प्रसिद्ध विधिज्ञ अॅड. उज्ज्वल निकम यांचा प्रसारमाध्यमांवर भलताच जीव. त्यातही चित्रवाणी वाहिनीच्या प्रतिनिधींबद्दल त्यांच्या मनी अपार कळवळा. हे प्रतिनिधी बिचारे बातमीदारीसाठी किती कष्ट करतात हे पाहून त्यांच्या मनी नेहमीच गलबलते. त्यामुळेच हे बातमीदार कोठे दिसताच निकम सरांची पावले, खरे तर तोंड त्यांच्या दिशेने वळते. यास कोणी माध्यमनियोजन म्हणत असेल तर तो पाहणाऱ्याच्या दृष्टीचा दोष म्हणावा लागेल. निकम यांची वकिली व व्यक्तिमत्त्व यातच असे चुंबकत्व आहे की, त्यांच्याकडे जनप्रियतेची हमी देणारेच खटले येतात आणि मग अशा खटल्यांत च्यानेलांस बाईटी देणे ओघानेच येते. यात निकम यांचा दोष आहे असे म्हणणे मिलॉर्ड, सरासर चूक आहे. उलट लोकांना शहाणे करण्यासाठी ते जे कष्ट घेतात त्याबद्दल त्यांचा सत्कारच केला पाहिजे. त्यांच्या कारकीर्दीतील मुंबई बॉम्बस्फोटांपेक्षाही सर्वात मोठा खटला म्हणजे मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याचा. या खटल्यात अत्यंत कष्टाने त्यांनी पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याला फासावर चढवले. मोठेच आव्हान होते ते. एकीकडे आपले वकिली कसब पणाला लावणे होते आणि दुसरीकडे शेकडो मुंबईकरांना क्रूरपणे मारणाऱ्या या दहशतवाद्याबद्दल लोकांच्या मनात निर्माण झालेली माया दूर करणे होते. कसाब मोठा कसबी कलाकार. त्याला आपल्यावर माध्यमांची नजर आहे हे चांगलेच माहीत होते. त्यामुळे एकदा त्याने न्यायालयात डोळे पुसण्याचे नाटक केले. तर त्यावरून वाहिन्यांवर म्हणे चर्चा सुरू झाली की, तो तर बिच्चारा आहे. त्याला अडकवण्यात आले आहे. त्यामुळे भारतवासीयांच्या मनात करुणा जागृत झाली असती. काय सांगावे, कदाचित त्यातून रस्तोरस्ती कसाब बचाव अभियान सुरू झाले असते. कदाचित त्याचा परिणाम येथील न्यायव्यवस्थेवर झाला असता. हे सर्व थांबविण्यासाठी सत्यवचनी निकमांनी आपले पुण्य पणाला लावले आणि ते लोकहितार्थ खोटे बोलले, की कसाबने मटणबिर्याणीची मागणी केली होती. त्या एका वाक्याने जादू व्हावी तसे सगळे चिडले आणि मग कसाबला फाशी झाली. आता यावरून निकम यांना दोषी मानायचे? खरे तर निकम यांना या भानगडीत पडायचे तसे काय कारण होते? वाहिन्यांवरील चच्रेतील भावना न्यायालयात पुरावे म्हणून चालत नसतात. जनभावनेचा परिणाम न्यायदानावर होत नसतो. न्यायालये तेवढे कायदाकठोर वागतच असतात. परंतु न्यायालयावर खरेच परिणाम झाला असता तर? निकम यांच्या या बिर्याणीच्या वक्तव्याचा परिणाम देशाच्या मानसिकतेवर किती झाला आहे ते पाहा. आज कोणत्याही दहशतवाद्याला लोकांची सहानुभूती मिळत नाही. कोणताही गुन्हेगार पकडताना पोलीस यंत्रणाही म्हणे, त्याला द्यावयाच्या बिर्याणीचा विचार करू लागल्या आहेत. पोलीसच काय, पण लष्करही हाच विचार करू लागले आहे. यातून ‘झटपट न्यायदाना’ची प्रवृत्ती वाढली आहे. कायद्याच्या राज्यासाठी हे किती चांगले! आता त्यावरून तेव्हाच्या सरकारला विनाकारण लोकांच्या रोषाचे धनी व्हावे लागले, त्याला इलाज नव्हता. लोकहितासाठी कायदा, नीतिमत्ता कधी कधी पायदळी तुडवावीच लागते. निकमांनी तेच केले. त्याबद्दल कोणी त्यांना उमेदवारी देवो न देवो, भावनांना आकार देण्यात धन्यता मानणारी माध्यमे त्यांचा नायक म्हणून खचितच गौरव करतील, यात शंका नको.