कर्नाटक संगीतातील सगळय़ा रचना देवाचे गुणगान करणाऱ्या असतात आणि कलावंतापासून ते श्रोत्यांपर्यंत सगळय़ांच्याच मनात कलावंताचा धर्म ही बाब महत्त्वाची मानली जाते. कर्नाटक संगीतातील या वातावरणामुळे तेथील सामाजिक अभिसरणावरही परिणाम झाला आणि त्यामुळे संगीत ही मूठभरांचीच मालमत्ता झाली. हिंदुस्थानी संगीतात मात्र याच्या उलट घडले. तेथे संगीत हेच सामाजिक बदलांना प्रतिष्ठा मिळवून देणारे क्षेत्र ठरले.
मानवाच्या मनातील हालचालींचे प्रतिबिंब कलापूर्णरीतीने व्यक्त करण्यासाठी जे जे मार्ग शोधण्यात आले, त्यात पहिल्यांदा संगीताचा शोध लागला असावा. तोपर्यंत माणसाने जातिधर्माची सामाजिक चौकटही स्वीकारली नव्हती. केवळ भावना व्यक्त करण्याशिवाय तेव्हा संगीताला दुसरे ध्येय नव्हते. समाजातील बहुजनांना शक्य होईल, अशा लोकसंगीताची स्थापना त्यातूनच झाली. त्यात अभिजन, बहुजन असे सगळेच जण सहभागी होत होते. ते संगीत सामूहिक होते आणि त्यामध्ये व्यक्तिगततेला अजिबात स्थान नव्हते. संगीताने अभिजात होण्याच्या प्रयत्नात व्यक्तिगत कलाविष्काराला महत्त्व प्राप्त करून दिले, त्याच काळात बहुधा सामाजिक घुसळणीलाही सुरुवात झाली. लोकसंगीतातून थेट देवळात पोहोचलेले हे संगीत साहजिकच उच्चवर्णीयांच्या हाती राहिले. त्यांनी देवाच्या आळवणीसाठी स्वरांचा उपयोग केला आणि त्यातून संगीतालाही लोकसंगीतापासून वेगळे होण्याचा मार्ग सापडला. धर्म आणि जातीच्या जंजाळात समाज सापडत असताना संगीतात त्याचे प्रतिबिंब उमटणे ही स्वाभाविक प्रतिक्रिया होती. संगीत हे एक स्वतंत्र बेट असते आणि तेथे संगीतबाहय़ गोष्टींना स्थान नसते, यासारख्या विधानांना फारसा अर्थ नाही, हे संगीतासह सर्व कलांनी अनेकदा सिद्ध केले आहे. तरीही संगीताने मात्र कायम वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न केला. समाजातील बऱ्यावाईट घटनांचा संगीतासारख्या प्रवाही कलेवर परिणाम न होता तरच नवल! देवळात प्रवेश नसलेल्यांना जसे संगीत करण्यासाठी अघोषित बंदीला सामोरे जावे लागले, तसेच संगीत कोणी करायचे, याचेही अलिखित नियम तयार झाले. समाजातील जातीच्या उतरंडीत संगीत असे ओढले गेले.
अतिशय ओढगस्तीत असलेल्या वर्गाला संगीताचे आकर्षण असणे ही गोष्ट दुरापास्त असली तरीही अशक्य नव्हती. कलेची ऊर्मी ही काही कोणत्या वर्गाची मालमत्ता नसते. ती कोणत्याही मानवामध्ये कधीही निर्माण होऊ शकते. त्यातूनच नवे प्रयत्न सुरू झाले आणि अभिजात संगीताच्या क्षेत्रात प्रवेश मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले. हे सारे घडून येण्यासाठी लागलेला काळ मात्र फार मोठा होता. अगदी परकीय आक्रमणाने या भूमीवर स्वत:ची सत्ता प्रस्थापित करेपर्यंत अभिजात संगीत हे मूठभरांच्याच हाती राहिले होते. मुसलमानांच्या आक्रमणानंतर आणि त्यांनी भारतात सत्ता स्थापन करेपर्यंतच्या काळात येथील संगीतानेही खूप हादरे सोसले. दीर्घकाळपर्यंत ज्या संगीताने अनेकानेक प्रयोग करत स्वत:ची मूस घडवली होती, त्या संगीतासाठी हे परकीय आक्रमण केवळ सत्तेपुरते मर्यादित नव्हते. त्यात सांस्कृतिक आक्रमणाचाही मोठा वाटा होता. मुसलमानी सत्तेतून पाझरत आलेल्या संस्कृतीने कळत नकळत येथील संगीतावरही आपला प्रभाव टाकण्यास सुरुवात केली. त्या काळातील सत्ताधाऱ्यांनी दरबारातच संगीताला महत्त्वाचे स्थान दिल्यामुळे संगीत ही सत्ताशरण कला होते की काय, अशी शंका निर्माण होण्यास बराच वाव होता. मुस्लीम सम्राटांचे कौतुक अशासाठी करायचे की त्यांनी या कलेला शक्य तेवढे स्वातंत्र्य बहाल केले. संगीत टिकवून ठेवण्यासाठी आधीच्या काळात ज्या अभिजनांनी कष्ट घेतले होते, त्यांच्यासह सगळय़ांना या सम्राटांनी कलात्मक स्वातंत्र्याचे दिलेले आश्वासन ही फार महत्त्वाची आणि उपकारक गोष्ट होती. गोष्ट इथेच संपत नाही. भारतीय संगीताच्या परंपरेत नव्याने येत असलेल्या एका नव्या सांस्कृतिक संदर्भाला सामोरे जाण्याचे आव्हान उभे ठाकले असताना, मूळच्या भारतीय कलावंतांनी त्याकडे पाठ फिरवण्याऐवजी किंवा गळाठून जाण्याऐवजी आत्मविश्वासाने सामोरे जाण्याचे ठरवले. या दोन संस्कृतींचा संकर राजसत्ता मिळवताना जेवढा रक्तलांच्छित झाला, तेवढाच संगीताच्या बाबतीत मात्र अतिशय सुकर झाला. दुधात साखर विरघळावी, तशा या संगीताच्या संस्कृतींना एकत्र येता आले. त्यातून संगीतातील दोन नवे वर्ग तयार झाले. पंडित आणि उस्ताद. उस्तादांना सत्तेचा वरदहस्त होता आणि पंडितांना कलात्मकतेचा आत्मविश्वास. कित्येक शतके ही समांतर परंपरा चालत आली. शेवटच्या काही काळात उस्तादी परंपरेला अधिक उजवे स्थान मिळाले, हे खरे असले तरी त्यामागे सांगीतिक प्रेरणाही तेवढय़ाच मजबूत होत्या. कलात्मकता, सर्जनशीलता याबाबत उस्तादही श्रेष्ठ होते. हा संकर निदान उत्तर हिंदुस्थानी संगीताच्या प्रभावक्षेत्रातील सामाजिक पातळीवर क्रांती करणारा ठरला. पंडित आणि उस्ताद यांच्यातील कलाव्यवहार हे त्याचे उदाहरण. उस्तादांकडे हिंदू म्हणवून घेणारे अनेक शिष्य शिकत असत. उस्ताद कलादान करताना आपल्या कुटुंबातील कलावंतांना अधिक काही देतात आणि अन्यांना हातचे राखून देतात, अशी टीका त्याकाळी होत होती. त्यात काही तथ्यांश असेलही. पण अनेक उस्तादांचे हिंदू ‘पठ्ठे’ संगीताच्या मैफली मारत असत, तेव्हा त्या गुरूलाही अभिमानच वाटत असे.
दोन धर्मामधील ही दरी संगीताने कमी केली. मात्र मुस्लीम आक्रमकांना दक्षिणेत स्थिरस्थावर झालेल्या कर्नाटक संगीतात शिरकाव करता आला नाही. ही परंपरा आजही ब्राह्मणांच्या हाती असल्याचे मत कर्नाटक संगीतातील आजच्या घडीचे ख्यातनाम कलावंत टी. एन. कृष्णन यांनी व्यक्त केले आहे. त्या संगीतातील सगळय़ा रचना देवाचे गुणगान करणाऱ्या असतात आणि कलावंतापासून ते श्रोत्यांपर्यंत सगळय़ांच्याच मनात कलावंताचा धर्म ही बाब महत्त्वाची मानली जाते. कर्नाटक संगीताचे सारे क्षेत्र ब्राह्मणी संस्कृतीच्या कचाटय़ातून मुक्त करण्याची गरज कृष्णन व्यक्त करतात. संगीतातील या कर्मठपणामुळे संगीताच्या या अभिजात परंपरा तळापर्यंत पोहोचणे दुष्कर झाले. कर्नाटक संगीतातील या वातावरणामुळे तेथील सामाजिक अभिसरणावरही परिणाम झाला आणि त्यामुळे संगीत ही मूठभरांचीच मालमत्ता झाली. हिंदुस्थानी संगीतात मात्र याच्या उलट घडले. तेथे संगीत हेच सामाजिक बदलांना प्रतिष्ठा मिळवून देणारे क्षेत्र ठरले. दक्षिणेकडील चार राज्ये आणि पूर्वाचलाचे क्षेत्र वगळता उर्वरित भारतात हिंदुस्थानी संगीतपरंपरेचा प्रसार झाला. मुस्लीमांच्या राजवटीतही या प्रसाराला खीळ बसली नाही. दरबारी संगीत म्हणून नवी परंपराही त्यातून उदयाला आली. (गमतीचा भाग असा, की उत्तरेकडील भारतात गायले जाणाऱ्या संगीताला ‘हिंदुस्थानी संगीत’ असे विशेष नाव मिळाले. त्याला मुस्लीम कलावंतांनीही विरोध केला नाही!) उत्तरेकडील संगीतकारांच्या मनात जात आणि धर्म याबद्दलचे कंगोरे काळाच्या ओघात बोथट होत गेले आणि संगीत ही कुणा एका वर्गाची मत्ता राहिली नाही. समाजाच्या सर्व स्तरात संगीताची गोडी लागण्यासाठी हे वातावरण उपयोगी ठरले आणि त्यामुळे भारतीय अभिजात संगीतात अनेक नव्या कलावंतांना त्यांच्या जातिधर्माच्या बेडय़ा तोडून प्रवेश करता आला. गंगुबाई हनगल हे याचे ठळक उदाहरण म्हणता येईल. त्यांचा जन्म समाजाच्या उच्चकुलातील नव्हता, तरीही त्यांना संगीताच्या दरबारात उच्चकुलीन मानले गेले, याचे कारण त्यांच्याकडे असलेली प्रज्ञा. कर्नाटकात राहून रामभाऊ कुंदगोळकर ऊर्फ सवाई गंधर्व यांनी किराणा घराण्याचे अध्वर्यू अब्दुल करीम खाँ यांच्याकडे गाणे शिकण्याचे का ठरवले, हे जसे कोडे आहे, तसेच कर्मठ वातावरणातील गंगुबाईंना सवाई गंधर्वाकडेच गाणे शिकावेसे का वाटले, याचेही उत्तर मिळत नाही. कर्नाटक संगीतातील खुमारी आपल्या संगीतात लीलया हस्तांतरित करून करीम खाँ यांनी एका वेगळय़ाच ढंगाचे संगीत निर्माण केले. मल्लिकार्जुन मन्सूर, संगमेश्वर गुरव, आजच्या पिढीतील गणपती भट हे सारे कर्नाटक संगीताच्या प्रभावक्षेत्रात राहूनही हिंदुस्थानी संगीताच्या क्षेत्रात नामांकित झालेले कलावंत आहेत. कर्नाटक संगीताचे प्रणेते म्हणून जरी पुण्याजवळील पुरंदरवासी संत पुरंदरदास यांचे नाव घेतले जात असले, तरीही नंतरच्या काळात उत्तर भारतातून कर्नाटकात जाऊन तेथील परंपरेवर खास ठसा उमटवणारे कलावंत अगदीच थोडे.   
भारताच्या सामाजिक बदलांचे पहिले बदल संगीतात दिसू लागले, याचे कारण संगीत ही अतिशय तरल आणि संवेदनशील कला आहे. मग जातिधर्माची बंधने तोडण्याचा विषय असो की समाजात अतिशय हीन वागणूक मिळत असलेल्या स्त्रियांना संगीतात प्रवेश करू देण्याचा प्रश्न असो. संगीतकलेद्वारे घडून आलेले सामाजिक बदल समाजाने अधिक त्वरेने स्वीकारले आणि त्याने खऱ्या अर्थाने क्रांती झाली. ही क्रांती कलात्मकतेच्या पातळीवरही घडत होतीच. प्रवाही असलेल्या संगीतातील अनेक नवे प्रयोग करण्यासाठी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण व्हावी लागते.  भारतीय संगीतात वेळोवेळी अशी आव्हाने उभी राहिली आणि कलावंतांनी ती अतिशय जोखमीने स्वीकारली. त्यावर मन:पूत अभ्यास करून त्या आव्हानांचे संधीत रूपांतर करण्याची हिंमत दाखवली. म्हणूनच त्यांचे संगीतातील योगदान जेवढे महत्त्वाचे, तेवढेच किंबहुना काकणभर अधिक यश सामाजिक बदल घडवून आणण्यात आहे, हे विसरून चालणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा