‘निर्थक आणि कालबाह्य’ हा अग्रलेख (२७ फेब्रु.) सरकारच्या झापडबंद   कार्यसंस्कृतीवर लेझर किरण टाकणारा वाटला. आíथक तरतुदीचा विचार आणि नियोजन न करता प्रति वर्षी घोषणा आणि त्यांची वारंवार पुनरावृत्ती, घटनाअंतर्गत वार्षकि सोपस्कार, निवडणुकीतील मतांची बेगमी करण्याचे सत्ताधाऱ्यांचे साधन, सत्ताधारी पक्षावर तोंडसुख घेण्यासाठी विरोधी पक्षांना सुवर्णसंधी, प्रसारमाध्यमांना बातमीसाठी खुराक आणि त्यावर कृतिशून्य चर्चा हा रुळलेला मार्ग सोडून ‘लोकसत्ता’ने स्वप्नापेक्षा वास्तवाची जाणीव करून देत अधिक सजग, अभ्यासपूर्ण, वास्तवाचे रूळ पकडत या अग्रलेखातून ‘अर्थ’हीन अर्थसंकल्पाची आवश्यकता काय, हा लाखमोलाचा प्रश्न उपस्थित केला आहे.
 महाराष्ट्राच्या वाटय़ाला आलेली चिरीमिरी पाहता रेल्वे बजेट म्हणजे प्रतिवर्षांप्रमाणे महाराष्ट्राची उपेक्षा कायम ठेवत तोंडाला पाने पुसण्याचा वार्षकि कार्यक्रम होय यावर शिक्कामोर्तब झाले. देशाच्या एकूण महसुलात २० ते २५ टक्के वाटा उचलणाऱ्या महाराष्ट्राची रेल्वे सोयीसुविधाबाबतची अपेक्षा हा ‘कोहळा देऊन आवळा मागण्याचा’ प्रकार होय आणि तोही न मिळण्याचा पायंडा या वर्षी कायम राहिला आहे.
या पत्राद्वारे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडावयाचा आहे की, या बजेटची विश्वासार्हता  किती याचाही विचार होणे क्रमप्राप्त ठरते.
लालूप्रसाद रेल्वेमंत्री असताना गेली अनेक वष्रे भाववाढ न करता रेल्वे नफ्यात दाखवली जात होती, त्यांना रेल्वेला नफ्याच्या रुळावर आणल्यामुळे ‘मॅनेजमेंट गुरू’ असे त्यांचे कौतुक झाले. आयआयएम अहमदाबाद येथील विद्यार्थ्यांनाही त्यांनी ‘मॅनेजमेंटविषयी मार्गदर्शन’ केले होते. मग गेल्या ५ वर्षांत असे काय घडले, की रेल्वेचा तोटा वाढू लागला आणि वारंवार भाडेवाढ करावी लागली तरीही हा तोटा भरून निघत नाही? या अर्थसंकल्पानुसार आजमितीला रेल्वेचा खर्च आणि उत्पन्न यात तब्बल ९५ हजार कोटी रुपयांची तफावत आहे. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे. चालू वर्षांत या तोटय़ात २४,६०० कोटी रुपयांची वाढ होणार आहे. नेमके कोण दिशाभूल करत आहे? लालू बजेट ‘मॅनेज’ तर करत नव्हते ना?  बजेटमधील विश्वासार्हतेचे घटनात्मक उत्तरदायित्व कोणाचे आणि ते सक्षमपणे पाळले जाते किंवा नाही हे पाहणे कोणाचे कर्तव्य आहे,  हे वास्तव जनतेसमोर यायला हवे, हीच अपेक्षा.
– सुधीर लक्ष्मीकांत दाणी
बेलापूर, नवी मुंबई

नद्यांजवळचे गड हे शिवरायांचे नियोजनच..!
गडकिल्ल्यांविषयी सुंदर माहिती ‘लोकसत्ता’ व ‘लोकप्रभा’मधून अभिजित बेल्हेकर नियमित देत असतात. नुकतेच त्यांनी पूर्णगड किल्ल्याविषयी ‘ट्रेक इट’ पानावर लिहिले,  त्यात मात्र बहुधा अनावधानाने ते असे लिहून गेले की, मुचकुंदी नदीच्या उगमाजवळ विशाळगड व मुखाशी पूर्णगड आहे व बहुधा अशी एकमेव नदी असावी!
शिवछत्रपतींनी हे जाणीवपूर्वक घडवून आणले होते. तो योगायोग नव्हे. म्हणूनच आपल्याला उल्हास नदीच्या खोऱ्यात कर्जतजवळ किल्ले आढळतात. मुरबाड परिसरातील नद्यांच्या जवळ, कल्याण खाडीजवळ किल्ले आढळतात. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातीलच उदाहरण म्हणजे जंगली जयगड व व्याघ्रगड (वासोटा) या परिसरात उगम पावणारी वाशिष्ठी नदी चिपळूण ते दाभोळ अशी वाहते. तिच्याजवळ गोविंदगड (गोवळकोट) व दाभोळच्या खाडीजवळ गोपाळगड असे किल्ले आहेत. महाडजवळच्या सावित्रीचा उगम महाबळेश्वरला होतो, तिथे जवळ प्रतापगड आहे, पुढे अन्य छोटे किल्ले आहेत आणि बाणकोटचा किल्ला आहे.
हे सर्व नियोजनातूनच बनले आहे, कारण कोकणाकडे शिवछत्रपतींनी बारकाईने लक्ष दिले होते. इथल्या बंदरातील व्यापार, इथल्या नद्या व खाडय़ांतून होणारी सिद्दी, पोर्तुगीज, आदिलशाही वा इंग्रज अशा शत्रूंची हालचाल यावर पूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठीच हे गडकोट जाणीवपूर्वक निर्मिले गेले होते. काही गडकोट तर याच कारणासाठी शिवपूर्वकाळात निर्मिले आहेत. अभिजित बेल्हेकर यांना हा इतिहास माहीत आहेच. फक्त नजरचुकीने असा उल्लेख झाला असावा.
– सुधांशु नाईक, बहारीन

लाचखोरांना अटक : पुढे काय?
अलीकडे रोजच अशी बातमी वाचायला मिळते की, लाचखोर अधिकाऱ्याला मुद्देमालासह (सध्याच्या ‘मराठी’त ‘रंगेहाथ’) पकडले. अशा बातम्या सामान्यांना सुखावह वाटतात ‘देवाची काठी’ आपले काम करीत असल्याची भावना त्यांच्या मनात येते. मात्र या रोजच्या  बातम्या वाचून नवे नवे लोक लाच मागायला आणि घ्यायला धजावतात कसे, असाही प्रश्न जनसामन्यांच्या मनात येतो. मग आठवते की, यापूर्वी पकडल्या गेलेल्यांचे पुढे काय झाले, त्यांना किती आणि कोणती शिक्षा झाली, हे आपल्याला कळलेलेच नाही. ‘लोकसत्ता’ला माझी विनंती आहे की, निदान गेल्या दहा वर्षांतल्या अशा प्रकरणांचा धांडोळा घेऊन त्या प्रकरणांची सद्य:स्थिती लोकांना कळल्यास एकूणच न्यायपद्धतीवरच विश्वास वाढायला मदत होईल आणि जास्त लोक अशा प्रकरणाविषयी माहिती द्यायला पुढे येतील. अशा प्रकरणांची संख्या बघता एक एक खाते घेऊन खातेनिहाय माहिती रोजच्या रोज दिली तर बरे होईल.
– सुभाष मयेकर, अंधेरी (पश्चिम)

नेहमीसारखेच निराशाजनक!
मुंबईत ७२ फेऱ्या वाढवल्या जातील असे रेल्वे अर्थसंकल्पात सांगून पुन्हा एकदा मुंबईकरांना मूर्खच बनवले गेले आहे असे म्हणायला हरकत नाही. मागील वर्षीदेखील ७५ फेऱ्यांचे असेच आश्वासन मिळाले होते, पण सर्व मिळून मोजून फक्त १० ते १२ लोकल वाढवल्या गेल्या असतील आणि त्यापैकी १५ डब्यांच्या लोकल तर मोजक्याच आहेत.
दरवर्षी रेल्वेमंत्री येतो तो केवळ आपल्या प्रदेशाचाच विचार करताना दिसतो, पण राम नाईक, जॉर्ज फर्नाडिस, कलमाडी हे आमचे महाराष्ट्राचे मंत्री आमच्या कधीच कामी आले नाहीत. कलकत्ता येथे फक्त पाच लाख प्रवाशांसाठी जर मेट्रो होऊ शकते, तर मुंबईत दिवसाला ७५ लाख  प्रवासी दररोज इमानेइतबारे रेल्वे प्रवास करतात, त्यांच्यासाठी काहीच नाही?
– सचिन गंभीर, लालबाग.

धुळवडीला पाण्याचा गैरवापर नको
मार्चच्या शेवटच्या आठवडय़ात होळी आणि धुळवड आहे. रंग आणि पाण्याचा मुक्त वापर होईल. मुंबईत काही ठिकाणी या दिवशी पाण्याचे जास्तीचे tanker  मागवून पाण्याची मुक्त उधळण चालू असते. मुंबईत पाण्याचा अर्निबध वापर बारा महिने चालू असतो. धुळवडीच्या दिवशी तर कहरच असतो. महाराष्ट्रावर पडलेल्या दुष्काळाच्या भीषण सावलीच्या पाश्र्वभूमीवर पाण्याचा असा गरवापर टाळणे श्रेयस्कर ठरेल. हा अक्षम्य गरवापर टाळण्यासाठी वेळेवर पावले उचलली गेली पाहिजेत.
– राधा मराठे  

Story img Loader