सारे आयुष्य केवळ संशोधन आणि लेखनासाठी वाहिलेल्या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाच्या डॉ. रामचंद्र चिंतामणी ढेरे यांचे वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षांत पदार्पण करतानाचे चिंतन आणि संशोधन इतिहासाकडे बघण्याची एक नवी दृष्टी देते. सिंहगड हे नाव छत्रपती शिवाजीमहाराजांवर अपार प्रेम करणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाच्या मनात अनेक कारणांसाठी कोरलेले आहे. जगातील युद्धाच्या इतिहासात आपल्या नव्या प्रतिभासंपन्न आणि कर्तृत्ववान युद्धशैलीने मोलाची भर घालणारे राजे म्हणून शिवाजीमहाराजांचे स्थान वादातीत आहे. सिंहगडाचे आधीचे नाव कोंडाणा. डॉ. ढेरे यांनी त्या नावाची जी फोड केली आहे, ती त्यांच्या व्यासंगाची साक्ष आहे. कोंड म्हणजे डोंगर आणि डोंगरावरचा देव म्हणून त्याचे नाव कोंडाई आणि कोंढाणा. या गडावरील नरसिंहाच्या मंदिराचे अस्तित्व पूर्वीपासूनचे. तेथे त्या दैवताची पूजाअर्चाही होत असे. या दैवतावरूनच या गडाचे नामकरण सिंहगड असे करण्याचे महाराजांना सुचणे सहजशक्य होते. याबाबत ज्येष्ठ इतिहास संशोधक य. न. केळकर, ग. ह. खरे यांच्यासारख्या संशोधकांनी जी कागदपत्रे जमा केली, त्याचा अन्वयार्थ लावण्याचे काम डॉ. ढेरे यांनी केले आहे. इतिहासाचे लेखन करणे म्हणजे केवळ कागदपत्रांचे पुरावे सादर करणे नव्हे. कागदपत्रांमधील माहितीचे अस्सलपण तपासताना समकालीन कागदपत्रांमध्ये सापडणारे अन्य संदर्भ त्या माहितीशी ताडून पाहणे आवश्यक असते. अस्सल कागदपत्रे सापडल्याच्या आनंदात हल्ली पत्रकार परिषदा वगैरे बोलावून त्याची जाहिरात करण्याची पद्धत रूढ झाली आहे. इतिहासाचे ओझे वाहणाऱ्या जगातील सगळय़ा मानवी समूहांना आपल्या भूतकाळाबद्दल कमालीचे आकर्षण असते. भूतकाळ समजून घेताना, त्यातील तपशील आणि त्याचा अर्थ लावणे हे दिसते तेवढे सोपे काम नसते. प्रतिभा, प्रज्ञा आणि सर्जनशीलता यांच्या मदतीने त्या इतिहासाचा अर्थ लावत असताना, नंतरच्या काळात सापडणाऱ्या नव्या पुराव्यांमुळे आधी लावलेला हा अर्थ बदलू शकतो, याचे पूर्ण भान खऱ्या इतिहासकाराला असते. इतिहासाचार्य राजवाडे, शेजवलकर यांच्यापासून ते जयसिंगराव पवार आणि गजानन मेहेंदळे यांच्यापर्यंतच्या सगळय़ा ज्येष्ठ संशोधकांना केवळ कागदाच्या आधारे इतिहास लिहिणे मान्य नसावे. जे घडून गेले, त्याकडे त्या काळाच्या अनेक घटनांच्या संदर्भात पाहणे आणि त्यातून एका नव्या सिद्धान्ताची रचना करणे असे इतिहासकाराचे काम असते. दैवतांचा अभ्यास करणाऱ्या ढेरे यांच्यासारख्या संशोधकाला नरसिंहाच्या संदर्भात सापडलेल्या या कागदपत्रांमुळे सिंहगडाबद्दलची नवी माहिती मिळाली. ढेरे यांनी या माहितीचा जो अन्वयार्थ लावला, तो त्यांच्या प्रतिभेचा साक्षात्कार आहे, असे म्हटले पाहिजे. दंतकथांनाच इतिहास समजणे जसे गैर, तसेच या दंतकथांच्या साहाय्याने एखाद्याचे मूल्यमापन करणेही चुकीचे. गेल्या काही वर्षांमध्ये अशा मूल्यमापनाने इतिहासाची जी मोडतोड होते आहे, त्याला आवर घालण्यासाठी खऱ्या इतिहासकारांनीच पुढे यायला हवे. त्यासाठी नव्या पिढीतील संशोधकांनी आधीच्या काळातील या कामाचा भार उचलण्याची खरी गरज आहे. डॉ. ढेरे यांना असे वाटते की, सध्याचे प्रश्न व्यावहारिकदृष्टय़ा गंभीर झाले असून जीवन आर्थिक पातळीवर अशक्य झाले आहे. व्यवहारावर दृष्टी ठेवली की शुद्ध ज्ञानोपासना ढिलावते. ज्ञान आणि सत्याच्या शोधासाठी काम करणे ही वेगळी प्रेरणा आहे. त्यामध्ये व्यवहार सुटणे गैरसोयीचे वाटते. व्यवहाराच्या आणि शुद्ध ज्ञानोपासनेच्या प्रेरणा वेगळय़ा आहेत, म्हणूनच त्यातील संघर्षही अटळ आहे. ढेरे यांचे हे विचार त्यांच्या आयुष्याचे सार सांगणारे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा