आजच्या अतिभोगवादी आणि अतिटोकाच्या व्यावहारिक जगात माणुसकीचा गहिवर असणारा, सत्तेच्या बाजारात मानवी चेहरा आणि मन जपणारा राज्यकर्ता माणूस भेटणं ही  दुर्मीळ  गोष्ट आहे. आधुनिक  महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वात हे  गुण होते. आज त्यांची पुण्यतिथी. त्यानिमित्त त्यांच्याच एका अनुयायाचा विशेष लेख..
महाराष्ट्र हे नेहमीच या देशातील अग्रेसर राज्य राहिले आहे. कालपरत्वे, प्रसंगानुरूप राज्यातील महामानवांनी दिलेले योगदान कारणीभूत आहे. आपले क्षेत्र गाजविण्याची परंपरा या राज्यात नेहमीच टिकून राहिली आहे. पण त्यातही एकाच वेळी समाजकारण, राजकारण, साहित्य, कला, सहकार, कृषि-औद्योगिक विकास, वाचन संस्कृती, समाज प्रबोधन, प्रशासन अशा असंख्य क्षेत्रात स्वत:ची छाप उमटविलेले यशवंतराव चव्हाण हे एकमेव व्यक्तिमत्त्व आहे. ‘महाराष्ट्र ही कार्यकर्त्यांची खाण आहे’ असे महात्मा गांधी म्हणायचे. हे मत जर सत्य असेल तर चव्हाणसाहेबांना या खाणीतील कोहिनूर हिराच म्हणावे लागेल. ते खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे शिल्पकार ठरले. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि या राज्याला दिशा देण्याची, घडविण्याची अवघड जबाबदारी चव्हाणसाहेबांवर येऊन पडली. ती त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. यापैकी कोणत्याही क्षेत्रातील  दिशादर्शक धोरणांमध्ये दुर्लक्ष अथवा चूक झाली असती तर त्याचे दूरगामी विपरीत परिणाम या राज्यातील त्यांच्या नंतरच्या अनेक पिढय़ांना भोगावे लागले असते.
साहेबांना खऱ्या अर्थानं दोनच वर्षे महाराष्ट्रात मिळाली. पण या थोडय़ा काळात राज्याच्या राजकारभाराची जी चौकट त्यांनी निर्माण केली ती अद्याप कोणी बदलू शकलं नाही, इतकी ती अचूक व परिपूर्ण होती. या उण्यापुऱ्या दोन वर्षांच्या काळात सर्व स्तरातील घटकांना बरोबर घेऊन त्यांनी जे साध्य करून दाखविले तो आलेख पुढे मात्र उंचावत गेला नाही, हे कटू सत्य आहे.
रॉय यांचा मानवतावाद, टिळकांचा राष्ट्रवाद, नेहरूंचा गांधीवाद आणि समाजवाद, महर्षी शिंदेंचा बहुजनवाद या वेगवेगळ्या संस्कारातून त्यांची वैचारिक बैठक पक्की झाली. यांच्या जोडीला ग्रामीण शहाणपण त्यांच्याकडे पुरेपूर होतं. या नैतिक अधिष्ठानावरच त्यांनी आयुष्यभर राजकारण केले. पण ते साधताना कोणत्याही विचारसरणीच्या एकांगी टोकाला ते कधी गेले नाहीत. त्यापायी पराकोटीची टीका सहन करूनही ही वैचारिक लवचिकता त्यांनी कधी हरवू दिली नाही. मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी महाराष्ट्रातील सर्व समाज एकसंध करण्याचे काम प्राधान्याने हाती घेतले. त्या आधीची ब्राह्मणेतर चळवळ आणि नंतरची आंबेडकरवादी चळवळ यामुळे एकमेकांपासून दुरावलेल्या सर्व घटकांना त्यांनी सामाजिक योगदानात सहभागी करून घेतलं. एका बाजूला गांधीवधानंतर दुरावलेल्या ब्राह्मण समाजाला त्यांनी सक्रिय दिलासा दिला तर दुसऱ्या बाजूला आंबेडकरांच्या अनुयायांनाही वंचित जीवनाच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यांना सत्तेत सहभागी करून घेतलं. हेच त्यांचे ‘बेरजेचे राजकारण’ होते असे मी मानतो.
लोकशाही व्यवस्थेमध्ये सामान्य माणसाचा सहभाग हाच महत्त्वाचा घटक असतो या विचाराला त्यांनी कधीच अंतर दिले नाही. सुरुवातीला यात शिक्षित, उच्चशिक्षित अधिकारी आणि अर्धशिक्षित लोकप्रतिनिधी असा संघर्ष उभा राहिला. जिल्हा परिषदेत अध्यक्षाने सीईओच्या केबिनमध्ये जावे की सीईओने अध्यक्षांच्या केबिनमध्ये जावे असे निर्थक वाद उभे राहिले. या विषयी आम्हा कार्यकर्त्यांना आणि अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना साहेब म्हणाले होते की, ‘तुमचे इगो प्रॉब्लेम महत्त्वाचे नाहीत तर हा प्रयोग महत्त्वाचा आहे, याचे भान सगळ्यांनी ठेवले पाहिजे. मला अशा तक्रारींमध्ये मुळीच तथ्य वाटत नाही. सर्वसामान्यांच्या आणि विकासाच्या प्रश्नांवर दोघांनी आपली कार्यक्षमता गुंतवावी.’ हा प्रयोग मला आणि तुम्हालाही यशस्वी करून दाखवायचा आहे.
या व्यवस्थेत काम करणाऱ्या पदाधिकारी व अधिकारी यांना मार्गदर्शन करून त्यांच्यातला विश्वास त्यांनी वाढवला. त्यामुळे त्यांच्या प्रोत्साहनाने आणि अपेक्षेनुसार ग्रामीण भागातील कर्तृत्ववान कार्यकर्त्यांनी एक जोमदार नवी पिढी पुऱ्या ताकदीने या मुख्य प्रवाहात उतरली. त्यांनी हे आव्हान स्वीकारले. सुरुवातीच्या २०-२५ वर्षांच्या काळाकडे पाहिले तर अनेक अडचणींवर मात करून त्यांनी नेत्रदीपक कामगिरी बजावली. या समृद्ध अनुभवातूनच पंचायत राज व्यवस्थेने राज्याला आमदार, खासदार, मंत्री आणि मुख्यमंत्री दिले. त्यांनी कार्यक्षमपणे राज्याचा विकास घडवून आणला.
साहेबांना शिक्षणाचे नेमके महत्त्व माहीत होते आणि ते तळागाळापर्यंत पोहोचले पाहिजे असा त्यांचा प्रयत्न होता. एकदा राज्याच्या मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक चालू होती. त्यात विषय होता राज्यातील आर्थिकदृष्टय़ा मागास असलेल्या (ई.बी.सी.) मुला-मुलींना मोफत शिक्षण देण्याचा. त्यावर अर्थमंत्र्यांनी, ‘अशा योजनांसाठी सरकारी तिजोरीत पैसा नाही. ही योजना मंजूर करून मी राज्याचे दिवाळे निघू देणार नाही’ असे स्पष्ट करताच चव्हाणसाहेब ताडकन उभे राहिले आणि म्हणाले, ‘ही योजना मंजूर केल्याने राज्याचे दिवाळे निघेल असे मला वाटत नाही. परंतु या गरीब समाजासाठी राज्याचे दिवाळे निघणार असेल तरी चालेल. ही योजना मंजूर करावीच लागेल आणि योजना मंजूर होणार नसेल तर या राज्याचा मुख्यमंत्री राहण्यात मला मुळीच स्वारस्य नाही. मी ही सभा सोडून जात आहे.’ एवढे बोलून ते आपल्या कार्यालयात निघून गेले. ही ई.बी.सी. योजना लागू झाली आणि म्हणूनच गोरगरिबांची, शेतकऱ्यांची लाखो मुले शिक्षण घेऊ शकली. स्वत:च्या पायावर उभी राहू  शकली आणि नोकरी-व्यवसायांच्या माध्यमातून आपल्या पुढच्या पिढय़ा घडवू शकली.
ग्रामीण महाराष्ट्रातील असंख्य शाळा आणि महाविद्यालयांच्या स्थापनेसाठी त्यांनी सक्रिय प्रोत्साहन दिले. महाराष्ट्रात सुरू झालेला लोकमान्य टिळक, आगरकर, महर्षी कर्वे, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, महर्षी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी अंगीकारलेला हा साक्षरतेचा शिक्षणाचा महामार्ग सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला तो चव्हाणसाहेबांच्या दूरदृष्टीमुळे. साहेब नेहमी म्हणत की, ‘मला अशिक्षित बेकारांच्या फौजेपेक्षा सुशिक्षित बेकारांची फौज परवडेल. कारण ते देशाचे प्रश्न समजावून घेऊन सोडविण्यास मदत करतील.’ त्यांनी जातिभेदविरहित सुसंस्कृत, सुसंपन्न महाराष्ट्राचं स्वप्न पाहिलं होतं. काळाच्या पुढे आपल्याला कसं राहता येईल असेच त्यांचे विचार आणि कृती होती.
चव्हाणसाहेबांना अमोघ वक्तृत्वाची देन होती. त्यांच्या उच्चकोटीच्या वैचारिक भाषणांमुळे खूप खोलवर समाजशिक्षण झाले आणि समाजाची जडणघडण झाली. अडाणी, खेडवळ, कफल्लक बहुजन समाजाला राष्ट्रीय दृष्टी मिळाली. हरवलेले आत्मभान समाजाला गवसले. शाहू, फुले, आंबेडकरांचा समतावाद त्यांनी जाणीवपूर्वक व्यापक आणि उन्नत केला. चव्हाणसाहेब मुख्यमंत्री असताना महार वतने रद्द करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत आला होता. तो मंजूर केला तर राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त ताण पडेल असा मुद्दा चर्चेत पुढे आला. तेव्हा साहेब म्हणाले, ‘महार वतने रद्द करण्याचा प्रश्न हा पैशांचा नसून मानवी मूल्यांचा आहे. शासनास  किती जरी खर्च आला तरी हा डाग धुऊन काढला पाहिजे.’ आज देशात महाराष्ट्र पुरोगामी विचारांत, सुशिक्षिततेत अग्रेसर आहे, तो साहेबांच्या अशाच कामगिरींमुळे. चव्हाणसाहेबांच्या विचारांच्या भांडाराला खरे तर अखिल भारतीय स्वरूप येणे आवश्यक आहे.
टोकाची भांडवलशाही किंवा साम्यवाद स्वीकारून भारतासारख्या विकसनशील देशाची सामाजिक आणि आर्थिक उन्नती होणार नाही हे त्यांनी ओळखले होते. (आज युरोपातील भांडवलशाही आणि रशियातील साम्यवादी अर्थव्यवस्था ज्या पद्धतीने कोलमडून पडत आहे, हे पाहिल्यावर चव्हाणसाहेबांचे वैचारिक मोठेपण नेमके कळते.) मधला मार्ग म्हणून त्यांनी समाजवादी विचारसरणी स्वीकारली आणि त्यातील सर्वसामान्यांच्या जनसमूहाचा सहभाग हा केंद्रबिंदू मानला. याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्याचा फायदा तळातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी सहकाराला प्रोत्साहन दिलं. त्यांनी घेतलेल्या या मूलभूत आणि क्रांतिकारी निर्णयामुळे ग्रामीण महाराष्ट्रातील सर्वसामान्यांच्या आयुष्यात आमूलाग्र सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन घडून आले. महाराष्ट्रात आज सुमारे ६ कोटी लोक कोणत्या ना कोणत्या सहकारी संस्थेचे सभासद आहेत.
सहकारी संस्था, नागरी व जिल्हा सहकारी बँका, पतसंस्था, अन्न व दूध प्रक्रिया संस्था, मार्केट कमिटय़ा, राज्यात १५० पेक्षा जास्त संख्येने उभे राहिलेले सहकारी साखर कारखाने यांचे एक जाळेच महाराष्ट्रात विणले गेले. सहकारातील कामाचा प्रचंड आवाका कळण्यासाठी मी कारखान्यांचे उदाहरण देतो. आज राज्यात सहकारी साखर कारखान्यांमध्ये १ लाख कर्मचारी काम करतात. १० लाख मजुरांना ऊसतोडीचा रोजगार मिळतो. दरवर्षी ५० हजार कोटीची उलाढाल होते. गेल्या ५० वर्षांत ७० हजार कोटीचा महसूल या क्षेत्राने सरकारला दिला. अशीच प्रचंड आर्थिक आकडेवारी इतर सहकारी संस्थांचीही आहे. सहकारात आज १ लाख २८ हजार कोटींच्या ठेवी आहेत.
परंतु यात मला या आकडेवारीपेक्षाही महत्त्वाचं वाटतं, ते म्हणजे हजारो वर्षे दबला गेलेला-िपजला गेलेला, अडवला-नागवला गेलेला, सरंजामशाही आणि सावकारशाहीच्या मगरमिठीत घट्ट रुतलेला गोरगरीब आणि त्यापेक्षा आत्मभान विसरलेल्या समाजाला त्यांनी ते परत मिळवून दिले.
चव्हाणसाहेब नेहमी म्हणायचे, संस्था उभारणीची, विकासाची, परिवर्तनाची ही वाट करवतीच्या पात्यासारखी धारदार व तीक्ष्ण असते. त्यावरून चालताना तुमचे पाय चिरतील, रक्तबंबाळ होतील, पण तरी चालत राहा. ५०-६० वर्षांपूर्वी संस्था उभ्या करणं ही साधीसोपी गोष्ट नव्हती. पण साहेबांच्या विचारानं भारावलेल्या त्यांच्या पिढीतील कार्यकर्त्यांनी संस्था उभ्या केल्या, त्या जपल्या, वाढवल्या. परंतु त्यांच्या कर्तृत्वाची म्हणावी तशी दखल घेतली गेली नाही. त्यांच्या वाटय़ाला साहित्य आणि प्रसिद्धी माध्यमातून टिंगलटवाळीच आली हा भाग वेगळा.
या चळवळीतून प्रचंड मोठे काम उभे राहिले असले तरी हळूहळू ही सामाजिक बांधीलकी मानणारी पिढी काळाच्या ओघात अस्तंगत होत गेली. गेल्या चार दशकांत जी मोठी झेप घ्यायला हवी होती ती अभावानेच घेतली गेली. नवी पिढी, नवे राज्यकर्ते, नवे कार्यकर्ते आणि नवी परिस्थिती या सगळ्यांचा विपरीत परिणाम सहकारावर झाला. बेसुमार भ्रष्टाचाराबरोबरच जागतिकीकरण आणि व्यावसायिकतेचा अभाव यांच्या आगीत आज सहकार होरपळतो आहे.
आज या क्षेत्राची काय अवस्था आहे? राज्यातील अनेक सहकारी बँका, नागरी बँका, पतसंस्था अडचणीत आहेत. अनेक सहकारी साखर कारखाने तोटय़ात आणि दिवाळखोरीत निघाले असून, खाजगी कारखान्यांची संख्या वाढत आहे. अनेक बँका, पतसंस्था अवसायनात निघाल्यामुळे सामान्य माणसांच्या कोटय़वधी रुपयांच्या ठेवी बुडाल्या आहेत. विश्वस्त म्हणून काम पाहणाऱ्या काही मंडळींनीच या संस्था भ्रष्टाचाराने खाऊन टाकल्या. सोन्याचं अंडं देणारी कोंबडीच कापून खाण्याचा अघोरी प्रकार या क्षेत्रात शिरलेल्या स्वार्थी प्रवृत्तीने केला.
साहेबांनी तयार केलेली त्याग आणि विचारांचं अधिष्ठान असलेली कार्यकर्त्यांंची फळी नंतरचा कुणीही राज्यकर्ता तयार करू शकला नाही ही एक शोकांतिका आहे. त्यामुळे पुढच्या २५-३० वर्षांत या चळवळीला जबरदस्त हादरा बसणार आहे.
रणजीत देसाईंनी ‘स्वामी’ आणि ‘श्रीमान योगी’ लिहिलं. साहेबांनी त्यांच्या हातात सोन्याचं कडं घातलं. रणजीत देसाईंच्या ‘राजा रविवर्मा’ या पुस्तकाचे प्रकाशन साहेबांच्या हस्ते कोवाडला होणार होते. मी त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो. भाषणात साहेब म्हणाले, ‘‘मी पुस्तक प्रकाशनाला आलो हे खरे आहे, पण त्यापेक्षा रणजीतने ज्या जागी बसून स्वामी लिहिली, त्या जागेला वंदन करायचे होते म्हणून मी कोवाडला आलो.’’
आज मला वाटते की, चव्हाणसाहेबांनी मान, सत्ता, अधिकार जेवढे भोगले त्यापेक्षा अपमान, अवहेलना, विरोध यांचे दु:ख अधिक भोगले. पण त्यांनी कधी त्यांचा उच्चार केला नाही की प्रहार करणाऱ्यांविषयी राग अथवा सुडाची भावना बाळगली नाही. फक्त एकदाच ही अगतिकता त्यांच्या तोंडून बाहेर पडली.
चव्हाणसाहेबांच्या एका सभेतील भाषणाच्या वेळी मी तिथे हजर होतो. साहेब म्हणाले, ‘‘महाराष्ट्रामध्ये मी माकडांची माणसं बनवली, माणसांचे सरदार बनवले, त्यांच्या हातात सहकार, पंचायतराज व्यवस्था या साधनांच्या तलवारी दिल्या आणि त्याच तलवारी घेऊन ते माझ्यावर वार करायला निघाले आहेत.’’
साऱ्या महाराष्ट्राचा हा अनभिषिक्त सम्राट, ज्याच्या विचाराने, वाणीने मंत्रमुग्ध झालेला समाज आणि भारावून गेलेलं समाजमन मी अनुभवलं होतं. मला तर महाभारतातल्या शरपंजरी पडलेल्या भीष्माचार्याची आठवण झाली. आम्ही पुष्कळ वेळ तेथे होतो. त्यांना उठून बसविले आणि अशाही परिस्थितीत त्यांनी मला विचारले, ‘‘यशवंतराव, तुमचे तिकीट नक्की झाले ना?’’ असंख्यांची काळजी वाहत असेच जगले ते शेवटच्या श्वासापर्यंत. या दुखण्यातून ते सावरतील असे वाटले होते, पण दुर्दैवाने नियतीने तसे घडविले नाही.
आज चव्हाणसाहेब जाऊन एक काळ लोटला आहे. समाजमन हे झटकन विस्मृतीत जाते. चव्हाणसाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांच्या दिल्लीतील बंगल्यातून त्यांचे व्यक्तिगत सामान हलवायला अधिकारी तेथे गेले, तेव्हा त्यांच्या कपाटात सापडलेल्या स्टेट बँकेच्या पासबुकात साऱ्या हयातीत त्यांनी मागे ठेवलेली ३६ हजार रुपयांची शिल्लकच तेवढी आढळली. संपत्ती आणि सत्तेच्या मायाजाळात न अडकता आपण येथे कशासाठी आलो आहोत? आपले नेमके ध्येय आणि उद्दिष्ट काय? याचे भान असणारा हा नेता होता.
सर्वसामान्यांचे प्रश्न, समस्या आणि अगतिकता या आपल्याच आहेत, ही बांधीलकी मानणारा तो एक संवेदनशील माणूस होता. एक परिपूर्ण कलारसिक, द्रष्टा विचारवंत, उत्कट प्रेमी आणि मातृभक्त अशा चतुरस्र व्यक्तिमत्त्वाचा तो धनी होता. टोकाची व्यावहारिकता हे परिमाण असणाऱ्या राजकीय क्षेत्रातील तो एक ‘मानवी चेहरा’ होता.
चव्हाणसाहेबांनी स्वत:च्या विचारानं आणि कृतीनं आचरणात आणलेले, आयुष्यभर जपलेले मापदंड आज कुठे गेलेत? आमच्यासारख्या राजकारणातल्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आणि राज्यकर्ते असणाऱ्या नेत्यांनी आत्मचिंतन करावं असं त्यांचं व्यक्तिमत्त्व होतं.
सत्तेला, सरकारला, प्रशासनाला एक मानवी चेहरा देणारा युगपुरुष म्हणून त्यांच्याकडे पाहावे लागेल.
संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीच्या काळात अत्यंत कठीण प्रसंगात त्यांची सभा नगरला होऊ न देण्याचा विरोधी पक्षाचा अट्टहास असताना ही सभा यशस्वी करून दाखविणारा नगरचा सामान्य कार्यकर्ता छबुराव लांडगे आणि त्यानंतर त्याच्या घरी चहाला जाऊ नये असा पक्षांतर्गत गटबाजीचा टोकाचा विरोध असताना ‘मी इतक्या कृतघ्न मनाचा नाही’ म्हणत तिथे जाणारा, जिवाला जीव देऊन कार्यकर्त्यांचं मन जपणारा..
उजनी धरणाचं भूमिपूजन करताना ‘मी पांडुरंगाची चंद्रभागा आज अडवली’ असं म्हणून व्याकुळ होणारा..
पंतप्रधानपदाची संधी चालून आली असताना इंदिरा गांधी यांच्या घरी स्वत: जाऊन, ‘तुम्ही इच्छुक असाल तर मी नाही’ असं म्हणून नेहरूंच्यावरची श्रद्धा आणि निष्ठा जपणारा..
आजच्या या सगळ्या अतिभोगवादी आणि अतिटोकाच्या व्यावहारिक जगात माणुसकीचा गहिवर असणारा, सत्तेच्या बाजारात मानवी चेहरा आणि मन जपणारा राज्यकर्ता माणूस भेटणं ही  दुर्मीळ गोष्ट आहे. साहेबांनी आपल्या आयुष्यात या ‘मॉरल सेंटिमेंट्स’ कायम जपल्या आणि म्हणूनच टोकाची व्यावहारिकता हे परिमाण असणाऱ्या राजकीय क्षेत्रातील यशवंतराव चव्हाण हा एक मानवी चेहरा होता. राज्याला, प्रशासनाला त्यांनी कायम हा मानवी चेहरा देण्याचा प्रयत्न केला.
माझ्या आयुष्यात मला त्यांना बघता आलं, ऐकता आलं, वाचता आलं आणि अनुभवता आलं. आयुष्यभर त्यांच्या वैचारिक मुशीत घडता आलं आणि बदलत्या काळातही होता होईल तेवढं ते जपण्याचा प्रयत्न करता आला. आज चव्हाणसाहेबांचा कार्यकर्ता म्हणून माझी जी ओळख आहे, याचा सार्थ अभिमान मला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व रविवार विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Human face in politics
Show comments