इंग्रजीत लेखन करणाऱ्या तरुण भारतीय लेखकांना सध्या चांगले दिवस आले आहेत. या लेखकांचे दोन भाग पडतात. एक भारतीय देवदेवता, भारतीय संस्कृती, इतिहास याविषयी लेखन करतो, तर दुसरा तरुणांच्या भावभावनांविषयी. पहिल्यात सध्याच्या आघाडीच्या तरुण लेखकाचे नाव आहे अमिष त्रिपाठी. (आणि दुसऱ्या प्रकारातले नाव आहे चेतन भगत.) बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्या त्रिपाठी यांनी ‘द इमॉर्टल्स ऑफ मेलुहा’, ‘द सिक्रेट ऑफ द नागाज्’ आणि ‘द ओथ ऑफ द वायुपुत्राज्’ ही शिवा ट्रियॉलॉजी लिहिली. ‘द इमॉर्टल्स ऑफ मेलुहा’चे हस्तलिखित त्रिपाठी घेऊन जात तेव्हा असं लेखन वाचकांना आवडणार नाही म्हणून वीसेक प्रकाशकांनी ते बाड नाकारलं. अखेर ते वेस्टलँड या प्रकाशनसंस्थेने २०१० मध्ये पुस्तकरूपात प्रकाशित केले. पहिल्याच आठवडय़ात  या पुस्तकाने ‘बेस्टसेलर’च्या यादीत स्थान मिळवून वाचकांची मोठय़ा प्रमाणावर पसंती मिळवली. पुढच्या वर्षी ‘द सिक्रेट ऑफ द नागाज्’ प्रकाशित झाले. या दोन्ही कादंबऱ्यांनी दोन वर्षांत २२ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘द ओथ ऑफ द वायुपुत्राज्’ या शेवटच्या कादंबरीचाही खप असाच जोरदार होतोय. हिंदी, गुजराती, मराठी, तेलुगु आणि असामीमध्ये पहिल्या दोन कादंबऱ्यांचे अनुवाद झाले आहेत. दुसऱ्या कादंबरीवरील चित्रपटाचे हक्कही विकले गेले आहेत. पहिला भाग युरोपातही प्रकाशित झाला आहे.
थोडक्यात केवळ ३८ वय असलेल्या त्रिपाठी यांची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. त्यांनी आपली पुढील कादंबरी कोणत्या विषयावर असेल हे अजून ठोसपणे सांगितलेले नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार कृष्ण, राम आणि परशुराम यांच्यावर असू शकेल. पण त्यासाठी त्यांना प्रकाशकाने किती आगाऊ मानधन द्यावे? काही कल्पना? तब्बल पाच कोटी रुपये त्रिपाठी यांनी मानधन म्हणून प्रकाशकाने दिलेले आहेत. आहे की नाही विक्रम?
पुढच्या शनिवारी –   ‘द ओथ ऑफ द वायुपुत्राज्’ विषयी ‘बुक-वर्म’मध्ये.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा