मी कधी मनसेत, कधी काँग्रेसमध्ये तर कधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार अशा अफवा पक्षातूनच पसरविण्यात येत असल्या तरी मी भगव्याच्या सावलीतच राहणार, अशा शब्दांत शिवसेना गटप्रमुखांच्या मेळाव्यात सैनिकी बाणा दाखविणारा शिवसेनेचे नेते आमदार रामदास कदम यांचा सूर भाषणाच्या मध्यंतरानंतर केविलवाणा होत गेला, तरी त्यांनी व्यक्त केलेली खदखद मात्र, अनेक शिवसैनिकांच्या मनात दीर्घकाळ ठुसठुसणारी होती. बाळासाहेबांच्या पश्चात शिवसेनेचे काय होणार, असा प्रश्न अनेकांना पडला होता, हे खरेच आहे. गोरेगावात महाराष्ट्र दिनी झालेल्या गटनेत्यांच्या मेळाव्यातील रामदासभाईंच्या भाषणात त्याचा उल्लेख झाला आणि उत्तरही त्यांच्याच भाषणातून मिळाले. बाळासाहेबांच्या काळात, पक्षाबाहेर पडण्याच्या शेवटच्या पायरीवर असलेल्यांनीच जाता जाता सेनेच्या संघटनात्मक व्यवस्थेवर जाहीर टीका केली होती. पक्षातील अन्य कोणाही नेत्याने बाळासाहेबांच्या हयातीत असे जाहीर धाडस केले नव्हते. रामदासभाईंनी या मेळाव्यात ते केले, आणि बाळासाहेबांच्या पश्चात शिवसेनेत काय असणार, याचीच चुणूक दाखविली. पण तो मुद्दा महत्त्वाचा नाही. रामदास कदम जेव्हा आपल्या मनातील नाराजीला मोकळी वाट करून देत होते, पक्षांतर्गत विरोधकांवर नामोल्लेख टाळून हल्ला चढवत होते, तेव्हा समोरच्या गटनेत्यांच्या गर्दीतून त्याला दुजोरा देणारे आवाज उमटत होते, ही गोष्ट अधिक महत्त्वाची आहे. या मेळाव्यात कदम यांनी भगव्याशी बांधीलकीची शपथ घेतली असली, तरी शिवसेनेतील नेत्यांच्या फळीत मोठी दुफळी आहे, हे मात्र स्पष्ट झाले आहे. आमदार कदमांनी व्यक्त केलेली ती खरोखरीची ‘घुसमट’ होती की ‘निमित्ताची नांदी’ होती, यावरही पक्षात तर्कवितर्क सुरू झाले असतील. कदमांच्या खेड मतदारसंघात विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला तरीही त्यांचे विधान परिषदेवर पुनर्वसन झाले. पण तिथेही पक्षाचे गटनेते दिवाकर रावते यांच्यामुळे आपण ‘असमर्थ’च ठरलो, अशी खंत या रामदासाने स्वत:च सभागृहातच बोलून दाखविली होती. पण नेतृत्वाने गांभीर्याने दखल न घेतल्याने गटनेत्यांच्या मेळाव्याचा मुहूर्त शोधून पुन्हा तोच सूर लावत, त्यांनी ‘मनाचे क्षोभ’ मोकळे केले. शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि युवा सेनेचे नेतृत्व वगळता, पक्षाच्या पहिल्या फळीत नेत्यांमध्ये तीव्र संघर्ष असल्याच्या बातम्या वारंवार येत असतात. सेनेचा एके काळचा बालेकिल्ला असलेल्या दादरमध्ये तर, ‘सदा सर्वदा’ संघर्षच रंगला होता. त्या कहाण्यांचे नायक, उपनायक कोण तेही जगजाहीर  होते. पक्षातील वैरी रामदासभाईंना बाहेर घालविणार की ते स्वत:च बाहेर जाणार यावरही पक्षात पैजा लागल्या असल्या, तरी तसे व्हावे यासाठी देव पाण्यात घालणारे कुणी नसतीलच असे ठामपणे सांगता येणार नाही. आपण स्वत:वर गद्दार किंवा कोंबडीचोर असा ठपका लावून घेणार नाही, असे सांगून पक्षात आमनेसामने लढय़ाचे आव्हानच कदमांनी दिले आहे. त्यामुळे शिवसेनेची संघटनात्मक घडी सांभाळण्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोरील आव्हान अधिक प्रखर झाले आहे. पक्षांतराच्या वावडय़ा उठविण्यामागे नेहमीच पक्षांतर्गत शत्रूंचा हात असतो असे नाही. स्वत:चे महत्त्व वाढविण्यासाठीदेखील हा उद्योग केला जातो.  त्यामुळे अशा नाराजीनाटय़ांची अखेर कशी व्हावी हे ठरविणेही पक्षप्रमुखांच्याच हातात असते. गटनेत्यांच्या बैठकीतील कदमांच्या ‘केविलवाण्या’ आक्रमणानंतर लगेचच, ‘धनुष्यबाण हाच पक्षाचा उमेदवार’ असे स्पष्ट करून पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पक्षातील ‘वैराचाऱ्यां’ना थेट इशाराच दिला आहे. एकटे रामदास कदमच नव्हेत, तर अन्य दुफळीबाज नेत्यांना पक्षप्रमुखांचा हा कडवट डोस पचविता आला नाही, तर पक्षाचे काय होणार याचे भाकीत वेगळे वर्तविण्याची गरज नाही, हेच खरे!

Story img Loader