‘जमाखर्च राजकारणाचा’ या सुहास पळशीकर यांच्या सदरातील ताजा (३० जाने.) लेख वाचला. पळशीकर यांनी राजकारण, पसा आणि गुन्हेगारी यांतील संबंधांचे अचूक विश्लेषण केले आहे. समाजातील एकंदर परिस्थितीचे प्रतििबब राजकारणात पडलेले दिसते. समाजातील मोठय़ा संख्येने लोकांचे जर कोणत्याही मार्गाने जास्तीतजास्त पसा मिळवून लवकरात लवकर श्रीमंत होणे हे एकमेव उद्दिष्ट असते तेव्हा अशा श्रीमंत व्यक्तींना समाजात, त्यांनी संपत्ती मिळवताना केलेल्या सर्व प्रकारच्या गुन्ह्य़ांकडे दुर्लक्ष करून प्रतिष्ठा आणि संरक्षण मिळते.
सुदैवाने सध्या प्रसारमाध्यमे, सामजिक संस्था, माहिती अधिकाराचा वापर करणारे कार्यकत्रे आणि न्यायसंस्था यांच्या जागरूकतेमुळे अशा प्रकारच्या प्रतिष्ठितांना काही प्रमाणात त्यांच्या गुन्ह्य़ांबद्दल शिक्षा होताना दिसते. भ्रष्टाचार, दहशत, खून, बलात्कार यांसारखे आरोप असलेल्या व्यक्तींना यापुढील सार्वजनिक निवडणुकीत राजकीय पक्षांकडून तिकीट मिळू नये याकरिता जनमताचा प्रचंड दबाव निर्माण करणे, त्याचबरोबर ज्यांनी अशी कृत्ये केली असून जे आजही समाजात उजळ माथ्याने वावरताहेत त्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी, त्यांची संपत्ती जप्त व्हावी याकरिता सातत्याने प्रयत्न करणे, अशा मार्गानी राजकारण, पसा आणि गुन्हेगारी यांतील साखळी तुटू शकेल.
– डॉ. मंगेश सावंत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठी लिपीसाठी नैसर्गिक, प्रचलित पद्धतच ठेवा!
मराठी लिपी सुधारणेबद्दल ‘लोकसत्ता’त आलेले दोन्ही लेख वाचले. (८ व २३ जाने.) एक सामान्य वाचक म्हणून लक्षात आले ते असे की, बालभारतीच्या पाठय़पुस्तकात प्रचलित असलेली तोडाक्षर पद्धत ही मराठीची नैसर्गिक धाटणी नाही. तांत्रिक कारणांमुळे काही वर्षे या पद्धतीने बालभारतीच्या पुस्तकांमध्ये ही अक्षरे छापली गेली. २००९ मध्ये उशिरा का होईना शासनाने ही चूक दुरुस्त केली असेल तर बालभारतीसारख्या शासकीय संस्थेने या शासकीय आदेशाची अंमलबजावणी करणे हे तिच्यावर बंधनकारकच आहे. तशीही ही तोडाक्षर पद्धत बालभारतीची पाठय़पुस्तके वगळता इतरत्र कुठेही वापरली जात नाही.
धोंगडे यांनी या प्रकारच्या लिखाणास परंपरावाद म्हटले असून लेखनपद्धतीस उगाचच उच्चनीचतेच्या कल्पना जोडल्या आहेत. हा परंपरावाद असला तरी तो डोळस आहे आणि शब्दाचा नेमका अर्थ समजण्यासाठी तो आवश्यकच आहे. मराठी लेखनात आपण संस्कृतचे सर्वस्वी अनुकरण करीत नाहीच. मात्र, चिन्मय, वाङ्मय असे काही शब्द कळण्यासाठी ते त्याच पद्धतीने लिहावे लागतील.
जे जे अनुच्चारित ते ते लिखाणातून काढूनच टाकावे असा हट्ट कोणत्याच भाषेबाबत वापरून चालत नाही. त्या दृष्टीने आपण वापरत असलेल्या इंग्रजी भाषेतील सायकॉलॉजी, नॉलेज, केमिस्ट्री असे कितीतरी शब्द पडताळून पाहता येतील.
बालभारतीच्या संस्कृत मजकुरात जोडाक्षर वापरलेले असते आणि खालील मराठी मजकुरात तोच शब्द तोडाक्षर पद्धतीने लिहिलेला असतो एकच शब्द, एकाच पानावर असा वेगवेगळय़ा पद्धतीने लिहिणे तर्कविसंगत नाही काय? त्यामुळे शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचा आपणच गोंधळ वाढवीत नाही काय?
तेव्हा उगाच विरोधासाठी विरोध न करता शासकीय निर्णय बालभारतीने लवकरात लवकर अमलात आणणेच योग्य ठरेल. नव्याने मराठी भाषेची ओळख करून घेणाऱ्या लहान मुलांना मराठी भाषेचे सौंदर्य, शब्दाचा नेमका अर्थ हे कळण्यासाठी जोडाक्षर हीच नैसर्गिक व प्रचलित असलेली पद्धत बालभारतीनेही अवलंबणे योग्य ठरेल.
– माधुरी तळवलकर, पुणे.

अल्पवयीन आरोपी घ्या, सुटा!
‘तो क्रूरकर्मा ‘अजाण’ ’ ही बातमी (लोकसत्ता, २९ जाने.) वाचली. जर तो अल्पवयीन असल्यामुळे त्याला शिक्षा करता येत नसेल तर त्याला या गुन्ह्यात ओढणाऱ्या सज्ञान गुन्हेगारांना त्याच्या गुन्ह्याबद्दल व त्याला कुमार्गात ओढल्याबद्दल शिक्षा द्यायला हवी. त्यासाठी प्रचलित कायद्यात आवश्यक त्या दुरुस्त्या करण्यात याव्यात. नाहीतर, बलात्कार एकटय़ाने न करता सामूहिक करून, त्यासाठी आपल्यात एखादा सज्ञान व्हायला थोडेच दिवस राहिलेला अल्पवयीन सामील करून घेतल्यास, नंतर त्याच्याकडून आपणच गुन्हा केल्याचा कबुलीजबाब घ्यायची व्यवस्था केल्यास किंवा जे काय घडले ते त्याच्यामुळेच असे वकिलांकडून कोर्टात सिद्ध करून घेतल्यास, सर्वाचीच सुटका होऊ शकते असा संदेश गुन्हेगारांमध्ये पसरण्याची शक्यता आहे. अल्पवयीन गुन्हेगारांचा असाच उपयोग दहशतवादी कृत्यांसाठीही केला जाण्याची शक्यता आहे. यातूनच गुन्हेगारी जगतात मुलांचे अपहरण करून त्यांतून अल्पवयीन गुन्हेगार निर्माण करणारे तळ निर्माण होण्याची शक्यताही आहे.
–  शरद कोर्डे, वृंदावन, ठाणे.

हाडांची चाचणी हवीच
अलका लांबा यांनी दिल्ली बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या वयाबद्दल जे मत व्यक्त केले आहे (लोकसत्ता २९ जाने.) ते योग्यच आहे. नुसता दाखला पुरेसा नाही. कारण अनेक ठिकाणी शाळेत प्रवेश घेताना चुकीच्या जन्मतारखा सादर केल्या जातात, कित्येक वेळा अंदाजाने वय सांगितले जाते, विशेषत: उत्तरेकडे सर्रास दोन-तीन वष्रे वय कमी लिहिले जाते व त्याचा फायदा नोकरीच्या वाढीव कालावधीसाठी घेतला जातो.
म्हणून केवळ शाळेचा दाखला प्रमाण न मानता अलका लांबा म्हणतात त्याप्रमाणे त्या अल्पवयीन आरोपीच्या हाडांची चाचणी घेऊनच वयाची सत्यता पडताळण्यात यावी म्हणजे सहावा आरोपीही शिक्षेस पात्र होऊ शकेल. याच आरोपीने त्या मुलीच्या शरीराची फार मोठी विटंबना केली आहे हे विसरता येत नाही. ते लक्षात घेऊन त्यालाही योग्य शिक्षा झाली तर बलात्कारित मुलीच्या आत्म्यालाही शांती मिळेल.
– श्रीनिवास जोशी, डोंबिवली (पूर्व).

देशावर एवढी वाईट वेळ?
ज्यांनी एक संपूर्ण राज्य बदलून टाकलं, प्रगत आणि आधुनिक अशी एका राज्याला ओळख मिळवून दिली आणि कधीही सार्वजनिक ठिकाणी तावातावाने आकांत केला नाही, अशा नरेंद्र मोदींकडून संपूर्ण देशाच्या परिवर्तनासाठी पंतप्रधान होण्याची अपेक्षा कुठे आणि यापकी काहीही आणि कधीही काही केल्याचं ऐकिवात नसलेल्या सुषमा स्वराज कुठे!  वर्षांनुवर्षे संसदेत योग्य-अयोग्य न पाहता तावातावाने वाचाळपणा करणाऱ्या सुषमा स्वराज पंतप्रधान होऊन देशाचे काय भले करतील, हा प्रश्न भाजपला निवडून देण्याची मन:स्थिती असलेल्या प्रत्येक मतदाराच्या मनात आज घोळत असणार. अखेर, सुषमा स्वराज पंतप्रधान होण्याएवढी वाईट वेळ देशावर आली आहे का?
– वंदना चिकेरुर, नाशिक.

हे चित्र महाराष्ट्रात दिसेल?
कुणीही काही म्हणो, पण गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची प्रतिमा गुजरातच्या लहानांपासून मोठय़ांपर्यंत सर्वाच्या मनात घर करते. याचे कारण त्यांची कार्यपद्धती! नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांना पुन्हा सत्ता मिळाली, म्हणजे निकाल जाहीर झाले, त्याच दिवशी मोठय़ा मनाने माजी मुख्यमंत्री व भाजपशी बंडखोरी करून ‘गुजरात परिवर्तन पार्टी’ काढणारे नेते केशुभाई पटेल यांना पाया पडायला व आशीर्वाद घ्यायला मोदी त्यांच्या निवासस्थानी गेले. .. विरोधकांशीही सौजन्य कायम राखण्याचे असे चित्र महाराष्ट्रातही पाहायला मिळेल का?
– प्रकाश भिकाजी आरेकर, सारीगाम (भिलाड).

बुद्धिमान भाटांचे ‘कर्तृत्व’
‘ते चित्र पाहा आणि..’ हा अग्रलेख (२३ जाने.) वाचला. काँग्रेसचे बुद्धिमान भाट मणिशंकर अय्यर यांनी पूर्वीही आपले काही ‘कर्तृत्व’ दाखवले आहे, त्यालाही उजाळा देणे आवश्यक आहे. हे गृहस्थ केंद्रीय पेट्रोलियम मंत्री असताना, त्यांच्याच खात्यातर्फे अंदमानात उभारल्या गेलेल्या स्मारकातून स्वा. सावरकरांच्या कवितेचा भाग वगळला म्हणून त्यांच्यावर टीका झाली. गेल्याच नोव्हेंबरात एका इंग्रजी चित्रवाणी वाहिनीवर त्यांनी संसदेतील विरोधी सदस्यांबद्दल ‘अ‍ॅनिमल’ (जनावरे) असा शब्द वापरला. त्याही वेळी त्यांच्यावर बरीच टीका झाली, हे वेगळे सांगायला नको. वेळोवेळी हे महाशय पक्षाला अडचणीत आणतच असतात.
– सां. रा. वाठारकर, चिंचवड.

मराठीतील सर्व लोकमानस बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to break chain of organized loot