या जागतिक संकटाची साऱ्या जगाने चिंता वाहावी, आम्ही हातावर हात ठेवून बसणार अशी भूमिका आपण घेणार असू तर ती भविष्यातील अनर्थाची नांदी ठरेल.
सरले ते दिवस आता. ऊन, वारा, थंडी, पाऊस बघून प्रादेशिक असमतोल जोखण्याचे. उन्हाळय़ात तापणारा व हिवाळय़ात गारठणारा विदर्भ, ऋतू कोणताही असला तरी वातावरणातला उबदारपणा कायम ठेवणारा पश्चिम महाराष्ट्र, घामाच्या धारांना शोषून घेणारी खेळकर हवा देणारी मुंबई. निसर्गाने या साऱ्या ओळखी पुसून टाकण्याचा जणू घाटच घातलाय. फार पूर्वी लोक म्हणायचे, होळीची लाकडे पेटली की तापणे सुरू. आताचा निसर्ग त्याचीही वाट बघायला तयार नाही. या लाकडांना जाळ लागायच्या आधीच तो तापू लागलाय. इतका की साऱ्यांच्या अंगाची काहिली व्हायला सुरुवात झालीय. ऐन वसंतातले सूर्याचे हे रौद्र रूप भर उन्हाळय़ात कसा आकार घेणार या चिंतेने आताच साऱ्यांचे चेहरे काळवंडलेले. खरे तर याची चाहूल हिवाळय़ातच लागली होती. दमट वातावरणाला भेदत थंडीने मुंबईत शिरकाव केला तेव्हा!
थंडी तशी साऱ्यांना आवडणारी. त्यामुळे सर्वानी ती गोड मानून घेतली. ही हवामान बदलाचे चटके देण्याची सुरुवात असेही तेव्हा कुणाच्या मनी आले नसेल. आता पारा चाळिशीच्या पुढे जायला लागल्याबरोबर अनेकांच्या लक्षात हे चटकेमाहात्म्य यायला लागलेले. हे असे का घडतेय? यात चूक ती कुणाची? या प्रश्नांवर सर्वत्र चर्चा सुरू झालेली. एक मात्र खरे! रखरखीत उन्हात तापणारा विदर्भ हे वैशिष्टय़च निसर्गाने यावेळी संपवण्याचे ठरवलेले दिसते. ‘ऐन उन्हाळय़ात तेही विदर्भात, नको रे बाबा’ असे उद्गार कानी पडायची सोय ठेवली नाही या बदलाने. कायम अनुशेषाच्या आगीत होरपळणाऱ्या या प्रदेशासाठी हा दिलासा म्हणायचा की आणखी काय हे ज्याचे त्याने ठरवायचे. तीव्र उन्हाच्या झळा एकटय़ा विदर्भानेच किती काळ सोसायच्या? जरा करू या झळांचे समान वाटप असा विचार कदाचित निसर्गानेच केला असेल. प्रगतीच्या उन्मादात पर्यावरण सांभाळण्याचे नियतकर्तव्य पार पाडण्यात सारेच प्रदेश कुचराई करताना दिसतात, मग शिक्षा एकटय़ा विदर्भालाच का, असाही प्रश्न कदाचित निसर्गाला पडला असेल. सारी खनिज संपत्ती विदर्भात, त्याच्या उत्खननातून होणारी धूपही विदर्भाच्या वाटय़ाला. याच खनिजांपासून तयार होणारी वीज, कोळसा, सिमेंट, लोखंडाचा लाभ मात्र सर्वाना. भूलोकीवरच्या मानवाने आजवर दुर्लक्षित केलेला हा असमतोल एकदाचा दुरुस्त करावा असे निसर्गालाच वाटले असेल. त्यामुळे एका अर्थी हा निसर्गन्यायच. आता उन्हाळा असो वा हिवाळा, विदर्भात, मराठवाडय़ात यायला कुणी कचरणार नाही. तापमान काय, इथून तिथून सारखेच अशी मनाची समजून घालत सारे कौतुकबुद्धीने प्रवास करतील. तापणे हा काही वैदर्भीयांचा दोष नव्हता याची जाणीवही साऱ्यांना होईल. तिकडे विदर्भातसुद्धा चित्र वेगळे असेल. उन्हाळा सुरू झाला की कुलरच्या हवेतून गारवा शोधणारे किंवा पुण्या, मुंबईच्या कोणत्या नातेवाईकाकडे जाता येईल यावर खल करणारे वैदर्भीय ‘तिकडे काय आणि इकडे काय, सारे सारखेच’ असे म्हणून एक तर मृग नक्षत्राची वाट बघतील अथवा िहमत करून बाहेर पडतील. एकूणच काय, तर समन्यायी वाटपाचे सूत्र शेवटी निसर्गानेच हाती घेतले असे म्हणत सारे निसर्गाच्या आराधनेत मग्न होतील. अशा स्थितीत मुद्दा शिल्लक राहतो तो प्रश्न पडण्याचा.
या बदलाला आपणच कारणीभूत आहोत असे कुणालाच वाटणार नाही का? माणूस नेहमीच निसर्गावर मात करतो या भ्रमातून बाहेर पडण्याची वेळ आली आहे याची जाणीव कुणालाच होणार नाही का? हवामान बदलाचे हे चक्र बिघडवण्यात मानवजातीचा वाटा मोठा आहे याचे भान कुणालाच येणार नाही का? हवामान बदलाचे हे चक्र बिघडवण्यात मर्त्य जातीचा वाटा मोठा आहे. याचे भान कुणालाच येणार नाही का? अलीकडच्या काही वर्षांत पावसाचा लहरीपणा वाढला. तो अध्येमध्ये, कधीही कोसळू लागला. त्याने शेतीचे चक्र विस्कळीत केले. संकटांमागून संकटाची मालिका सुरू केली. त्यातून होणारी हानी ही सरकारी नुकसानभरपाईने भरून निघणारी नाही. यालाही आपलाच उन्माद जबाबदार आहे हे माणसांच्या लक्षात येत नसेल का? नंतर पावसाचा लहरीपणा थंडीने धरला. फेब्रुवारी उजाडला तरी ती जायचे नाव घेत नव्हती. कशीबशी ती गेली तर तप्त उन्हाने फेर धरला. हे संकट आपणच ओढवून घेतलेले आहे याचे भान आपल्याला कधी येणार? या व यासारख्या अनेक प्रश्नांना आपण भिडणार की या बदलामुळे आता साऱ्या राज्यातले वातावरण सारखेच झाले आहे या क्षणिक समाधानात जगणार. आधी आपण डांबरी रस्त्यावर समाधान मानायचो. आता सिमेंटच्या रस्त्याशिवाय आपले कामच भागत नाही. गल्ली असो, पांदण असो वा महामार्ग, जमिनीत पाणी शोषणाच्या प्रक्रियेत खोडा घालणारे हे रस्तेच साऱ्यांना हवे असतात. प्रगतीसाठी उद्योग हवेत, पण ते पर्यावरणस्नेही असावेत. किमानपक्षी पर्यावरण संतुलनाचे पालन करणारे असावेत असा आग्रह आपण सारे मिळून कधी धरतो का? ज्यांना प्रदूषणाची झळ बसते त्यांनी ओरडायचे व बाकींनी त्याकडे नुसते बघायचे हा खेळ किती काळ खेळला जाणार?
आपल्याला वाघ पाहायला, न्याहाळायला आवडतो, पण त्याला व्यवस्थित जगता यावे यासाठी जंगल हवे व ते उभारण्यात आपण हातभार लावू असे मात्र वाटत नाही. ही सारी सरकारची कामे. हीच या संदर्भातली आपली मानसिकता. जंगल वाढले तर वाघ व अन्य वन्यप्राण्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटेल, सोबतच निसर्गचक्राचे संतुलनसुद्धा राखले जाईल याची जाणीव असूनही आपण कधीच कृतिशील का होत नाही? ‘झाडे लावा, झाडे जगवा’ ही दीर्घकाळापासून आपल्या मनात रुजलेली घोषणा वर्षांतून एकदोनदा उच्चरवात केली की झाले अशी आपली वृत्ती का होत चालली? नागरी भागात सर्रास होणारी वृक्षतोड आपण अनेकदा मूकदर्शक म्हणून का बघत असतो? जाती – धर्माच्या प्रश्नावर क्षणात रस्त्यावर उतरण्याची ऊर्मी बाळगणारे आपण निसर्गाने पुकारलेल्या असहकाराच्या मुद्दय़ावर लढण्याची ऊर्मी का बाळगत नाही? झपाटय़ाने कमी होत जाणारे जंगल हा सर्वसामान्यांच्या चिंतेचा विषय का ठरत नाही? लहरी पावसामुळे होणारे नुकसान केवळ बळीराजाला संकटात टाकत नाहीत तर ते अन्नधान्य व भुकेच्या संकटालासुद्धा आणखी गहिरे करत नेते याची जाणीव आपल्याला कधी होणार? तीव्रतेने येणारा हिवाळा असो की उन्हाळा, तो आरोग्यांच्या प्रश्नांचा नव्याने बाजार मांडतो व त्यात सारेच होरपळले जातात या वास्तवाकडे आपण किती काळ दुर्लक्ष करणार? हे संकट जागतिक आहे हे खरेच. त्याचा अर्थ साऱ्या जगाने त्याची चिंता वाहावी, आम्ही हातावर हात ठेवून बसणार असा आपण घेणार असू तर तो भविष्यातील अनर्थाची नांदी ठरेल. या हवामान बदलाने पुण्याची हवा छान, मुंबईतली त्यातल्या त्यात बरी, औरंगाबादेत फारच शुष्क तर नागपुरात अगदीच गरम झळा हो, असल्या मध्यमवर्गीय गृहीतकालाच पूर्णविराम दिला आहे. येणारा काळ नवे गृहीतक मांडण्याचा नसेल तर या संकटावर मात कशी करता येईल यावर विचार करण्याचा असेल. तशी मनाची तयारी आपण करणार आहोत की विदर्भात भर उन्हाळय़ात गुणगुणल्या जाणाऱ्या कवी अनिलांच्या ‘वेळ झाली भर माध्यान्ह, माथ्यावर तळपे ऊन, नको जाऊ कोमेजून, माझ्या प्रीतीच्या फुला’ या प्रेयसीची काळजी घेणाऱ्या प्रियकराच्या कवितेतच रमणार आहोत, यावर साकल्याने विचार करण्याची वेळ आली आहे. ऋतू कोणताही असो, प्रियकर-प्रेयसींवरील कवितेला मरण नाही. प्रश्न आहे तो आपल्या आयुष्यातील कवितेचा. तिला हिरवेगर्द रूप द्यायचे की रखरखीत हे प्रत्येकाने ठरवण्याची वेळ निसर्गाने साऱ्यांवर आणली आहे.