पटेल नेहरूंपेक्षा मोठे होते आणि तरीही त्यांच्यावर अन्याय झाला असे म्हणण्यासाठी आणखी एक पाऊल उचलावे लागते. ते असे की पटेल हे ‘राष्ट्रीय ऐक्याचे’ पुरस्कत्रे होते असे म्हणायचे आणि अप्रत्यक्षपणे असे सुचवायचे असते की इतरांना पटेलांच्या इतके राष्ट्रीय ऐक्याचे महत्त्व नव्हते!  अशाप्रकारे एक प्रतीक घडविण्यासाठी इतिहासातील संदर्भाची मोडतोड करावी लागते आणि वर्तमान संदर्भाची त्याला जोड द्यावी लागते.
सरदार पटेल कोणाचे, हा प्रश्न सामान्य माणसाच्या मनात बहुधा येणारही नाही; पण नरेंद्र मोदींनी नुकताच हा प्रश्न उभा केला. मोदी तिथे वादावादी, असे काहीसे झालेले दिसते; त्याचीच ही एक झलक! त्यातच मोदींचे समर्थक काही वेळा मोदींची तुलना सरदारांशी करतात आणि मोदी ‘दुसरे सरदार’ असल्याचे सुचवितात. त्यामुळे सरदार पटेल यांच्याविषयीचा वाद आणि त्याचे खोलवरचे धागेदोरे तपासणे उपयोगी ठरू शकते.
राजकारण हे खुर्चीसाठी असते आणि सत्तेसाठी असते तसेच ते प्रतीकांसाठी आणि विचारांसाठीसुद्धा असते. काही विचार आणि प्रतीके ही सत्तेसाठी उपयोगी असतात म्हणून त्यांचे राजकारण केले जाते, तर काही वेळा विचार आणि प्रतीके ह्या विषयीचे वाद हेच राजकारणाच्या केंद्रस्थानी असतात.
सामूहिक राजकारणासाठी प्रतीके आवश्यक असतात. त्यामुळे प्रतीकांचा शोध घेण्यावर राजकीय पक्ष आणि राजकीय नेते बरीच शक्ती खर्च करीत असतात. वर्तमानापेक्षा इतिहासात प्रतीके शोधणे नेहेमीच जास्त सोयीचे असते. त्यामुळे इतिहासात मागे जाऊन आपल्या वर्तमान सोयीसाठी पूर्वीच्या काळातील व्यक्तींना आपल्या पक्षाच्या आणि विचाराच्या दावणीला बांधण्याचे प्रयोग अनेक वेळा केले जातात. पण कर्तबगार राज्यकत्रे आणि प्रज्ञावंत नेते यांचे प्रतीकांमध्ये रूपांतर केले जाऊ लागले की त्यांच्या कर्तबगारीवर परस्परविरोधी दाव्यांचा थर चढू लागतो आणि त्यांची स्वतची कर्तबगारी आणि विचार मागे पडतात. कोणाचा किती उंच पुतळा उभा केला गेला यावर त्या मूळ नेत्यापेक्षा त्याचे स्मारक उभारणाऱ्यांची कर्तबगारी मोजली जाते.
सरदार पटेल यांच्यावर नेमका असाच प्रसंग अलीकडेच ओढवला. ते कर्तबगार होते याच्यापेक्षा ते कोणाचे होते (कोणाविरुद्ध होते) याला महत्त्व आले. गांधी आणि नेहरू यांच्याविषयी मनोमन दुरावा असलेला एक वर्ग इथे पूर्वापार आहे. त्या वर्गाच्या दृष्टीने नेहरूंनी सत्ता बळकावली नसती तर पटेलांनी देशाच्या वाटचालीला वेगळी दिशा दिली असती. पटेल हे नेहरूंपेक्षा थोर होते असे म्हटल्याशिवाय पटेलांचे  मोठेपण सिद्ध झाले असे ह्या नेहरूविरोधी गटाला वाटत नाही. असे करताना ज्या नेहरूंचा आपण एवढा दुस्वास करतो त्यांनाच आपण कर्तबगारीची एक मोजपट्टी मानतो याचेही भान त्यांना राहात नाही! पण इथे मुद्दा तो नाही; तर कर्तबगार स्त्री-पुरुष नेत्यांवर अशा प्रकारे एखाद्या प्रचलित राजकीय गटाचा हक्क सांगताना काय होते ते पाहण्याचा मुद्दा आहे. म्हणजेच, नेत्यांचे प्रतीकीकरण केल्यामुळे काय होते असा मुद्दा आहे.
थोर नेते आणि विचारवंत यांचे प्रतीकांमध्ये रूपांतर करण्याच्या धामधुमीत ढोबळ मानाने तीन टप्पे असतात. पहिला टप्पा म्हणजे आजच्या वादामध्ये त्यांना ओढून त्यांचा वारसा वादग्रस्त बनविणे. असे करताना अर्थातच त्यांच्या काळातील वाद आणि मतभेद यांचे सोयीस्कर विपर्यास केले जातात. सरदार पटेलांचेच उदाहरण घ्यायचे म्हटले तर काय दिसते? पटेल हे ‘आमचे’ आहेत असे सर्वसाधारणपणे इथले ‘िहदुत्ववादी’ गट बरेच वेळा म्हणतात. पण ते करतानाच पटेल हे खरे ‘गांधीवादी’ होते असेही संगितले जाते आणि त्यामुळे मग गांधीसुद्धा हिंदुत्ववादी होते का, असा प्रश्न निर्माण होतो. किंवा सरदार काँग्रेसमध्ये का राहिले आणि संघात किंवा िहदू महासभेत का गेले नाहीत असा प्रश्न उभा राहतो.
पटेल असोत की नेहरू, हे नेते आपापल्या राजकारणामधून त्यांच्या मते जे ईप्सित ध्येय होते त्याचा पाठपुरावा करीत होते. अर्थातच हे करताना त्यांचे एकमेकांशी सर्व बाबतीत पूर्ण मतक्य असणे शक्य नव्हते आणि ते माहीत असूनसुद्धा ते एकाच पक्षात होते आणि एका सरकारचे भाग म्हणून काम करीत होते. त्यांचे सहकार्य आणि त्यांचे मतभेद ह्या दोन्ही बाबी खऱ्या आहेत आणि त्या स्वाभाविक देखील आहेत. पण सरदार पटेल नेहरूंपेक्षा मोठे होते आणि तरीही त्यांच्यावर अन्याय झाला असे म्हणण्यासाठी आणखी एक पाऊल उचलावे लागते. ते असे की पटेल हे ‘राष्ट्रीय ऐक्याचे’ पुरस्कत्रे होते असे म्हणायचे (त्यांच्या पुतळ्याला ऐक्याचा पुतळा असे नाव दिले आहे) आणि अप्रत्यक्षपणे असे सुचवायचे असते की इतरांना पटेलांच्या इतके राष्ट्रीय ऐक्याचे महत्त्व नव्हते! अशाप्रकारे एक प्रतीक घडविण्यासाठी इतिहासातील संदर्भाची मोडतोड करावी लागते आणि वर्तमान संदर्भाची त्याला जोड द्यावी लागते. मग अर्थातच नेहरूवादी लोक पटेल कसे चुकत होते आणि नेहरूच कसे मोठे होते असा दावा करतील आणि प्रतीक निर्मितीसाठी दोघांना आजच्या संदर्भात वादग्रस्त बनविण्याचा क्रम चालू राहील. इथे नेहरू-पटेल ही केवळ सध्याच्या वादातील उदाहरणे म्हणून घेतली आहेत; हेच इतर कोणाही बद्दल होते-होऊ शकते.
गतकाळातील नेत्यांच्या आणि विचारवंतांच्या अशा ओढाताणीचा दुसरा टप्पे म्हणजे त्यांच्या विचारांमधील किंवा कार्यामधील तीक्ष्णपणा घालवून टाकून त्यांचे ‘थोर राष्ट्रीय व्यक्तिमत्त्वामध्ये’ रूपांतर करायचे. एखाद्या व्यक्तीला राष्ट्रीय ठेवा म्हटले की तिचे पोकळ कौतुक करायला सगळे मोकळे होतात. मग त्या व्यक्तीने नेमके काय म्हटले, कोणाशी दोन हात केले आणि कशासाठी केले याच्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करता येते. म्हणजे, असे प्रतीकीकरण नेत्यांची कर्तबगारी आणि विचार यांना गोलमाल स्वरूप देण्यासाठी सोयीचे असते. या टप्प्यावर खरेतर त्या नेत्याची ‘ओढाताण’ संपते कारण त्याच्या कार्यातील आणि विचारातील वादग्रस्त भगावर अजिबात भर न देता त्यांची थोरवी गायली जाते. कोणतेही प्रतीक प्रतिपक्षाला फारसे उपलब्ध होऊ नये यासाठी हा मार्ग चांगला असतो. विचार आणि कार्य यांचा टोकदारपणा घालवून टाकून आपण राष्ट्रीय प्रतीके तयार करतो आणि त्यांचा वारसा खरेतर गमावून बसतो. त्यांनी त्यांच्या आयुष्यात केलेले संघर्ष आणि घेतलेल्या भूमिका यांच्यापेक्षा फक्त त्यांचे सोज्वळ थोरपण संगितले जाते. बालकांवर सुसंस्कार करणाऱ्या साहित्यात जसे सगळ्यांचे एक निराकार मोठेपण निर्थकपणे सांगितलेले असते तसाच हा प्रकार असतो. या प्रतीक समन्वयात सगळेच पक्ष सामील होताना दिसतात. वर आपण गांधींचा उल्लेख केला आहे; तर त्यांचेच उदाहरण घेऊ.
ज्या गांधींवर त्यांच्या हयातीतच ‘मुस्लीमधार्जणिे’ असल्याचा आरोप सातत्याने केला गेला त्यांना अनेक सेक्युलर मार्क्‍सवादी मात्र हिंदू धर्मवादी मानत आले आणि नंतर काही िहदुत्ववादी त्यांना ‘प्रातस्मरणीय’ म्हणू लागले. गांधी नेमके का मोठे होते हे त्यांचे पाठीराखे सहसा सांगत नाहीत आणि त्यांचे विरोधक आता जेव्हा गांधींचे गोडवे गटात तेव्हा तेही गांधींची पुनर्माडणी करतात असे काही फारसे होत नाही आणि गांधींच्या बाजूने उभे राहणारे पक्ष किंवा गट जेव्हा सावरकरांचा पुतळा उभा करण्यास मान्यता देतात तेव्हा सावरकरांचे कोणते विचार आपल्याला मान्य आहेत आणि कोणते नाहीत हे सांगतातच असेही नाही. कारण गांधी आणि सावरकर यांच्या काळातील त्यांच्या मूलभूत मतभेदांबद्दल वाद-प्रतिवाद करण्याची आपली तयारी नसल्यामुळे आपण दोघांचेही आदरणीय राष्ट्र पुरुषांमध्ये रूपांतर करून टाकतो.
मात्र याच्या पुढचा टप्पा जास्त गंभीरपणे घेण्यासारखा आहे. तो म्हणजे थोर नेते आणि विचारवंत यांना त्यांच्या थोरवीत गोठवून टाकण्याचा. पटेल नेमके काय म्हणत होते किंवा नेहरूंचे म्हणणे काय होते याचे लेखी पुरावे देणे एवढय़ाच पुरती इतिहास मीमांसा थांबत नसते. तर त्यांच्या काळाच्या संदर्भात हे नेते काय करीत होते आणि आता तो संदर्भ नसताना त्यांचा विचार कसा करायचा ह्याची चर्चा आवश्यक असते, पण नेत्यांचे गोलमालीकरण करून त्यांना प्रतीकांचे रूप दिले की अपरिहार्यपणे चिकित्सा थांबते. सगळेच आदरणीय बनतात आणि आदराचा अर्थ एक तर त्यांचे फक्त गौरवीकरण करायचे असा होतो किंवा त्यांचे ‘अधिकृत’ मानले जाणारे विचार हेच अंतिम मानून अन्वयार्थ लावणे थांबते; चर्चा बंद केली जाते. काही वेळा याबद्दल तक्रार करताना हा मुद्दा आविष्कार स्वातंत्र्य किंवा असहिष्णुतेच्या चौकटीत मांडला जातो. म्हणजे अमूक नेत्याचे किंवा विचारवंताचे अनुयायी असहिष्णु आहेत असे म्हटले जाते. पण खरा प्रश्न फक्त असहिष्णुतेचा नसतो तर आपल्या वैचारिक वारशाचे काय करायचे असा असतो.
नेत्यांचे कार्य आणि विचार हे केवळ अमूर्त ज्ञाननिर्मितीसाठी नसतात. त्यांना राजकीय ताकद असते. त्यामुळे हा वारसा पुढच्या काळात राजकारणासाठी इंधनासारखा उपयोगी ठरू शकतो. मात्र त्याच्याच बरोबर हे वैचारिक इंधन फक्त प्रचलित वादांचे भुईनळे पुरेसे उंच उडावेत म्हणून जर आपण वापरू लागलो तर आपला ऐतिहासिक वारसा प्रतीकांच्या चौकटीत अडकून पडतो असा हा पेच आहे.
लेखक पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात प्राध्यापक असून राजकीय घडामोडींचे विश्लेषक म्हणून परिचित आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा