‘होय, पण ब्लॉग म्हणजे काय ते सांगा.. इंटरनेट सेवेद्वारे स्वत:चा ब्लॉग सुरू करता येतो हे कळलं, पण तो कसा सुरू करावा, याबद्दल या सदरातून मार्गदर्शन मिळाल्यास बरे होईल’ अशा अर्थाच्या दोन ईमेलना उत्तर न दिल्याची रुखरुख वर्ष संपताना आणि अर्थातच या सदराचाही हा ‘विराम-लेख’ लिहिला जात असताना नक्कीच उरलेली आहे. पण त्या प्रश्नांची उत्तरं या सदरातून देणं हे सदराच्या कक्षेबाहेरचं होतं. ‘ब्लॉग कसा सुरू करावा’ किंवा इंग्रजीत ‘हाऊ टु स्टार्ट युअर ओन ब्लॉग’ आदी गुगलून काढल्यास ती उत्तरं मिळू शकत होती. शिवाय, कुणीतरी गेल्या दसऱ्याला स्वत:चा ब्लॉग सुरू करताना, लोकसत्तातल्या ‘वाचावे नेट-के’ या सदरामुळे स्वत:चा ब्लॉग सुरू करण्याच्या कल्पनेला चालना मिळाल्याचा उल्लेख केला आहे म्हणे..
म्हणजे आता ती उरलीसुरली रुखरुखदेखील विरून जाणार. पण या सदराची ‘कक्षा’ असा जो उल्लेख वरच्या परिच्छेदात आला आहे, त्याबद्दल एक पल्लेदार खुलासा दिल्यानं हे सदर आपण कसं वाचलंत, या प्रश्नाचं उत्तर मिळायला मदत होईल. मुद्दय़ांना घालतात तसे अंक या खुलाशाला घालावे लागतील, इतका तो मोठा आहे.
१) जानेवारी २०१२ मध्ये, ‘दर आठवडय़ाला ब्लॉगवर इंग्रजी/ मराठी किंवा कुठल्याही भाषेत काय चांगलं वाचलं’ हे वाचकांनीच सांगावं, म्हणजे ‘ब्लॉग-जगतातल्या वाचनीयतेचा साप्ताहिक शोध’ घ्यावा, अशा अगदी साध्या (पण ब्लॉगविश्वाची ताकद नक्कीच ओळखणाऱ्या) हेतूनं हे सदर सुरू झालं होतं.. त्याला एका लेखानं कलाटणी मिळाली.
२) त्या कलाटणीबद्दल नंतर बोलू.. आधी हा हेतू कसा गाळात गेला याबद्दलही सांगता येईल : एकतर, दर आठवडय़ाला खरोखरच ताजा मजकूर फक्त ब्लॉगवर वाचून त्याची शिफारस करणारे लोक थोडे. काहीजणांनी आपापल्या आवडत्या ब्लॉगच्या लिंका पाठवल्या, त्या ब्लॉगांवरली अखेरची नोंद जुनी! यातून एक अप्रिय निष्कर्ष असाही काढता येऊ लागला की ‘लोकसत्ता’चे वाचक एवढे विचक्षण असूनही- ते अद्याप ब्लॉगवाचनाकडे वळलेले नसावेत. एकदोघांनी स्वत:चेच ब्लॉग ‘शिफारस’ म्हणून पाठवायला सुरुवात केली, तेव्हा खडबडून जागं व्हावं अशी परिस्थिती दिसली. ‘माझ्या ब्लॉगला इतके वाचक, इतके चाहते’ असं सांगण्याचा आत्ममग्न अधिकार ब्लॉगलेखकाला असतोच, पण ब्लॉगचे वाचक म्हणून वाचकांचाही चांगल्याला चांगलं म्हणण्याचा जो एक अधिकार आहे, त्यावर आता ‘शिफारसीं’चं अतिक्रमण होणार, असा धोका दिसू लागला. मग तो धोका निवारण्यासाठी, इथं स्वत:च्याच ब्लॉगची शिफारस पाठवणं कसं चुकीचं आहे (आणि संबंधित ब्लॉगदेखील फार वाचण्याजोगा नाही) असं लिहावं लागलं. त्यानंतर टीकासत्र आणि शाब्दिक ‘झोडून काढणं’ सुरू झालं. (‘मुंजा’ आदी विशेषणं ‘वाचावे नेट-के’च्या त्या वेळी अनाम असलेल्या संकलकाला लावण्यात आली).
३) यातून हाच प्रश्न पुन्हा पडला की, हे ब्लॉगलेखक स्वत: आणि स्वत:ची वाचकमंडळी यांच्या पलीकडल्या जगाशी ‘लेखक’ म्हणून संबंध ठेवतात की नाही? ही त्या कलाटणीची नांदी होती. त्या नांदीत बरेच प्रश्न होते : ब्लॉग-वाचन संस्कृती आपल्याकडे आहे की नाही? ब्लॉगला प्रतिसाद काय प्रकारचे असतात? त्यात व्यक्ती म्हणून ब्लॉगरचं अभिनंदन असतं की चर्चाही असते? चर्चा पुढे नेणारे ब्लॉग इतके कमी कसे काय? ही चर्चा करणारे कमी असतील तर त्यांना ब्लॉगचं लेखक- सदस्यत्व देण्याची सोयही आहेच.. ती तरी का नाही वापरली जात? एक ब्लॉग पाच मैत्रिणी मिळून चालवतात. तो ब्लॉग आणि चारपाच मित्रांनी ‘व्हिजिबिलिटी’ वाढवण्यासाठी चालवलेला ग्रुप-ब्लॉग यांत फरक आहेच की नाही? ब्लॉगविश्वातले ‘हीरो’ शोभावेत अशांचे ब्लॉग, चर्चेऐवजी प्रत्येक अभिनंदनपर प्रतिसादाला उत्तरं देण्यातच गुरफटलेले कसे काय? या प्रश्नांना मराठी ब्लॉग-विश्वात जे जे आधार आहेत, त्यांचा एकत्रित उल्लेख करणारा एक स्वतंत्र लेख त्या अनामिक संकलकानं लिहिला.
४) तो लेख १२ मार्चचा. ‘स्वत:च्या आणि स्व-कीयांच्या’ (म्हणजे फक्त नातेवाईक नव्हे.. ओळखीपाळखीचे, ब्लॉगचे हमखास वाचक, असे- स्वकीय वाटणारे कुणीही)  जीवनशैलीची अपरिहार्यता साजरी करणाऱ्या लिखाणाला त्या-त्या वेळी चाहते लाभतातच, अशा अर्थाचं प्रतिपादन त्यात होतं. यातलं ‘जीवनशैलीची अपरिहार्यता साजरी करणं’ हे बऱ्याच जणांना कळलं नसल्याचा ठाम दावा काहीजणांनी केला. वाचकप्रिय ठरलेले लेखक व. पु. काळे यांचा उल्लेखही त्याच मजकुरात असल्यामुळे वास्तविक जीवनशैलीची अपरिहार्यता साजरी करणं म्हणजे काय, हे कळण्याचा एक दुवा (लिंक नव्हे, क्लू या अर्थानं) तिथंच मिळाला असता, पण त्याऐवजी व्यक्तिगत उणीदुणी काढल्याचे आरोप ‘वाचावे नेट-के’वर झाले.
५) यानंतर थेट ‘होय, ही ब्लॉगसमीक्षाच आहे. तुम्ही शिफारशी जरूर पाठवाल; पण आता अभिनवगुप्तच हे सदर लिहिणार’ अशा प्रकारचा पवित्रा म्हणा, हेतू म्हणा, मार्ग म्हणा.. ‘वाचावे नेट-के’तून जाहीर झाला. ब्लॉगसमीक्षा हा मोठा शब्द आहे याची विनम्र जाणीव तेव्हाही होती. ही समीक्षा आस्वादकी वळणानं पुढे गेल्याचं त्यानंतरच्या लेखांमधून दिसलं आहेच.
हेतू कसे आणि का बदलत गेले, याबद्दलचा खुलासा इथे संपतो.
‘लोकसत्ता’मधली बाकीची अनेक सदरं, वाचकांचा प्रतिसाद कसकसा आला, हे सांगून थांबताहेत. ‘वाचावे नेट-के’ थांबवताना प्रतिसादांपेक्षा मतमतांतरांबद्दल काही भूमिका मांडणं उचित ठरेल.. इतकी ही मतमतांतरं गेल्या पाऊण वर्षांत- म्हणजे ब्लॉगसमीक्षेचा हेतू जाहीर झाल्यानंतर- सर्वदूर झालेली आहेत.
वर्तमानपत्रातल्या मतप्रदर्शनाला जर वाचक असतील, तर त्यापैकी  ‘तुमचं मत अजिबात आवडलं नाही.. कारण ते चूकच आहे’ असं सांगणारे वाचक वर्तमानपत्रापर्यंत पोहोचतात. यातली जी ‘आवडलं नाही’ आणि ‘चूक आहे’ ही संगती असते, ती काही वेळा फार घाईत किंवा दगडाइतक्या घट्ट विचारप्रणालींचे आत्मसंरक्षक आविष्कार म्हणून आलेली असते. तसं एकदोनदाच ‘वाचावे नेट-के’बद्दल झालं. मोजून सांगायचं, तर तीनदा. ‘एक ही मारा लेकिन जोर से’ अशी भाषा करणाऱ्यानंच पुन्हा एकदा मारावं, मग त्याच्या मित्रमंडळींनी पुष्पवृष्टी करावी.. असं चालू होतं. ते कालौघात थांबलं.
पण पुष्पवृष्टीचा दुसरा प्रकार अधिकच विचार करायला लावणारा आहे. हा दुसरा प्रकार म्हणजे एखादी ब्लॉगलेखिका वा लेखकानं स्वत:च्या ब्लॉगबद्दल अमुक सदरात व्यक्त झालेली मतं मला पटली आहेत, असं स्वत:च्या ब्लॉगवरून इतरांना (मतं का पटली याची कारणं देऊन- सकारण) सांगितल्यानंतरही पुन्हा पुष्पवृष्टीच! ‘अभिनंदन’ वगैरे.. वास्तविक, त्या ब्लॉगलेखिकेनं वा ब्लॉगलेखकानं, आपल्याला संबंधित सदरात व्यक्त झालेली मतं पटल्याबद्दलच्या कारणांसाठी जी नोंद लिहिली आहे, त्या नोंदीची चर्चा जर पुढे नेली, तर संबंधित सदरातलं म्हणणं आणि वाचक म्हणून आपलं म्हणणं यांची शहानिशा होऊ शकली असती.
तसं फार वेळा झालं नाही, याची खंत मोठी आहे आणि मोठीच राहणार.
वर्तमानपत्रात एखाद्या ब्लॉगबद्दल ‘छापून आलंय’ म्हणजे त्या ब्लॉगला ‘प्रसिद्धी मिळालीय’ अशा समजातून हे घडतं का? तसं वाटत नाही..
प्रसिद्धीच्या पलीकडे, चर्चेकडे जाण्याचा गंभीर वर्तमानपत्रांचा मार्ग लोकांपर्यंत नीट पोहोचतो आहे, हे वेळोवेळी दिसतच असतं. इथं ‘वाचावे-नेटके’पुरतं बोलायचं तर या सदरात उल्लेख झाल्यानंतर काही ब्लॉगलेखकांनी त्यावर स्वत:ची जी मतं (आपापल्या ब्लॉग-नांदीत) मांडली, ती ‘चर्चा पुढे नेणं’ या प्रकारची होती. पण ब्लॉग-पानांवरून मात्र पुढे चर्चा झालीच नाही.. तिथे झाली ती पुष्पवृष्टी.
मराठी वाचकांनी फक्त वृत्तपत्रांना नव्हे, ब्लॉगनाही आता गांभीर्यानं वाचायला हवं. ‘मस्तच’, ‘अभिनंदन’ आदी शेऱ्यांची वृष्टी थांबवून चर्चा पुढे न्यायला हवी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा