‘नाटक नालायक कसे ठरते?’ हे विशेष वृत्तांकन (लोकसत्ता, १४ एप्रिल) वाचले. मा. दीनानाथ पुरस्कारांसाठी या वर्षी एकही मराठी नाटक लायक नव्हते हे लता मंगेशकरांचे उद्गार म्हणजे एकंदरीत सर्वच मराठी नाटय़कर्मी, नाटय़ संस्था आणि प्रेक्षकांच्या भावनांना ठेच पोहोचवण्यासारखेच आहे. लतादीदींनी असे विचार मांडण्यामध्ये काय पाश्र्वभूमी आहे हे तपासून पाहायला हवे आणि त्यांचे नक्की मत काय होते, हेही जाणून घेणे गरजेचे आहे, तरीही याबाबतच्या बातम्यांमुळे सर्वच रंगकर्मीमध्ये निश्चितच दुखावले गेल्याची भावना आहे. लतादीदी या स्वत: अतिशय उच्च दर्जाच्या जागतिक कीर्तीच्या प्रचंड लोकप्रिय गायिका आहेत, अनेक पिढय़ांवर त्यांच्या आवाजाची जादू अजूनही कायम आहे, त्यामुळे सर्व थरांतील लोकांना त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे, याबद्दल कुणाचेही दुमत असण्याचे काही कारण नाही. पण प्रश्न आहे की, ज्या पुरस्कारांच्या पाश्र्वभूमीवर हे विधान केले गेले त्या मा. दीनानाथ पुरस्कारांसंदर्भात पारदर्शकता जपण्याचा. लतादीदी आणि त्यांचे कुटुंबीय पदाधिकारी असणाऱ्या मा. दीनानाथ ट्रस्टतर्फे दरवर्षी वेगवेगळ्या कला क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्यांना हे पुरस्कार दिले जातात. खरे म्हणजे कुठल्याही मराठी नाटय़कर्मी किंवा नाटय़ संस्थेसाठी मा. दीनानाथ पुरस्कार म्हणजे काही कुतूहल आणि उत्सुकता असणारा पुरस्कार नाही. हे पुरस्कार देण्याच्या निवडीसाठी कुठलेही परीक्षक मंडळ नेमल्याचे कुणाला माहीत नाही. लतादीदी वा इतर पदाधिकाऱ्यांनी या वर्षी कुठली नाटके पाहिली याबद्दलही शंकाच आहे. मुळात अशी कुठलीही पारदर्शक प्रक्रिया पार पाडली गेली नसताना नाटय़व्यवसायाची लायकी काढणे हे खरे म्हणजे आक्षेपार्ह, बेजबाबदार आणि अयोग्य आहे असेच वाटते.
व्यक्ती मोठी की चळवळ, असे आपण इतर अनेक चळवळींच्या बाबतीत म्हणतो, तसेच हल्ली व्यक्ती मोठी की त्याची कला असे म्हणायची वेळ आली आहे. कला क्षेत्रातील अनेक गोष्टी या व्यक्तिकेंद्रित होताहेत की काय, असे वाटून अस्वस्थ व्हायला होते.
मराठी रंगभूमी ही नेहमीच प्रयोगशील राहिली आहे आणि आपला प्रेक्षकही पूर्वीपासून सुजाण आणि रसिक आहेच. यामुळे आपली स्वत:ची लायकी ठरवायला ते स्वत:च सक्षम आहेत आणि त्यामुळेच रंगकर्मीमध्ये या विषयावर भावनाशील प्रतिक्रिया उमटत आहेत. लतादीदींबद्दल आम्हा रसिकांना आदर आहेच, तो अधिक वृद्धिंगत व्हावा हीच अपेक्षा आहे.
-मंदार करंजाळकर, ठाणे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा