वृत्ती आणि निवृत्ती एकाच नाण्याच्या दोन बाजू. सर्वसामान्य कर्मचाऱ्याच्या निवृत्तीला बंधन असतं. परंतु खेळाडूच्या आयुष्यात निवृत्तीला वय नसतं. तुमच्या कारकिर्दीचा आलेख खाली झुकला, तुमची संघातील गरज संपली, केवळ तुमचा अनुभव किंवा पूर्वयशाच्या बळावर तुम्ही संघात स्थान टिकवून आहात, यापैकी कोणतंही कारण असू द्या. खेळाडूनं तिथंच नेमकं थांबायला हवं. ‘‘आयुष्य म्हणजे वेळ,’’ असं कार्ल लुइस म्हणायचा. पण या वेळेचं महत्त्व सर्वानाच उमगत नाही. खेळाडू देशापेक्षा आणि संघापेक्षा मोठे होतात आणि नेमकी तिथेच समस्या उद्भवते.  क्रिकेटमध्ये ज्याच्या फलंदाजीने गेली दोन दशके क्रिकेट रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले तो सचिननामाचा करिश्मा गेली दोन वष्रे उतरंडीला लागला आहे. परंतु धावांसाठी झगडणारा हा चाळिशीचा महानायक निवृत्तीपासून पळ काढत आहे. नेमकी हीच स्थिती १७ गँड्र स्लॅम विजेतेपदे नावावर असणाऱ्या टेनिस जगताचा बादशाह रॉजर फेडररची आहे. अमेरिकन खुल्या टेनिस स्पध्रेच्या चौथ्या फेरीत टॉमी रोब्रेडो या फारसं नाव नसलेल्या खेळाडूकडून पराभूत झाल्यानंतर फेडररबाबत निवृत्तीची हीच हाक अधिक ज्वलंत झाली आहे. कारण गँड्र स्लॅम स्पध्रेत २००२नंतर प्रथमच तो सरळ सेटमध्ये एखाद्या खेळाडूकडून पराभूत झाला होता. ‘फेडरर एक्स्प्रेस’ किंवा ‘फेडेक्स’ टोपणनावानं ओळखल्या जाणाऱ्या ३२ वर्षीय फेडररच्या यशाची गाडी आता मंदावली आहे. या वर्षी एकाही ग्रँड स्लॅम जेतेपदावर नाव न कोरू शकणाऱ्या फेडररचा सध्या जागतिक क्रमवारीत सातवा क्रमांक आहे. २००३च्या विम्बल्डन जेतेपदानंतर फेडरर नावाचं गारूड टेनिसरसिकांवर राज्य करू लागलं. राफेल नदाल, नोव्हाक जोकोविच, अँडी मरे, अँडी रॉडिक अशा अनेक आव्हानांचा मुकाबला करीत फेडरर यश मिळवत होता. फ्रेंच खुल्या स्पध्रेचे मातीचे (क्ले) कोर्ट असो, विम्बल्डनचे हिरवळीचे (ग्रास) कोर्ट असो किंवा ऑस्ट्रेलियन आणि अमेरिकन गँड्र स्लॅमचे हार्ड कोर्ट.. फेडररने सर्वच मैदानांवर पराक्रम गाजवला. परंतु २०१०च्या ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपदानंतर त्याचा आलेख घसरला. गेल्या चार वर्षांचा आढावा घेतल्यास फक्त २०१२चे विम्बल्डन जेतेपद त्याच्या वाटय़ाला आले आहे. फेडररचा सध्याचा खेळ पाहता तो आपल्या खात्यावर आणखी एखादे तरी ग्रँड स्लॅम मिळवू शकेल का, याविषयी साशंका निर्माण होते. परंतु सचिनप्रमाणेच लोकप्रियतेच्या यशोशिखरावर आरूढ झाल्यामुळे मिळालेले दैवत्व आता त्याला शांत बसू देत नाही. फेडरर युगाचा अंत झाला आहे, हे दारुण सत्य स्वीकारणे आता त्याला कठीण जाते आहे.  अमेरिकन ग्रँड स्लॅममधील आव्हान संपुष्टात आल्यानंतर फेडररची ‘मीच माझा पराभव केला’ ही प्रतिक्रिया बोलकी होती. फेडररला आत्मपरीक्षण तरी करता येत असल्याची खात्री पटते. दुसरीकडे सचिन मात्र म्हणतो, ‘‘माझ्या निवृत्तीचा निर्णय मीच घेईन. जेव्हा मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती, तेव्हा तो निर्णयसुद्धा अन्य कोणी घेतला नव्हता. जे मला निवृत्तीचा सल्ला देत आहेत, त्यांनी मला संघात स्थान दिलेले नाही. माझे प्रशिक्षक आणि कुटुंबीयांच्या पाठबळामुळे ते मला मिळाले आहे!’’ आता रॅकेट खाली ठेवण्याची वेळ आली आहे, हीच गोष्ट जर फेडररने ध्यानात घेतली तर ते योग्य ठरेल, अन्यथा त्याचा सचिनच होईल.