‘निर्थक आणि कालबाह्य’ हा अग्रलेख (२७ फेब्रु.) सरकारच्या झापडबंद कार्यसंस्कृतीवर लेझर किरण टाकणारा वाटला. आíथक तरतुदीचा विचार आणि नियोजन न करता प्रति वर्षी घोषणा आणि त्यांची वारंवार पुनरावृत्ती, घटनाअंतर्गत वार्षकि सोपस्कार, निवडणुकीतील मतांची बेगमी करण्याचे सत्ताधाऱ्यांचे साधन, सत्ताधारी पक्षावर तोंडसुख घेण्यासाठी विरोधी पक्षांना सुवर्णसंधी, प्रसारमाध्यमांना बातमीसाठी खुराक आणि त्यावर कृतिशून्य चर्चा हा रुळलेला मार्ग सोडून ‘लोकसत्ता’ने स्वप्नापेक्षा वास्तवाची जाणीव करून देत अधिक सजग, अभ्यासपूर्ण, वास्तवाचे रूळ पकडत या अग्रलेखातून ‘अर्थ’हीन अर्थसंकल्पाची आवश्यकता काय, हा लाखमोलाचा प्रश्न उपस्थित केला आहे.
महाराष्ट्राच्या वाटय़ाला आलेली चिरीमिरी पाहता रेल्वे बजेट म्हणजे प्रतिवर्षांप्रमाणे महाराष्ट्राची उपेक्षा कायम ठेवत तोंडाला पाने पुसण्याचा वार्षकि कार्यक्रम होय यावर शिक्कामोर्तब झाले. देशाच्या एकूण महसुलात २० ते २५ टक्के वाटा उचलणाऱ्या महाराष्ट्राची रेल्वे सोयीसुविधाबाबतची अपेक्षा हा ‘कोहळा देऊन आवळा मागण्याचा’ प्रकार होय आणि तोही न मिळण्याचा पायंडा या वर्षी कायम राहिला आहे.
या पत्राद्वारे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडावयाचा आहे की, या बजेटची विश्वासार्हता किती याचाही विचार होणे क्रमप्राप्त ठरते.
लालूप्रसाद रेल्वेमंत्री असताना गेली अनेक वष्रे भाववाढ न करता रेल्वे नफ्यात दाखवली जात होती, त्यांना रेल्वेला नफ्याच्या रुळावर आणल्यामुळे ‘मॅनेजमेंट गुरू’ असे त्यांचे कौतुक झाले. आयआयएम अहमदाबाद येथील विद्यार्थ्यांनाही त्यांनी ‘मॅनेजमेंटविषयी मार्गदर्शन’ केले होते. मग गेल्या ५ वर्षांत असे काय घडले, की रेल्वेचा तोटा वाढू लागला आणि वारंवार भाडेवाढ करावी लागली तरीही हा तोटा भरून निघत नाही? या अर्थसंकल्पानुसार आजमितीला रेल्वेचा खर्च आणि उत्पन्न यात तब्बल ९५ हजार कोटी रुपयांची तफावत आहे. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे. चालू वर्षांत या तोटय़ात २४,६०० कोटी रुपयांची वाढ होणार आहे. नेमके कोण दिशाभूल करत आहे? लालू बजेट ‘मॅनेज’ तर करत नव्हते ना? बजेटमधील विश्वासार्हतेचे घटनात्मक उत्तरदायित्व कोणाचे आणि ते सक्षमपणे पाळले जाते किंवा नाही हे पाहणे कोणाचे कर्तव्य आहे, हे वास्तव जनतेसमोर यायला हवे, हीच अपेक्षा.
– सुधीर लक्ष्मीकांत दाणी
बेलापूर, नवी मुंबई
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा