हिमाचल प्रदेशातील कुलूमध्ये बियास नदीत वाहून गेलेल्या चोवीस तरुण विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांचे दु:ख कल्पनेच्या पलीकडचे आहे. धरणातील पाणी नदीत सोडताना काळजी घेतली गेली नाही, त्यामुळे अचानक आलेल्या पाण्याच्या लोंढय़ामुळे या मुलांवर आपत्ती कोसळली. त्यांना शोधून काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असले, तरीही त्यांचे जिवंत राहणे अशक्य आहे, असे मदतकार्य करणाऱ्यांना वाटते आहे. नदीमध्ये पाणी सोडताना काठावरील गावांमध्ये भोंगा वाजवून सूचना देण्याची पद्धत त्या परिसरात अवलंबिली जाते. रविवारी सायंकाळी पाणी सोडताना असा भोंगा वाजवला गेला नाही, असे गावक ऱ्यांचे म्हणणे आहे. असे वारंवार होते, असेही त्यांनी सांगितले आहे. हैदराबादमधील अभियांत्रिकी महाविद्यालयातील हे वीस विद्यार्थी कुलू येथे सहलीसाठी गेले होते. नदीकाठी गेल्यानंतर पाण्यात डुंबण्याची अनावर इच्छा होणे हे त्या वयाचे व्यवच्छेदक लक्षणच म्हणायला हवे. हे तरुण पाण्यात तर गेलेच नाहीत, परंतु काठावर असतानाच काही मिनिटांतच नदीला प्रचंड प्रमाणात पाणी आले. पाणी वाढते आहे, हे कळल्यानंतर सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी लागणारा अवधीही या तरुणांना मिळाला नाही आणि त्यात ते वाहून गेले. ही घटना हृदयद्रावक तर आहेच, पण कुणाच्या चुकीची शिक्षा कुणाला किती महागात पडते, याचे विदारक दर्शन घडवणारी आहे. घटना इतकी दु:खद असताना हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांनी त्यासाठी त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षकांना दोष द्यावा, हे शोभादायक नाही. अशा घटनांचे राजकारण करणे आपण कधी थांबवणार आहोत? प्रत्येकाला अशा घटनांचे फायदे का मिळवायचे असतात हाही प्रश्न कायम अनुत्तरितच राहणार आहे. बुडालेल्या या मुलांबरोबर असलेल्या आणि जीव वाचवू शकलेल्या विद्यार्थ्यांचे म्हणणे असे, की अवघ्या पाच-सहा सेकंदात नदीच्या पाण्याची पातळी ५-६ फुटांनी वाढल्याने, काही कळायच्या आत ही दुर्घटना घडली. तसेच, नदीकाठी धोक्याचा इशारा देणारे कोणतेही फलक नाहीत, त्या परिसरात भोंगे वाजवण्यात आले नाहीत, बुडालेल्यांना वाचवण्यासाठी आलेले बचाव कार्यकर्ते दोन-तीन तास उशिरा पोहोचले. बियास नदीमध्ये घडलेली ही काही पहिली घटना नव्हे. काहीच दिवसांपूर्वी दोन मुले या नदीत वाहून गेली होती. यापूर्वीच्या घटनांनंतर प्रशासनाने वेळीच खबरदारी घेतली असती, तर ही दुर्घटना टाळता आली असती. परंतु सगळ्याच पातळ्यांवर अकार्यक्षमता आणि आळस असल्यामुळे असे प्रसंग वारंवार घडत राहतात. स्मरणशक्तीतून असे विषय बाहेर गेले, की पुन्हा पहिले पाढे पंचावन्न, अशी ही स्थिती आहे. गरजेनुसार धरणातून पाणी सोडणे ही आवश्यकता असू शकते. मात्र असे करताना नदीपात्रातील पाण्याची पातळी किती वाढेल आणि त्याचा काठावर आलेल्या नागरिकांना व पर्यटकांना कोणता त्रास होऊ शकेल, याचा विचार करायला हवा. बियास नदीचे नितळ पाणी आणि तेथील नितांतसुंदर निसर्ग पाहायला येणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता अचानक पाणी सोडणे घातक ठरू शकते, याचेही भान संबंधित अधिकाऱ्यांना असायला हवे. संबंधितांना निलंबित करून झालेली मनुष्यहानी भरून निघणार नाही. एखादी चूक किती संहारक ठरू शकते, याचे कुलूतील घटना हे द्योतक आहे. गेल्या काही वर्षांत अशा निष्काम कर्माच्या अनेक घटना घडत आहेत. कुणी काही मुद्दामहून करत असेलच असे नाही, परंतु त्याचे परिणाम मात्र भयावह होत आहेत. वाहनचालकाच्या चुकीने गोपीनाथ मुंडे यांचा अपघाती मृत्यू होणे हे जसे क्लेशकारक, तसेच या तरुणांचे वाहून जाणेही. अशा चुका टाळायला हव्यात हे तर खरेच; परंतु त्यासाठी नियमांचे काटेकोर पालन करण्याची जबाबदारी मनापासून पाळणे अधिक आवश्यक आहे.

Story img Loader