भूगर्भीय लहरींमुळे ‘एक्स्प्रेस-वे’वर अपघात! असे वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये प्रथम पृष्ठावर रविवारी ठळकपणे प्रकाशित झाले आहे. (३ फेब्रु.) याच एक्सप्रेस महामार्गाने काही दिवसांपूर्वी आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे आणि त्याच्या दीड वर्षांच्या मुलाचा बळी घेतल्यानंतर अपघातांची मालिका गंभीरपणे घेण्यात आली. परंतु, या अहवालाने मानवी चुकांकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचे जाणवते.
महाराष्ट्र इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) मधील सिव्हिल अभियांत्रिकी शाखेचे विभागप्रमुख डॉ. सुनील पिंपळीकर आणि सिंहगड अॅकॅडमी ऑफ इंजिनीअरिंगचे प्राचार्य डॉ. अविनाश खरात यांनी आगळावेगळा निष्कर्ष काढताना मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या अपघातांपैकी बहुतांश विशिष्ट पट्टय़ामध्ये झाल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. वास्तविक हा निकष मानवी चुकांवर निष्कारण पांघरूण घालणारा आहे, कारण एक्स्प्रेस हाय वेवरील बहुतांश अपघातांना मानवी चुकाच सर्वार्थाने जबाबदार आहेत. रात्रीच्या वेळी अवजड वाहनांचे चालक नशेत गाडी चालवितात, दिव्यांचा प्रकाश अत्यंत तीव्र असतो त्यामुळे चालकाचे डोळे दिपतात, वेगाची नशा चढलेले चालक वाहनांची गती अनावश्यक वाढवितात, रात्रीच्या वेळेस रेडियमचे दिशादर्शक फलक कार्यरत नसतात, इंडिकेटर दिले न जाणे, सिग्नल तोडणे, राँग साईडने गाडय़ा काढणे या मानवी चुकांपायी अपघातांना निमंत्रण दिले जाते.
वाहतूक खात्याने याची गंभीर घेऊन दोषी चालकांवर कारवाई सुरू करणे आवश्यक आहे. बऱ्याच वाहनचालकांमध्ये दृष्टिदोष असूनही गाडय़ा चालवितात. त्यामुळेदेखील अपघात घडतात. अपघात टाळण्यासाठी शाळकरी मुले तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वाहतुकीचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे.
डॉ. गजानन झाडे, नागपूर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा