प्रबोधनकार ठाकरे यांच्या खोलीत अवघ्या १८ जणांच्या साक्षीने ‘शिवसेने’ची स्थापना झाली. मराठी माणसांचे हित जोपासण्याची शपथ घेणाऱ्या बाळासाहेबांना नंतर राजकीय खेळीही खेळाव्या लागल्या. शिवसेनाचा सामाजिक संघटना ते राजकीय पक्ष हा प्रवास कसकसा होत गेला, याचा तपशीलवार आढावा प्रस्तुत पुस्तकात घेतला गेला आहे. एकाच एका भूमिकेवर शेवटपर्यंत लोकांची सुहानुभूती मिळवता येत नाही, याची साक्ष आणि शिवसेनेची जन्मकुंडलीही या चरित्रावरून पटत जाते.
चरित्रलेखन करताना लेखकाला कोणताही अभिनिवेश न बाळगता विविध घटना, बदलत्या भूमिका, निर्णायक टप्पे यांची सुसंगतपणे मांडणी करून त्यांचा अन्वयार्थ लावण्याची जागा मोकळी सोडणे ही एक मोठी सोय असते. लेखकाची कदाचित ती अपरिहार्यता किंवा मर्यादाही असू शकते, मात्र अशा नीटपणे लिहिलेल्या चरित्रामुळे एक मोठा कालपट, त्यातील वस्तुनिष्ठ तपशिलांसह उपलब्ध होतो. वैभव पुरंदरे यांच्या ‘बाळ ठाकरे अँड द राईज ऑफ द शिवसेना’ या नव्या पुस्तकात शिवसेनेच्या वाटचालीतील बहुतेक सर्वच महत्त्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला गेला आहे.
वैभव पुरंदरे पेशाने पत्रकार आहेत. महानगरी मुंबईत गेल्या दोन-अडीच दशकांत ते पत्रकारिता करत असून याच कालखंडात शिवसेनेचा विस्तार मुंबई, ठाणे, पुणे या महानगरांच्या सीमा ओलांडून महाराष्ट्रात सर्वदूर झाला आहे. हे सर्व बदल आणि त्या अनुषंगाने बाळासाहेबांच्या, पर्यायाने शिवसेनेच्या कारकीर्दीचा मागोवा एक पत्रकार या नात्याने पुरंदरे यांनी मोठय़ा आत्मीयतेने घेतला आहे. शिवसेनेच्या राजकीय विस्तारपर्वाला सुरुवात झाली, त्या काळात, १९९९ मध्ये पुरंदरे यांनी ‘द सेना स्टोरी’ हे पुस्तक लिहिले. तेव्हाच शिवसेनेच्या वाटचालीचा त्यांचा गृहपाठ पुरेसा झाल्याने बाळासाहेबांच्या निधनानंतर लगेचच प्रस्तुत चरित्र ते अल्पावधीत हातावेगळे करू शकले. तसे पाहिले, तर बाळासाहेब आणि शिवसेना यांच्याविषयी अनेकांनी लिहून ठेवले आहे. स्वत: बाळासाहेबांनीही अनेक मुलाखतींतून आणि कारणपरत्वे त्यांच्या वाटचालीतील घटना, वादप्रसंगांबाबत नि:संदिग्धपणे टीकाटिप्पणी केली आहे. मराठीत अनेक पुस्तके तसेच वृत्तपत्रे, नियतकालिकांतूनही शिवसेनेविषयी खूप काही नोंदवून ठेवले आहे. प्रस्तुत पुस्तकासाठी या सर्वाचा धांडोळा घेतला गेल्याचे लक्षात येते.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ाचे रणशिंग फुंकले गेल्यानंतर हा लढा प्रामुख्याने त्याचे नेतृत्व करणाऱ्या मोठय़ा हिकमतीच्या नेत्यांभोवती केंद्रित झाला. एस. एम. जोशी, कॉ. श्रीपाद अमृत डांगे, आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, सेनापती बापट, माधवराव बागल, वा. रा. कोठारी अशा अनेकांनी आपले पक्षाभिनिवेश कायम ठेवूनदेखील संयुक्त महाराष्ट्र समितीच्या माध्यमातून मराठी माणसाचा आवाज एकदिलाने उच्चरवात पुकारला. आचार्य अत्रे ‘मराठा’च्या आणि बाळासाहेब ठाकरे ‘मार्मिक’च्या माध्यमातून या लढय़ात अग्रेसर राहिले. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील नेते इतस्तत: विखुरले. काहींनी राज्य व राष्ट्रीय पातळीवरील राजकारणाची कास धरली. स्वतंत्र राज्य मिळवूनही त्याचे नेतृत्व करणे समितीला साधले नाही. समाजवादी पक्ष, कम्युनिस्ट, शेतकरी कामगार पक्ष आदींना त्यानंतर कधी राज्यपातळीवर जाता आले नाही. ही पाश्र्वभूमी व परप्रांतीयांचे मुंबईत होणारे मोठय़ा प्रमाणावरील स्थलांतर, परिणामी मराठी भाषक राज्यात मराठी माणसाचीच गळचेपी होत आहे, या सार्वत्रिक समजुतीचा आधार घेऊन बाळासाहेबांनी साठच्या दशकांत शिवसेनेची मुहूर्तमेढ रोवली. पुढे विविध टप्प्यांवर प्रसंगोपात भूमिका घेत नव्वदच्या दशकांत शिवसेनेला राज्यभर नेऊन सत्तेची चव चाखायला दिली. बाळासाहेबांनी हे सारे कसे घडवून आणले, याबाबत या पुस्तकात फारसे काही हाती लागत नसले, तरी ते कस-कसे घडत गेले याची साद्यंत माहिती मात्र मिळते.
पुस्तकातील तपशीलवार नोंदीमुळे हा इतिहास नव्याने जाणून घेणाऱ्यांना रोचक वाटू शकतो. प्रबोधनकारांच्या खोलीत शिवसेनेची स्थापना १९ जून १९६६ रोजी झाली, या घटनेची नोंद घेताना लेखकाने उपलब्ध माहितीचा आधार घेऊन प्रत्यक्ष बाळासाहेब व त्यावेळी उपस्थित असलेल्या दिवाकर रावते आदींच्या मुलाखती घेऊन तपशिलांत अधिक भर घातली आहे. ‘मार्मिक’मधून जाहीर करूनसुद्धा त्यादिवशी शिवसेना स्थापनेचा नारळ फोडताना अवघे १८ जण उपस्थित होते. या नव्या संघटनेचे नामकरण प्रबोधनकारांनी केले, भूमिपुत्रांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढण्याची शपथ घेऊन अवघ्या अध्र्या तासात कार्यक्रम संपला वगैरे माहिती आज विस्मयकारक वाटू शकते.
मराठी माणसासाठी लढणारी आक्रमक संघटना यापुरतीच शिवसेनेची कार्यकक्षा सीमित होती. स्थापनेनंतर एक महिन्याने झालेल्या बैठकीत उपस्थितांनी शपथ घेतली. या शपथेचा मसुदा पुरंदरे यांनी दिला आहे. आपली मालमत्ता परप्रांतीयांना विकू नये, मराठी ग्राहकांशी विनयाने वागावे, मराठी नोकर नेमावे, मराठी शाळा, संस्थांना मदत करावी, मराठी बांधवांची गृहरचना संस्था काढावी, मराठी सण-समारंभांत भाग घ्यावा, मराठी बांधवांच्या मदतीला धावा याबरोबरच इंग्रजी टायपिंग शिकावे, आळस झटका, उडपी हॉटेलवर बहिष्कार टाकावा, मराठी व्यावसायिकाची उमेद वाढवा, त्याला नामोहरम करू नका, राज्यात कोठेही काम करण्याची मानसिकता जोपासा ही शपथपत्रातील कलमे तेव्हाच्या शिवसेना नेतृत्वाच्या मानसिकतेची साक्ष देतात. मराठी अस्मितेसाठी सुरू झालेल्या शिवसेनेला पुढे बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा डोस देऊन मराठी अस्मितेच्या परिघाबाहेर नेले. येथपर्यंतच्या- ९०च्या दशकांपर्यंतच्या- प्रवासातील सर्व महत्त्वाच्या घटना, घडामोडींची नोंद घेत लेखकाने त्या-त्या वेळच्या प्रभावशाली व्यक्ती व राजकीय स्थितीचा पट उलगडला आहे.
पक्षस्थापनेनंतरच्या पहिल्या दसरा मेळाव्यात (१९६६) ‘राजकारण म्हणजे गजकर्ण’ म्हणणारे बाळासाहेब नंतर राजकीय खेळी लीलया खेळू लागले. रस्त्यावरील हाणामारींमुळे राजकारणात शिवसेनेला पूर्वी मित्र मिळत नव्हते. कम्युनिस्ट आमदार कॉ. कृष्णा देसाई यांची हत्या (जून १९७०), शिवसेनेतील दगाबाजीनंतर ठाण्यातील सेना नगरसेवक श्रीधर खोपकर यांचा झालेला निर्घृण खून (एप्रिल १९८९), भिवंडी दंगल (१९७०) यांसारख्या घटनांमुळे शिवसेनेला जवळ करणे इतर राजकीय पक्षांना गैरसोयीचे वाटे. तथापि, बाळासाहेबांनी याच काळात हिंदुत्वाला अग्रभागी आणले. भाजपशी युती केल्यानंतर १९८४ मध्ये विलेपार्लेतील विधानसभेच्या पोटनिवडणुकीत हिंदुत्वाचा खुलेआम पुरस्कार करून हे कार्ड चालू शकते याचा राजकीय संदेश दिला आणि राजकारणातील पक्षाची अस्पृश्यता मिटवून टाकली. गेल्या पाच दशकांत झालेल्या विविध निवडणुकांत शिवसेनेच्या राजकीय भूमिका कसकशा बदलत गेल्या या संदर्भातल्या पुस्तकातील नोंदी उद्बोधक ठरतात.
मुंबई, ठाणे महापालिकांतील शिवसेनेचा शिरकाव व विस्तार, स्थानिक लोकाधिकार समितीच्या माध्यमातून या क्षेत्रांत शिवसेनेने मिळवलेली आपुलकी, गिरणी कामगारांचा संप, प्रॅक्टिकल सोशालिझ्मचा प्रयोग, भाजपशी युती, राज्यात सत्ताग्रहण, भुजबळ, राणे, नाईक यांचा पक्षत्याग, १९९२-९३च्या मुंबई दंगलीतील शिवसेनेची भूमिका आदींबाबत बहुतेकांना माहिती आहे. या सर्व टप्प्यांची संगतवार नोंद पुस्तकात आहे. पत्रकार या नात्याने पुरंदरे अलीकडच्या, विशेषत: राज-उद्धव मनभेदाची कारणमीमांसा करू शकले असते, मात्र येथेही काय घडले एवढेच सांगण्यापलीकडे ते जात नाहीत.
शिवसेनेच्या वाटचालीचा पट मांडताना लेखकाने तारखा, सनावळींची जंत्री होणार नाही याची काळजी घेत गोष्टीरूपाने निवेदन केले आहे. निवेदनाची गती कोठे मंदावू किंवा भरकटू दिलेली नाही. त्यामुळेही त्याचे संदर्भमूल्य कायम राहते. शिवसेनेचा घटनानुक्रमे इतिहास जाणून घेऊ इच्छिणारे राजकीय अभ्यासक, स्पर्धापरीक्षांचे विद्यार्थी आणि जिज्ञासू वाचकांसाठी हे पुस्तक चांगला दस्तावेज आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा