गणपती बाप्पा मोरया म्हणताच अंगात उत्साह संचारून गणेशभक्त ढोल, ताशा, लेझीम इ. पारंपरिक वाद्यांच्या तालावर नाचत गुलालाने माखून जायचा; तोच गणेशभक्त आता आम्ही दिलेल्या वर्गणी वा देणगीच्या (खंडणीच्याच!) जोरावर बिअर, दारू पिऊन बीभत्सपणे रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्यांकडे बघून अंगविक्षेप करून नाचतो त्यात तो ‘डीजे’चा कर्णकर्कश आवाज. हा मद्यधुंद भक्त रस्त्यावर तासन्तास नाचून वाहतुकीची कोंडी करतो. ज्या मंचावर विचारांची देवाणघेवाण करायची, कला, संस्कृतीचे प्रदर्शन करायचे त्याच मंचावर रात्री जुगार खेळला जातो, सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली ‘हलकट जवानी, मुन्नी, शीला’सारख्या गाण्यांवर तरुणाई ‘नृत्य’ करते. गणेश मंडळी रस्त्यात खड्डे खोदून ठेवतात, तब्बल दहा दिवस यांचे मुख्य रस्त्यावर अतिक्रमण असते. या कालावधीत वाहनांना, माणसांना लांबच्या वळणरस्त्यांचा वापर करावा लागतो, वाहतूककोंडी होते, त्यामुळे लाखो लीटर इंधन वाया जाते.
आमच्या देणगीचा अशाच प्रकारे वापर होणार असेल तर देणगीरूपी खंडणी न दिलेलीच बरी. हे केवळ गणेशोत्सवातच होते असे नाही तर महापुरुषांच्या जयंत्यादेखील अशाच साजरा होतात. तेव्हा या सर्व उत्सवांचे सार्वजनिकीकरण थांबले पाहिजे. आपण देणगीच नाही दिली तर आपोआप हे थांबेल.
प्रा. दिनेश जोशी, लातूर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा