गणपती बाप्पा मोरया म्हणताच अंगात उत्साह संचारून गणेशभक्त ढोल, ताशा, लेझीम इ. पारंपरिक वाद्यांच्या तालावर नाचत गुलालाने माखून जायचा; तोच गणेशभक्त आता आम्ही दिलेल्या वर्गणी वा देणगीच्या (खंडणीच्याच!) जोरावर बिअर, दारू पिऊन बीभत्सपणे रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्यांकडे बघून अंगविक्षेप करून नाचतो त्यात तो ‘डीजे’चा कर्णकर्कश आवाज. हा मद्यधुंद भक्त रस्त्यावर तासन्तास नाचून वाहतुकीची कोंडी करतो. ज्या मंचावर विचारांची देवाणघेवाण करायची, कला, संस्कृतीचे प्रदर्शन करायचे त्याच मंचावर रात्री जुगार खेळला जातो, सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली ‘हलकट जवानी, मुन्नी, शीला’सारख्या गाण्यांवर तरुणाई ‘नृत्य’ करते. गणेश मंडळी रस्त्यात खड्डे खोदून ठेवतात, तब्बल दहा दिवस यांचे मुख्य रस्त्यावर अतिक्रमण असते. या कालावधीत वाहनांना, माणसांना लांबच्या वळणरस्त्यांचा वापर करावा लागतो, वाहतूककोंडी होते, त्यामुळे लाखो लीटर इंधन वाया जाते.
आमच्या देणगीचा अशाच प्रकारे वापर होणार असेल तर देणगीरूपी खंडणी न दिलेलीच बरी. हे केवळ गणेशोत्सवातच होते असे नाही तर महापुरुषांच्या जयंत्यादेखील अशाच साजरा होतात. तेव्हा या सर्व उत्सवांचे सार्वजनिकीकरण थांबले पाहिजे. आपण देणगीच नाही दिली तर आपोआप हे थांबेल.
प्रा. दिनेश जोशी, लातूर

बुद्धी बाजूला ठेवणेच बरे..
‘संसदीय दादागिरी’ या अग्रलेखात (२९ ऑगस्ट) ‘धाक दाखवून मते मिळवणारा आणि आपल्या कार्याने लोकांची मने जिंकणारा’ असा फरक लोकप्रतिनिधींमध्ये असतो, असे विधान आहे. प्रश्न असा आहे की ‘लोकांची मने जिंकणारा’ म्हणजे कोणत्या लोकांची मने जिंकणारा? ज्यांना शिक्षण नाही, ज्यांची मानसिक वाढ झालेली नाही, अशा मतदारांची मने जिंकणे ही गोष्ट सहज होऊ शकते का? ज्या लाखो मतदारांच्या बळावर निवडणूक जिंकता येते, ते मतदार अशा गटातील आहेत की त्यांना फक्त ‘धाका’ची भाषा कळते (यात नैतिकता, तत्त्वनिष्ठा यांना जागा नाही). दुसरे असे की, जर कोणताही पक्ष बहुसंख्येने निवडून आला तर त्याच्या हाती देशाचे भलेबुरे करण्याची क्षमता येते. हे कोडे सोडवायचे कसे, याबद्दल या अग्रलेखात कोणतेही विधान नाही अथवा एरवीही तशी चर्चा होत नाही.
‘पार्टी विथ डिफरन्स’ ही प्रतिमा पक्षाच्या अस्तित्वाला आवश्यक आहे. पण लोकसभेमध्ये पक्षाचे अस्तित्व उरणार नसेल तर त्या ‘डिफरन्स’ची फक्त देव्हाऱ्यात पूजा करावी लागेल. ‘सर्वनाश समुत्पन्ने अर्धम् त्यजति पंडिता: ।’ (कठीण समय येता बुद्धी थोडी बाजूला ठेवणे हेच हुशारीचे लक्षण) हा न्याय येथे लागू होतो, असे मला वाटते. अरुण जेटली यांचे वक्तव्य या पद्धतीचे आहे.
डॉ. मोहिनी वर्दे

‘यापैकी कुणीही नको’
राजकारणचे गुन्हेगारीकरण होत चालले आहे, त्याला थोडा तरी आळा घालता यावा म्हणून कोर्टाने ‘किमान दोन वर्षांची शिक्षा झालेल्या माणसांना निवडणूक लढवता येणार नाही,’ असा निर्णय दिला, तर आपल्या प्रतिनिधींनी कैद्यांनासुद्धा मतदानाचा हक्क देऊन त्यावर कुरघोडी केली. आता मतदारानेच अयोग्य उमेदवारांना निवडणुकीत पराभूत करायचे असे तर मतपत्रिकेत/ मतदान यंत्रावर उमेदवारांच्या नावाबरोबरच ‘यापैकी कोणीही नको’ असा पर्याय द्यायलाच हवा.
सर्वच पक्षांनी न्यायालयाच्या निर्णयाला विरोध दर्शविला आहे, म्हणजेच सर्वच पक्षांनी गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या मंडळींना तिकीट देण्याची आपली तयारी आहे हेच दाखवून दिले आहे. बहुतांश सुशिक्षित नागरिक मतदानाचा हक्क बजावत नाहीत, ते याच कारणामुळे. हा नकाराधिकार मतदारांना मिळत नाही आणि मग जे काही अल्प मतदान होते त्यातील बहुमताच्या बळावर असे उमेदवार पुढील पाच वर्षे जनतेवर राज्य करतात.
उज्ज्वला गोखले, विलेपार्ले (पूर्व)

गोविंदांना सुसंस्कृत म्हणावे?
ग्लॅमरस दहीहंडय़ांची बातमी आणि या दहीहंडीत वाजवल्या जाणाऱ्या गाण्यांची जंत्री वाचून धन्यधन्य झालो. श्रीकृष्णाचा जन्म म्हणजे पवित्र दिवस. त्याचे असे िधडवडे आमची मराठी जनताच काढते आहे, हे पाहून माझ्यासारख्या अनेक िहदूंची मने दुखावली गेली असतील. याबाबत उद्धव ठाकरे व इतर तथाकथित िहदुत्ववादी संघटनांनी त्या काय करणार आहेत याचा जाब द्यावा.
आज दहीहंडीच्या दिवशी, रस्त्यातून एकेका मोटरबाइकवर तीन-तीन जण बसून आरडाओरडा करीत जात आहेत, आमच्या बाजूच्या वेश्यांच्या इमारतीसमोरून जाताना अचकट विचकट हावभाव करत आहेत, हे पाहून या गोिवदांपेक्षा  वेश्या अधिक सुसंस्कृत आहेत असे म्हणायची पाळी आली आहे.
पण बाजारूकरणाला चटावलेले हे सर्व जण व त्यांचे आयोजन करणारे राजकारणी काहीही करणार नाहीत याची खात्री  आहे.  
अभय दातार, केनेडी ब्रिज, ऑपेरा हाऊस (मुंबई)

हंडीत पैसा येतो कुठून?
कोटय़वधी रुपयांच्या दहीहंडींतल्या ‘दह्य़ा’चा- त्यामागच्या पशाचा स्रोत शोधून काढण्याची वेळ खरे तर कधीच येऊन ठेपली आहे परंतु सगळ्यांचेच हितसंबंध या ‘दह्य़ा’मध्ये गुंतले असल्यामुळे सगळेच मिठाची गुळणी घेऊन गप्प बसले आहेत. प्राप्तिकर खाते एरवी देणग्यांची पाश्र्वभूमी तपासण्यात बराच रस दाखविते मग या हंडय़ा कोण प्रायोजित करते, अशा प्रायोजकांकडचा पसा कुठून आलेला आहे, हे त्यांनी शोधायला नको का? सरकारही या सगळ्या गरव्यवहारांकडे सोयिस्कर काणाडोळा करते. वास्तविक एवढय़ा पशांत चांगले रस्ते, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, यांसारखे  प्रकल्प राबविता येतील परंतु धर्माच्या नावाखाली धुडगूस घालण्याची शर्यतच लागली आहे. यामागचे राजकारण, अर्थकारण मुळासकट खणून काढले पाहिजे आणि हा पशाचा अपव्यवहार थांबविला पाहिजे. ‘भारतातली सर्वात मोठी हंडी’ अशांसारख्या जाहिराती करण्यात मोठा पुरुषार्थ मानणाऱ्या राजकारण्यांचे पसे कुठून येतात ते जनतेला कळायचा अधिकार आहे कारण जनतेच्या मतांवरच यांचे अस्तित्व अवलंबून आहे. परंतु हा पशाचा नंगा नाच सुस्त समाजमनाला जाग आणण्यास पुरेसा नसल्याचे दिसते, याचे वाईट वाटते.   
राजीव मुळ्ये, दादर

न्याय निरनिराळा कसा?
एका अल्पवयीन मुलीचै लैंगिक शोषण केले म्हणून आसारामवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या ‘बापूं’ना पाठविण्यात आलेले समन्स घेऊन जाणाऱ्या पोलिसांना सहा तास ताटकळत ठेवण्यात आले आणि शेवटी एका भक्ताने ते समन्स स्वीकारले. हा कसला मुजोरपणा? मागे महाराष्ट्रात पाण्याचा दुष्काळ असताना या महाराजाने नवी मुंबईत येऊन पाण्याचा अपव्यय केला होता. त्यांचा मुलगाही आपण श्रीकृष्णाचाच अवतार असल्याच्या थाटात आश्रमात वावरत असतो. हा एक प्रकारे भगवान श्रीकृष्णाचाच अपमान आहे.
मुंबईत झालेल्या बलात्कार प्रकरणातील नराधमांना दोन दिवसांत गजाआड करण्यात पोलिसांना यश आले. पण आसारामसारख्या नराधमांना पोलीस किंवा राजकारणी हात का घालू शकत नाहीत? असा निरनिराळा न्याय मिळणार असेल, तर भारतात लोकशाही म्हणजे काय याचेच निराळे विश्लेषण करावे लागेल!
किरीट गोरे, बोरिवली (पूर्व)

किमान खर्चातच घरगुती गणपती..
निदान या गणेशोत्सवाच्या वेळी आपण आपलं सामाजिक भान जपू या. सुजाण नागरिक म्हणवून घेणाऱ्यांवर एक नतिक जबाबदारी येते. आणि ती या गणेशोत्सवात पार पाडू. गणेशोत्सवात आरास- सजावट, प्रसाद, दागदागिने, वेगवेगळ्या प्रकारची फुलं-पानं; त्यांचे चढे भाव.. यांच्यावर आपण अगदी वारेमाप खर्च करतो. गणपतीला या सगळ्या गोष्टी आवडतात म्हणून त्या खर्चाकडेही कानाडोळा करतो. पण निदान या वेळी तरी या सगळ्या खर्चाला आपण काट मारू आणि गणपती उत्सव हा फक्त मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि विसर्जन एवढय़ापुरताच मर्यादित ठेवू. बाकीचा खर्च गरिबांसाठी म्हणा किंवा सामाजिक काम करणाऱ्या संस्थांना देऊ. जेणेकरून आपण प्रत्यक्ष सहभागी झालो नाही तरी देवाच्या नावावर आपल्याकडून एक चांगलं कार्य होईल.
– प्राजक्ता ओक

‘लोकमानस’साठी लिखाण टपालाने पाठवायचे असल्यास महापे कार्यालय अधिक सोयीचे ठरेल.  पत्ता : ईएल/ १३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, एमआयडीसी महापे, नवी मुंबई- ४०० ७१० फॅक्स : ०२२- २७६ ३३००८