परमार्थ हा समजुतीचा आहे, उगीच कष्ट करण्याचा नाही, असं महाराज सांगतात. त्याचबरोबर ‘भगवंतासाठी कष्ट करायला नकोत, त्यात कष्टाचं प्रेम अधिक आहे’, असंही सांगतात. असं असलं तरी एक कष्ट मात्र परमार्थात अनिवार्य आहे! कोणतं आहे ते कष्टं? श्रीमहाराज सांगतात, ‘‘परमार्थामध्ये मनाचे कष्ट आहेत, कारण आपल्याला मनाच्या आजपर्यंतच्या सवयींच्या उलट जायचे आहे’’ (चरित्रातील परमार्थविषयक बोधवचने, क्र. ४२). मनाविरुद्ध जाऊन परमार्थात उच्चशिखर गाठणाऱ्या एका नाथांची कथा प्रसिद्धच आहे. गोरक्षनाथ एकदा भर दुपारी उन्हात फिरत गोदावरीच्या तटावरील भामानगरात एका जंगलवाटेशी आले. पोटात भूक लागली होती. तोच त्यांचं लक्ष एका शेतात गेलं. तिथे माणिक नावाचा एक पोरसवदा शेतकरी जेवणासाठी बसतच होता. गोरक्षांनी ‘आदेश’ असा उच्चार करताच तो हात जोडून म्हणाला, आपली काय सेवा करू? गोरक्षांनी भूक लागल्याचे सांगताच त्यानं आपली शिदोरी त्यांच्यापुढे ठेवली. गोरक्षनाथ क्षुधाशांतीने तृप्त झाले. त्यांनी माणिकला सांगितलं की मी आनंदलो आहे तुला हवं ते माग. माणिक म्हणाला, एकवेळचं जेवणही तुम्हाला भिक्षेत मिळवावं लागतं मग मला कुठून काय द्याल? त्यापेक्षा तुम्हालाच आणखी काही हवं असेल तर मागून घ्या आणि आपल्या वाटेला लागा! गोरक्षनाथ हसले आणि म्हणाले, बघ हं! देशील ना मी मागेन ते? माणिक जोरात उत्तरला, हो नक्की देईन. मग गोरक्षनाथ म्हणाले, ‘जें जें आवडेल तुझे चित्तीं। तें तू न करीं महाराजा।।’ मग म्हणाले, ‘कांही एक इच्छील तुझें मन। तें तूं न करणें हेंचि मागणें।।’ तुझ्या चित्ताला जे जे आवडतं ते करणार नाही आणि तुझ्या मनात जी जी इच्छा येईल तिच्यानुसार धडपडणार नाही, असं वचन मला दे! माणिकनं वचन दिलं. गोरक्षनाथ निघून गेले. माणिकही ‘घरी जावं’ म्हणून निघाला अन् त्याला अचानक जाणवलं, ‘घरी जावं’ हीसुद्धा इच्छाच की! मग तो तिथंच थांबला आणि सुरू झाली एक न संपणारी उग्र तपश्चर्या.. भूक लागली. खायची इच्छा झाली. खाणं सोडलं. उभं राहून पाय दुखू लागले. बसायची इच्छा झाली. बसणं बंद! सर्व आराम, खाणं-पिणं, व्यवहार सोडून त्या एकाच जागी माणिक निश्चल झाला. काही महिन्यांनी गोरक्षनाथ त्याच भागांतून जात होते तेव्हा त्यांना त्याची आठवण झाली. ते शेतात आले तेव्हा हाडांचा सापळा झाल्यागत माणिक तिथेच उभा होता. मुखाने केवळ नाम सुरू होतं. गोरक्षांचा हा शिष्य अडबंगीनाथ म्हणून प्रसिद्ध झाला. आपल्यासारख्या साधकांनादेखील ही कथा बरंच काही शिकवते. एक गोष्ट खरी की आपल्याला काही नाथ बनायचं नाही की तपस्वीही बनायचं नाही. आपल्याला साधक बनायचं आहे पण त्याआधी माणूस बनायचं आहे! त्यामुळे मनात येणारी प्रत्येक इच्छा आपल्याला सोडता येणार नाही. हट्टानं तसं काही करायला गेलो तर इच्छा अधिकच उग्र बनून आपला ताबा घेतील. मग काय करावं?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा