‘सेनेचे हिंदुत्व आरपीआयला मान्य’ असल्याचे आणि तरीही ‘आपण आंबेडकरवाद सोडलेला नाही’ अशी वक्तव्ये रामदास आठवले यांनी केल्याचे वृत्त (लोकसत्ता, २१ जून) वाचले. आठवले गट पुरस्कृत शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग सुरू झाला, तेव्हापासून त्यांनी आंबेडकरी विचारधारेचे बोट सोडून हिंदुत्वाचे पाय धरल्याचे अनेक वेळा दिसून आले आहे. आंबेडकरी विचारधारा सत्ता मिळवून देण्यासाठी नव्हे तर देशातील सर्वाधिक उपेक्षित समाज विभागांना ‘मोकळा श्वास’ घेता यावा म्हणून उत्क्रांत झाली असल्याचे आठवलेच काय पण ‘न आठवणारे’ अन्य नेतेदेखील साफ विसरून गेले आहेत. त्यामुळे अशा मंडळींनी आंबेडकर यांना मानले काय आणि न मानले काय, काही फरक राहिलेला नाही.
या लोकांना आता गळून पडलेल्या शेंडीला आणि भगव्या झेंडय़ाला नव्याने ‘स्पर्श’ करण्याची मुळात गरजच काय, हा खरा प्रश्न आहे. ‘ओम भवति भिक्षांदेहि’ म्हणत देशातील प्रस्थापित राजकीय पक्षांच्या दारात उभे राहण्याची पाळी आठवले यांनी स्वत:वर ओढवून घेतली असून जीर्ण झालेला खुंटा हलवून बळकट करण्याचा त्यांचा प्रयत्न एकाच वेळी हिंदुत्वाचे राजकारण समर्थ करणारा आणि त्याच वेळी दलित बहुजनांच्या विकास प्रक्रियेचा बळी घेणारा असल्याचे या सांप्रतकालीन रामदासांना कळतच नसेल असे नाही.
खरी गोष्ट अशी की त्यांना ठाकरे, पवार यांच्याप्रमाणे सतत बातम्यांत राहायचे आहे आणि ही हौस फिटवून घेण्यासाठी त्यांनी नव्या भाषाप्रभुत्वाचा आव आणला आहे. शिवसेना-भाजप सेना -भीमसेना एकत्र आल्या की अखिल भारतीय सत्ताकेंद्र यांच्याच ताब्यात येणार अशी त्यांनी कल्पना करून घेतली आहे. पण या कल्पनेचा अन्वयार्थ लागण्यापूर्वीच त्यांनी सेना-मनसे यांनी एकत्र यावे म्हणून ठेवले आणि उभय पक्षप्रमुखांनी डोळे वटारल्यावर मान फिरवली; इतकी की त्यांना आंबेडकरांचा पुतळादेखील दिसेनासा झाला! याआधी त्यांनी मोदींना हार घातल्याचे (आणि हिंदुत्वाच्या बामणी काव्यासमोर हार मानल्याचे) चित्र सर्वत्र झाले. अगदी अलीकडेच ‘प्रकाश आंबेडकर आमच्याबरोबर आले तर त्यांना आम्ही राष्ट्रीय अध्यक्षपद देऊ’ अशी हाकाटी त्यांनी केली आणि आपले राजकीय शहाणपण काय दर्जाचे आहे याचे नको तेवढे यथार्थ दर्शन घडविले!
शिवकालीन हिंदवी स्वराज्याचा संदर्भ देणाऱ्या आठवलेंना ते हिंदवी आणि आजचे हिंदुत्व यातील फरक कळत नसावा असेच दिसते. शिवरायांनी मुघल राजवटीच्या विरोधात जाऊन स्वराज्याची स्थापना केली हा त्यांचा राजकीय प्रयत्न होता; पण वेळी शिवरायांनी तत्कालीन ब्राह्मण, ९६ कुळी मराठे आणि अन्य सरंजामी मंडळींच्या विरोधातदेखील तीव्र संघर्ष करून शोषित बहुजन- दलित मुस्लिमांना सामाजिक न्याय मिळवून देण्याचे ऐतिहासिक कार्य केले होते. ते िहदवी होते आणि आज हिंदुत्व असून हे राजकारण एकाच वेळी धर्मनिरपेक्ष लोकशाही, राज्यघटना आणि विविध उपेक्षित समाज विभाग यांच्या विकासाच्या विरोधात जाणारे राजकारण असल्याचे वास्तव समजले असते तर हे रामदास त्या वाटेने गेले नसते. समजूनदेखील त्यांनी जायचे ठरविले असेल तर त्यांनी आंबेडकर यांचे नाव घेण्याचे बंद करायला हवे. स्व-हिमतीवर त्यांनी हवे तर खासदार काय, पंतप्रधानदेखील व्हावे.
प्रदीप देशपांडे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा