चित्ताचं काम आहे परमतत्त्वाचं चिंतन, मनाचं काम आहे परमतत्त्वाचं मनन, बुद्धीचं काम आहे विवेक, अर्थात परमतत्त्वाचं ग्रहण म्हणजेच शाश्वताची निवड आणि ‘अहं’चं काम आहे ‘सोऽहं’चं, ‘अहं ब्रह्मास्मि’चं स्मरण! ही स्थिती होईल तेव्हाच चित्ताचं समत्व होईल, मनाचं समत्व होईल. आज चित्तात भौतिकाचं चिंतन, मनात भौतिकाचं मनन, बुद्धी निव्वळ भौतिकाच्याच निवडीत व्यग्र आहे. ‘अहं’ हा ‘सोऽहं’मध्ये नव्हे तर ‘देहोऽहं’ अर्थात देहच मी, या भावनेत व्यग्र आहे. आता हे भौतिक आणि हा देह कसा आहे? तो अशाश्वत आहे. काळप्रभावानुसार बदलता आहे. त्यामुळे जे सतत बदलतं आहे, जे सतत अनिश्चित आहे, अशाश्वत आहे त्याच्याच चिंतनात, मननात, बोधात, भावनेत मन गुंतल्यामुळेच जगणंही अस्थिरतेनं भरलं आहे. जीवन साधंसरळ न रहाता खाचखळग्यांनी भरलेलं झालं आहे. त्यात अज्ञानाचा अंधारही पसरला आहे! या खाचखळग्यांतून, अंधारातून वाट काढत सरळ मार्गावर जाण्यासाठी सद्गुरूबोधाचाच दिवा हाती घ्यायला हवा. मग चालताना कोणताही अपाय ओढवणार नाही. माउलींच्या शब्दांत सांगायचं तर, ‘‘जैसें मार्गे चि चालतां। अपावो न पवे सर्वथा। कां दीपाधारें वर्ततां। नाडळिजें।।’’ (ज्ञानेश्वरी अ. २, ओवी १८७/ नित्यपाठ ओवी सातवी). तेव्हा याच भावनेनं सद्गुरूंचा आधार घ्यायला हवा, त्यांचा बोध पाहायला हवा. ते साधलं तर, सद्गुरूबोधाचं अखंड स्मरण आणि त्यानुरूप जगणं साधेल आणि मग मनात सदोदित प्रसन्नतेचा अनुभव येईल. द्वैताचाच निरास होत गेल्यानं द्वैतमय संसाराचा भ्रामक प्रभावही ओसरेल. मग अशा चित्तातून समस्त संसारदु:खच ओसरेल आणि देखें अखंडित प्रसन्नता। आथी जेथ चित्ता। तेथ रिगणें नाहीं समस्तां। संसारदु:खां।। ही स्थिती साधेल. मग माउली सांगतात की, जैसा अमृताचा निर्झरु। प्रसवे जयाचा जठरु। तया क्षुधेतृषेचा अडदरु। कंहींचि नाहीं।। अशी अवस्था होईल! वेलीवर मोगरा फुलावा आणि त्या नाजूक फुलांचं सौंदर्य पाहून भान हरपावं की त्या फुलांच्या स्वाभाविक गंधानं भान हरपावं, हे सांगणं जसं अवघड तसं या ओवीसुमनांच्या भाषासौंदर्यात विरघळावं की त्यातील तात्त्विक खोलीत बुडून जावं, हे सांगणं अवघड! तहानभूक ही वीतभर पोटाला लागते हो! श्रीगोंदवलेकर महाराज म्हणत त्याप्रमाणे, ‘‘दुपारचे बारा वाजले की राजा असो की भिकारी, दोघांच्या पोटाची भूक सारखीच असते.’’ राजा असो की रंक, ही तहानभूकच दोघांनाही दशदिशा हिंडवते, मनाला विश्रांती म्हणून मिळू देत नाही. ही भूकच अनेकदा लाचारही करते. तत्त्वाशी मुरड घालायला भाग पाडते. पण आयुष्यभर काबाडकष्ट करूनही पोटाचं खळगं कधी भरतच नाही. तृष्णेची तहान कधी भागतच नाही. राजा असो वा रंक, एक पंचपक्वान्न खाऊन तृप्त होईल तर दुसरा कोरडा भाकरतुकडा खाऊन तृप्त होईल. ही तृप्ती मात्र भुकेची पुढची वेळ येईपर्यंतच टिकेल. जगण्याची भूकही तशीच नाही का? त्या अतृप्त वासनांच्या भुकेमुळेच तर जन्म-मरणाचं चक्र अव्याहत सुरू आहे. मग जर त्या जठरामध्येच अमृताचा निर्झर प्रकटला तर?
१८७. भूक
चित्ताचं काम आहे परमतत्त्वाचं चिंतन, मनाचं काम आहे परमतत्त्वाचं मनन, बुद्धीचं काम आहे विवेक, अर्थात परमतत्त्वाचं ग्रहण म्हणजेच शाश्वताची निवड आणि ‘अहं’चं काम आहे
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 23-09-2014 at 12:37 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hunger