हिमालयाच्या रक्षणार्थ सह्याद्री एकदा धावला होता आणि त्याचा कितीतरी अभिमान महाराष्ट्राला होता आणि तो रास्तही होता. हिमालयालाही भरवसा देणाऱ्या या सह्य़ाद्रीचा वारसा सर्वार्थाने पुढे चालवेल, अशी आशा दाखवणाऱ्यांच्या हाती त्यानंतर महाराष्ट्रातील सत्ता राहिली आहे. त्यांच्या सत्तेच्या कालावधीतच हे कलानी, ठाकूर मंडळींचे फावले. ‘निवडून येऊ शकेल तो आपला’ इतक्या सोप्या विचारसरणीवर उभारलेला पक्ष निदान पश्चिम महाराष्ट्रात तरी फोफावला. या विचारसरणीनुसार निवडून आलेल्या राजकारण्यांकडून याहून वेगळे काही मिळेल ही अपेक्षाच खरेतर चूक होती. असे इतरही अनेक छोटे-मोठे दलाल होऊ द्यायचे आणि त्यांच्या माध्यमातून सत्ता टिकवायची ही राजकारणाची रीत पुढे इतरही पक्षांत रूढ झाली. या कलानी महाशयांच्या सत्तेला सुरुंग लावताच, आपले दलाल उद्ध्वस्त झाले तर आपली सत्ता कशी टिकेल या धास्तीने (पुढे केलेले कारण निराळे होते) दिल्लीकर थेट मुंबईत परत आले होते. ही आठवण तशी जुनी पण ताजी आहे.
सत्ता आहे ती कायदा सुव्यवस्था राखण्यास, निरपराध नागरिकांना सुरक्षित वाटेल असे वातावरण राखण्यास राबवता येते हे दाखवणारा तो कलानींच्या हॉटेलवर बुलडोझर फिरत असतानाचा फोटो पाहून खात्री वाटली होती. फक्त ती फारच अल्प काळ टिकली. गल्लीतून दिल्लीत गेलेले लगेच स्वगृही म्हणजे गल्लीत आले आणि आता त्यांची गत ना धड गल्लीचे ना धड दिल्लीचे अशी होऊन बसली आणि त्याचे फलित म्हणजे एकेकाळी सर्वार्थाने अग्रणी असलेला महाराष्ट्र देशातील इतर मागास राज्यांच्या रांगेत जाऊन बसला.
डॉ. अजय ब्रह्मनाळकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा