अनेक भारतीय आणि पाश्चात्त्य अभ्यासकांनी बौद्धदर्शन आणि हेगेलचे ‘डायलेक्टिक्स’ यांचा तौलनिक अभ्यास केला आणि त्यातून बौद्धदर्शनाच्या चर्चेमध्ये ही संकल्पना वापरात आणली गेली. प्रत्यक्षात बौद्धदर्शन आणि डायलेक्टिक्समध्ये फरक असू शकतो.. हेच जैनदर्शनाबद्दलही खरे आहे.
ग्रीक-पाश्चात्त्य परंपरेत झीनो-सॉक्रेटिसपासून द्वंद्वविकास, विरोधविकास आणि संवाद ही विचार करण्याची किंवा चर्चा करण्याची पद्धती सुरू झाली तशी भारतीय परंपरेतही संवाद पद्धती होती आणि आहे. किंबहुना ग्रीक परंपरेपेक्षा भारतीय परंपरा अतिप्राचीन असल्याने नेमके उलट म्हणणे हेच जास्त बरोबर ठरेल. द्वैतवाद (डय़ुअॅलिझम) म्हणजे चेतन तत्त्व व अचेतनविश्व ही परस्परांहून स्वभावत: अत्यंत भिन्न आहेत, या मूलभूत सिद्धांतावर आधारलेले तत्त्वज्ञान. द्वंद्व म्हणजे परस्परविरोधी टोकाचे गुणधर्म असणाऱ्या दोन तत्त्वांचा एकमेकांशी लढा होणे. त्या लढय़ातून, संघर्षांतून तिसरी नवीन स्थिती अस्तित्वात येणे म्हणजे द्वंद्वविकास(डायलेक्टिक्स). मार्क्स मानवी समाजाच्या द्वंद्वविकासाला ऐतिहासिक द्वंद्वविकास म्हणतो तर विश्वाच्या द्वंद्वविकासाला जडवादी द्वंद्वविकास म्हणतो.
हेगेल किंवा मार्क्स यांच्या अर्थानुसारची तात्त्विक विचार करण्याची रीत म्हणून द्वंद्वविकास ही संकल्पना भारतीय परंपरेत आढळत नाही. तथापि बौद्धदर्शन आणि जैनदर्शन या अवैदिक दर्शनामध्येसुद्धा एका वेगळ्या प्रकारची वादपद्धती आढळते.
बौद्धदर्शनातील द्वंद्वविकास महायान पंथातील माध्यमिक या संप्रदायाचा प्रणेता महापंडित नागार्जुन (इ.स. १५०) याने मांडला. बुद्धाने त्याग आणि भोग यांचा अतिरेक न करता संयत मध्यममार्गी जीवनाचा उपदेश केला. नागार्जुनाने हा मध्यममार्ग स्वीकारला. पण मार्क्सने हेगेलच्या द्वंद्वविकास संकल्पनेत बदल करून तो नव्या संदर्भात उपयोगात आणला, तसे काहीसे नागार्जुनाने केले. त्याने त्याग-भोगातून सुचविलेल्या मध्यममार्गाऐवजी दु:खांचा विषय बनणाऱ्या जगाच्या आकलनाचा मध्यममार्ग स्वीकारला.
नागार्जुनप्रणीत माध्यमिक संप्रदायाच्या मते जगातील सर्व गोष्टी प्रत्येक क्षणाला बदलतात. त्यांना स्वत:चे असे स्वतंत्र, निरपेक्ष अस्तित्व नाही. अस्तित्वात येण्यासाठी त्या इतर गोष्टींवर अवलंबून असतात. ‘अ’ असेल तर आणि तरच ‘ब’ अस्तित्वात येतो. ‘ब’ असेल तर आणि तरच ‘क’ अस्तित्वात येतो. ही कारणपरंपरा आहे. दुसऱ्या कारणावर अवलंबून असणे, या सिद्धांताला ‘प्रतीत्य-समुत्पाद’ म्हटले आहे. समुत्पाद म्हणजे उत्पन्न होणे आणि प्रतीत्य म्हणजे दुसऱ्या कोणत्या तरी गोष्टीवर अवलंबून राहणे. ‘अ’ अस्तित्वासाठी ‘ब’वर अवलंबून राहतो, याचा अर्थ ‘अ’ला स्वत:चे अस्तित्व नाही, म्हणजे ‘स्व-भाव’ नाही. म्हणजे ‘अ’ हा ‘स्व-भाव-शून्य’ असतो, असे नागार्जुनाचे म्हणणे आहे. (‘य: प्रतीत्य-समुत्पाद: शून्यतां तां प्रचक्ष्महे!’ म्हणजे – कारणामुळे जो उत्पाद होतो ती शून्यता होय.) अशा प्रकारे जग शून्य आहे, हा बौद्धदर्शनातील शून्यवाद आहे. येथे शून्य म्हणजे काहीच नाही, असे नाही; तर स्वतंत्रपणे अस्तित्वात येण्याची क्षमता नसणे व अस्तित्वासाठी कशावर तरी अवलंबून राहणे.
अशा सतत बदलणाऱ्या शून्य जगाविषयी अचूक विधान मग करणार तरी कसे? नागार्जुनाच्या मते, ते शक्य नाही. जगाविषयी आपले म्हणणे मांडताना आपण मुख्यत: दोन विधाने करतो. (१) क्ष आहे (२) क्ष नाही. आता हे दोन्ही स्वीकारले किंवा नाकारले तर आणखी दोन विधाने मिळतात. दोन्ही आहेत आणि दोन्ही नाहीत; तसेच आहे असेही नाही आणि नाही असेही नाही. म्हणजे (३) क्ष आहे व नाहीही आणि (४) क्ष आहे, असेही नाही आणि नाही; असेही नाही. उदाहरणार्थ, ‘हा त्रिकोण आहे’ असे म्हणणे म्हणजे ‘हा चौरस आहे’ हे नाकारणे असते. आता दोन्ही एकाच वेळी स्वीकारले असे होऊ शकत नाही आणि नाकारले असेही होऊ शकत नाही. काही स्वीकारले किंवा नाकारले तर द्वंद्व, विरोध उभा राहतोच. अशा विधानांच्या आधारे वास्तवाचे अनिश्चित स्वरूप स्पष्ट करता येते. या चार विधानांना माध्यमिक ‘चतुष्कोटी’ म्हणतात. त्यावर आधारलेल्या तर्कशास्त्राला ‘चतुष्कोटीचे तर्कशास्त्र’ म्हणतात. (या कोटी अगदी प्रथम नासदीय सूक्तात आढळतात.)
सतत बदलते जग चतुष्कोटीच्या अतीत (विनिर्मुक्त) आहे. आणि ज्या वेळी असे कोणतेही विधान निश्चितपणे करता येत नाही त्या वेळी मौन बाळगणे हेच श्रेयस्कर, असे नागार्जुनाचे प्रतिपादन आहे. (विसाव्या शतकात विगेटस्टाइन या तत्त्ववेत्त्याने हेच प्रतिपादन केले.) वास्तवाचे वर्णन करताना भाषा तोकडी पडते आणि ही भाषेची मर्यादासुद्धा भाषेच्या आधारेच स्पष्ट करावी लागते, हे नागार्जुन सांगतो.
नागार्जुनाच्या मते, विचार करणे हाच केवळ मुक्तीचा मार्ग नाही तर विचारमुक्त मौन हीच मुक्ती आहे. वास्तवासंबंधी कोणतीही विधाने केली, दृष्टिकोन स्वीकारले तरी द्वंद्व निर्माण होते, मग हे दृष्टिकोन सत्याचे दर्शन घडवीत नाहीत, याची जाणीव होते, आणि अखेरीस ‘आहे-नाही’च्या द्वंद्वाच्या अतीत गेल्यावरच (मौन) निर्वाण लाभतो.
जैनदर्शनातील अनेकांतवाद या सिद्धांतातही भाषेशी संबंधित द्वंद्वविकास आढळतो, असे म्हणता येईल. अनेकांतवाद म्हणजे कोणत्याही वस्तूला अथवा गोष्टीला अनेक अंत म्हणजे अनेक दृष्टिकोन असणे. वस्तूला, जगाला अनेक अवयव, धर्म, गुण, संबंध, आकार, रंग परिणाम (विकार), पर्याय असतात; शिवाय ती वस्तू एका विशिष्ट काळात असते. साहजिकच या एकाच वस्तूबद्दल आपण निरनिराळ्या दृष्टिकोनांतून निरनिराळ्या संदर्भात परस्परविरोधी विधाने करू शकतो. अशी सात विधाने करता येतात. हा सिद्धांत स्याद्वाद किंवा सप्तभंगीनय सिद्धांत म्हणून ओळखला जातो. येथे स्याद् म्हणजे प्रस्तुत विशिष्ट संदर्भ. ही विधाने अशी (१) स्याद् अस्ति = शक्य आहे, की ते आहे. (२) स्याद् नास्ति = शक्य आहे, की ते नाही. (३) स्याद् अस्ति च नास्ति च = शक्य आहे, की ते आहे, आणि ते नाही. (४) स्याद् अव्यक्तव्यम् = शक्य आहे, की ते अवक्तव्य आहे. (५) स्याद् अस्ति च अव्यक्तव्यं च = शक्य आहे, की ते आहे, आणि अव्यक्तव्य आहे. (६) स्याद् नास्ति च अव्यक्तव्यं च = शक्य आहे, की ते नाही, आणि अव्यक्तव्य आहे. (७) स्याद् अस्ति च नास्ति च अव्यक्तं च = शक्य आहे की ते आहे, नाही, आणि अव्यक्तव्य आहे. हा सिद्धांत जैन तत्त्ववेत्ते हत्ती आणि सात आंधळे या रूपक कथेद्वारे स्पष्ट करतात.
स्याद्वाद विरोधी बाजूलाही न्याय देणारा असल्याने हा व्यापक अर्थाने अिहसावादी आणि लोकशाहीवादी आहे. मी, माझे, ही िहसा आणि तुझे, त्यांचे, आपणा सर्वाचे मत महत्त्वाचे ही अिहसा, हा पाठ यातून मिळतो. लोकशाहीसाठी अिहसा व सत्य मूलभूत असते.
बौद्ध व जैन सिद्धांत वेगळ्या प्रकारचा द्वंद्वविकासाचा दृष्टिकोन देतात, एवढेच इथे म्हणता येते. प्रा. एस. राधाकृष्णन्, प्रा. सुरेंद्रनाथ दासगुप्त, प्रा. टी. आर. व्ही. मूर्ती, प्रा. प्रदीप गोखले, स्टिफन अनाकर यांनी हेगेल आणि बौद्धदर्शनातील द्वंद्वविकास यांचा तुलनात्मक अभ्यास करताना डायलेक्टिक ही संज्ञा (बौद्धदर्शनाच्याही चर्चेत) उपयोगात आणली आहे. तर, प्रा. सुरेंद्र बारलिंगे यांनी, ‘प्राचीन बौद्ध दार्शनिकांना द्वंद्वात्मक तर्कशास्त्र मांडावयाचे होते. तसेच जैनांचा सप्तभंगीसिद्धांत हे शक्यतांचे सुसूत्रीकरण आहे’ असे मत व्यक्त केले. पण प्रतीत्य समुत्पाद किंवा सप्तभंगीनयवाद म्हणजे भारतीय द्वंद्वविकास किंवा ऐतिहासिक द्वंद्वविकास असे असा दावा करणे धाडसाचे ठरेल.
हेगेलचा द्वंद्वविकास व नागार्जुनाचा द्वंद्वविकास यातील फरक असा की हेगेलचा द्वंद्वविकास विश्व व विचार यांचा विकास साधतो तर नागार्जुनाचा द्वंद्वविकास फक्त वैचारिक विकासातून मुक्तीकडे नेतो.
लेखक संगमनेर महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक व तत्त्वज्ञान विभागप्रमुख आहेत.
भारतीय ‘द्वंद्वविकास’?
अनेक भारतीय आणि पाश्चात्त्य अभ्यासकांनी बौद्धदर्शन आणि हेगेलचे ‘डायलेक्टिक्स’ यांचा तौलनिक अभ्यास केला आणि त्यातून बौद्धदर्शनाच्या चर्चेमध्ये ही संकल्पना वापरात आणली गेली.
आणखी वाचा
First published on: 27-02-2014 at 03:59 IST
मराठीतील सर्व तत्वभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hegelian dialectics buddhism and jainism