सगुणभक्ती करावी आणि भक्तीने नाम घ्यावे! श्रीगोंदवलेकर महाराज उपासनेचा जो क्रम सांगतात त्याचा हा पूर्वार्ध आहे. ‘सगुणभक्ती’ करावी, म्हणजे काय करावं? या सगुणभक्तीमागचा तत्त्वविचार काय आहे? सगुणभक्ती म्हणजे इष्टदेवतेच्या प्रतिमेचं ध्यान. पूजन आणि अर्चन. आता या जगात प्रतिमेशिवाय दुसरं काय आहे? आपणच आपल्याशी विचार करा, आपण स्वत:ला जे मानतो म्हणजे ‘मी’ असा असा आहे, ही स्वत:बद्दलची प्रतिमाच नाही का? या जगात ज्यांच्या ज्यांच्याशी आपला संबंध येतो, त्यांच्याविषयी आपल्या मनात अनेकानेक प्रतिमाच असतात आणि त्या त्या प्रतिमेनुरूपच आपण त्यांच्याशी व्यवहार करीत असतो. आपल्या मनातील प्रतिमेला अनुरूप असा व्यवहार समोरच्या व्यक्तीने केला नाही, तर आपल्याला धक्का बसतो. आपल्या अंतरंगातील त्या व्यक्तीच्या प्रतिमेला तडा जातो आणि त्याचा दोषारोप आपण त्या व्यक्तीवरच करतो. खरं तर तुमच्या मनात तुम्ही दुसऱ्याविषयी काय प्रतिमा तयार केली आहेत, याची त्याला कल्पनाही नसते. तेव्हा सर्व जग प्रतिमांनीच भरलं आहे. त्या प्रतिमाभंजनासाठीच खरं तर भगवंताची प्रतिमा आहे! देवळातली मूर्ती दगडाचीच असते, पण विराट विश्वशक्तीचं प्रतीक म्हणूनच आपण तिच्याकडे पाहातो. त्या मूर्तीला हात जोडतो तेव्हा खरं तर त्या विराट शक्तीसमोरच नतमस्तक झाल्याचा भाव मनात असतो. श्रीमहाराज सांगतात, ‘‘सगुणाच्या उपासनेला आज आपण कल्पनेने प्रारंभ करू, मागून निश्चयात्मकता आपोआप येईल’’ (प्रवचने, २४ ऑक्टोबरमधून). खरं तर देवासमोर हात जोडायची सवय आपल्याला लहानपणापासूनच असते. मनात तेव्हा सगुणोपासना-निर्गुणोपासना, आस्तिकता-नास्तिकता या विषयी काही कल्पनादेखील नसते. जसजसं वय वाढू लागतं तसतसं मग वाटू लागतं की, या मूर्तीत देव थोडाच आहे? तो तर चराचरात आहे. मग त्या विराटाची पूजा दगडी मूर्तीच्या योगानं थोडीच होणार? त्यावर श्रीमहाराज सांगतात, ‘‘चैतन्य सर्व ठिकाणी भरलेले आहे; ते कुठेही प्रकट होऊ शकेल. त्याला प्रकट करणे हे आपल्या भावनेवर अवलंबून आहे. ज्याची भावना खरी शुद्ध, म्हणजे नि:संशय असते, त्याला दगडाची मूर्तीदेखील देव बनते’’ (प्रवचने, २४ ऑक्टोबरमधून). जर चैतन्यशक्ती सर्वत्र आहे-चराचरात आहे, तर मग ती त्या दगडी मूर्तीत नाही का? आहेच. आज सर्वत्र व्याप्त भगवंताला जाणण्याचा माझा आवाका नाही म्हणून प्रथम त्याला एका मूर्तीत पाहावं लागतं. दगडी मूर्तीची पूजाअर्चा करीत असताना, परमात्म्याच्या विराट रूपाची आपल्या आवाक्यातील, आपल्याला साधू शकेल अशी ही उपासना आहे, हा भाव आपण ठेवला तर हळूहळू त्या पूजेतही जिवंतपणा येईल. अकृत्रिमता येईल. त्या मूर्तीच्या निमित्तानं देवाला स्नान घालण्याचा, सजविण्याचा, फुलांनी त्याला पूजिण्याचा, नैवेद्यानं त्याला अर्पिण्याचा आनंद मिळवता येईल. श्रीमहाराज सांगतात, ‘‘जसजशी आपण सगुणाची उपाधी वाढवतो तसतशी आपली इतर उपाधी कमी कमी होत जाते’’ (प्रवचने, २४ ऑक्टोबरमधून).

Story img Loader