपट जास्त लोकप्रिय होतो.
नायक आणि खलनायक दोन्ही आपल्यामध्येच असतात. कोणत्या भूमिकेला प्राधान्य द्यायचे ते आपले संस्कार ठरवतात. स्त्री ही दुय्यम दर्जाची, उपभोग्य वस्तू असेच संस्कार माध्यमेच नव्हे तर कुटुंबातल्या व्यक्तीसुद्धा स्वत:च्या वर्तनाने करत राहतात. मग संधी मिळाली की खलनायक जागा होतो. कायदा पाळला जाण्याचे दडपण नसले, शिक्षा होण्याचे भय नसले की मग तर खलनायकच प्रगट होण्याची संधी शोधत राहतो. आपले चारित्र्य आणि शील आपणच जपायचे असते. चांगले काय आणि वाईट काय हे शोधणारी विवेकबुद्धी सतत जागी ठेवून फक्त चांगले तेच करण्याचा निग्रह आपल्याला पाळता यायला हवा. तरच समाजात सुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकेल.
स्त्रियांची छेडखानी करणाऱ्या, बलात्कार करणाऱ्या पुरुषाला वाळीत टाकण्याऐवजी त्या स्त्रीलाच बहिष्कृत केले जाते. ज्याला शक्य असेल त्याने तिचा पत्नी म्हणून स्वीकार करायला हवा. पण इतर पुरुषांनी तिला बहिणीसारखे वागवून समाजात प्रतिष्ठा दिली पाहिजे. बलात्कारित स्त्रीलाच बहिष्कृत म्हणून जीवन नकोसे करण्याची विचारसरणी षंढांची आहे. उलट स्त्रियांची छेडखानी करणाऱ्या, बलात्कार करणाऱ्याला बहिष्कृत करण्याची मर्दानगी समाजाला दाखवता यायला हवी. मग तो कितीही मोठा सत्ताधीश का असेना!
जिममध्ये जाऊन बलाची उपासना करणाऱ्यांची संख्या वाढते आहे, पण त्याबरोबरच स्त्रियांवरच्या अत्याचारांची संख्याही प्रचंड प्रमाणात वाढते आहे. तक्रार करण्याने आपलीच अब्रू जाईल या भयाने तक्रारही होत नाही. समाजाचा विवेकाचा आणि चारित्र्याचा पाया पूर्ण ढासळला असल्याचे हे द्योतक आहे. बळाचा वापर इतरांच्या आणि मग स्वत:च्या रक्षणासाठी करायला हवा. अन्याय करण्यासाठी आणि इतरांना चिरडण्यासाठी नाही.
अत्याचाराचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या युवकांना आणि युवतींना हे समजायला हवे की त्यांचे रक्षण जगातले कोणतेच शासन करू शकणार नाही. त्यांच्यातला विवेक आणि निग्रह जागा झाला तरच ते स्वत:चे आणि समाजाचेही रक्षण करू शकतील. हजारो पोलीस नवीन भरती झाले तरी ते स्वत:च्या वासनातृप्तीसाठी वाटेल ते करू पाहणाऱ्या समाजातूनच येणार आहेत. युनिफॉर्मबरोबरच त्यांना सत्ताही मिळणार आहे. तिचा दुरुपयोग ते करणार नाहीत याची खात्री कशी देता येईल. परत गणवेष चढवणाऱ्यांनीच नियम पाळायचे आणि इतरांनी ते मोडत राहायचे यांनी सुव्यवस्था कशी निर्माण होणार?
ज्यांना स्वत:च्या सुरक्षेसाठी शेकडो संरक्षकांचा ताफा सोबत घेऊन फिरावे लागते ते आपली सुरक्षा करतील अशी आशा बाळगणे म्हणजे केवढा भाबडेपणा आहे! लढाई बाहेरच्या दुष्टांशीच नाही तर आपल्यातल्याच खलनायकांशी आहे. अन्याय कोणावर करणार नाही आणि कोणावर होऊ देणार नाही असा निर्धार तरुणाईने करून तो कसोशीने अमलात आणायला हवा. तरच देश सध्याच्या अराजकाच्या गर्तेतून बाहेर पडू शकेल. पण सुरुवात स्वत:पासूनच करायची आहे. नाहीतर हे उद्रेक राजकारण्यांच्या आश्वासनाइतकेच बेगडी ठरतील. स्त्रीची प्रतिष्ठा जपण्याची जबाबदारी प्रत्येकावर आहे. त्यात स्त्रियांसुद्धा आल्या. ही जबाबदारी निभावता आली नाही तर आपल्याला मानाने जगता येणे शक्यच होणार नाही.
आपल्या पराक्रमाच्या, मर्दानगीच्या कल्पनाच चुकीच्या आहेत. अन्याय करून मर्दपणा सिद्ध करायचा नसतो, तो न्यायासाठी लढायला उभे राहून सिद्ध होत असतो. दुर्बलांवर, त्यातून स्त्रियांवर, अन्याय-अत्याचार करून सिद्ध होतो तो षंढपणा. मर्दानगी नव्हे. हे उमजले तरच बलाच्या उपासनेला अर्थ आहे.
२०१२ चे वर्ष कसे आणि केव्हा संपले ते कळले नाही. म्हणजे माझ्या बाबतीत तरी ते चांगलेच गेले म्हणावे लागेल. अर्थात यात ‘लोकसत्ता’चा फार मोठा वाटा आहे. ही लेखमाला लिहायला सुरुवात केली तेव्हा वाचकांच्या प्रतिसादाबद्दल मी थोडा साशंक होतो. पण पहिल्यापासूनच भरभरून प्रतिसाद आला. फोन, एसएमएस, ईमेल प्रचंड प्रमाणात आले. अनेक वाचकांबरोबर संवाद झाला, नवी मैत्री झाली. लिखाण आवडल्याचे कळवण्याची आपल्याकडे फारशी पद्धत नाही, अशीच माझी समजूत होती. तो गैरसमज गेल्या वर्षभरात दूर झाला. अर्थात काहीजणांनी जे पटले नाही तेही कळवले, पण ते तर व्हायलाच हवे. नाहीतर आपले विचार एकांगी होण्याचा धोका असतो. आपले लिखाण वाचले जात आहे आणि बहुसंख्यांना ते आवडते आहे हे फार आनंददायक असते. तो आनंद मला दिल्याबद्दल सर्व वाचकांचे आभार, आणि ही संधी दिल्याबद्दल ‘लोकसत्ता’चेसुद्धा!
निरोप घेताना २०१३ साठी सर्वाना शुभेच्छा द्याव्या असे वाटते..
सर्वाचा विवेक जागा राहो आणि इतरांनाही त्यापासून स्फूर्ती मिळो, म्हणजे सर्वाच्याच वाटय़ाला आनंद येवो!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा