हा महिना जगभरातील शास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि लेखकांसाठी औत्सुक्याचा आणि उत्कंठेचा राहणार आहे. कारण येत्या आठवडय़ापासून नोबेल पुरस्कारांची घोषणा केली जाईल. साहित्याचा नोबेल पुरस्कार आठ ऑक्टोबरला जाहीर होईल. त्यासाठी कुणाकुणाची नावे चर्चेत आहेत याची चर्चा सध्या पाश्चात्य प्रसारमाध्यमांमध्ये चालू झाली आहे. ‘द गार्डियन’ने दिलेल्या वृत्तानुसार जपानी कादंबरीकार हारुकी मुराकामी यांचे नाव सध्या सर्वात आघाडीवर आहे. त्यानंतर अमेरिकन लेखक जॉयस कॅरोल ओटस, हंगेरियन लेखक पीटर नादास, कोरियन कवी को उन आणि कॅनडियन कथालेखक अॅलिस मन्रो यांचा समावेश आहे.
हारुकी मुराकामी यांचे नाव नोबेल पुरस्काराच्या यादीत गेली दहा वर्षे सातत्याने येत आहे. पण या वर्षी ते सर्वात आघाडीवर आहेत. लवकरच त्यांची नवी कादंबरीही इंग्रजीत प्रकाशित होत आहे. त्यामुळे ती आतापासूनच चर्चेत आली आहे. आणि या वर्षीचा सर्वाधिक सट्टाही मुराकामी यांच्याच नावाने खेळला जातो आहे. गतवर्षीचे नोबेल चिनी कादंबरीकार मो यान मिळाले आहे. त्यामुळे परत आशियाई लेखकाचा विचार केला जाईल की नाही, याविषयी शंका आहे. पण मुराकामी यांच्या नावाची चर्चा आशियाई साहित्यजगतात चैतन्य निर्माण करणारी आहे हे मात्र नक्की.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा