गानसरस्वती किशोरी आमोणकर यांना महाराष्ट्र शासनाचा पहिलाच ‘भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर झाल्याने गानरसिकांना मनस्वी आनंद झाला आहे.
किशोरीताईंनी गायिलेल्या असंख्य बंदिशींपैकी ‘सहेला रे आ मिल लाए’ या स्वरचित बंदिशीने गानरसिकांवर अधिराज्य करून वेड तर लावलेच, परंतु ही बंदिश त्यांनी अजरामर केली. किशोरीताई म्हणतात, एखाद्या कलाकाराचे सादरीकरण जेव्हा सगळ्यांना भावते, तेव्हा त्यातला राग कोणता हे महत्त्वाचे नसते. रसिकांना जाणवतो तो भाव असतो. त्यांची फसगत स्वरात होते पण स्वरांना स्पर्श करता येत नाही. त्यांना स्वरांमधला भाव जाणवत असतो. एखाद्या लहान मुलांसमोर शृंगार आळवणारा राग म्हटला तर त्याला तो कसा कळेल? त्यासाठी भावविश्वाचा अभ्यास केल्याशिवाय शास्त्रीय संगीत कळणार नाही. याचा अनुभव मला २००६च्या त्यांच्या ‘दिवाळी पहाट’च्या शनिवारवाडय़ातील मैफलीत आला. किशोरीताईंनी रम्य सकाळी नेहमीप्रमाणे मैफल रंगवली. त्यांचे गाणे म्हणजे मंदिराच्या गाभाऱ्यात बसून ईश्वराला केलेली आळवणीच होय. सरतेशेवटी करुणरसपूर्ण भैरवीचे सूर त्यांनी आळविले.
महानिर्वाणाचे वर्णन करणारी भैरवी मनाला स्पर्शून गेली. या संपूर्ण भैरवीने डोळ्यांना अश्रूंच्या धारा लागल्या. मानवाच्या मूर्ततेतून अमूर्ततेकडे घडणाऱ्या प्रवासाच्या वर्णनाने त्या भैरवीचे त्यांनी सोने केले होते. कधी एकदा किशोरीताईंना भेटेन असे झाले. मैफल संपल्यानंतर त्यांना भेटायला रांगच लागली, मीही त्यात होतो. किशोरीताईंना भेटून सांगितले, की नुकतेच माझ्या आईचे निधन झाले. तिच्या गंभीर आजारपणापासून अखेरच्या श्वासापर्यंतचे गांभीर्य तुमच्या स्वरात जाणवले. आईच्या आठवणीने आणि तुमच्या कारुण्यमय गायनाने व्याकुळता अनुभवली, धन्यवाद. अतिशय आत्मीयतेने त्यांनी माझे बोलणे ऐकल्यानंतर त्या म्हणाल्या, शास्त्रीय संगीताचे हेच तर महत्त्व आहे आणि आईच्या सेवेचे हेच तर पुण्य आहे. किशोरीताईंशी प्रत्यक्ष बोलण्याचा आनंद तर झालाच पण एक अलौकिक स्वर कायमचा मनात घर करून राहिला.
– सुनील दादोजी भंडगे, पुणे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा