‘इंडियन एक्स्प्रेस’च्या माजी अर्थविषयक संपादक आणि अगदी अलीकडेपर्यंत ‘फायनान्शिअल एक्स्प्रेस’सह अन्यत्र स्तंभलेखन करणाऱ्या इला पटनाईक यांनी, व्यावसायिक जीवनात एकाच जागी समाधान न मानण्याचा- स्थितिशील न राहण्याचा शिरस्ता जपला. आता मात्र त्यांना पुढील काही वर्षे एकाच पदावर राहावे लागेल आणि या एका जागी स्थिरावणे काहीसे समाधान देणारेही असेल.. देशाच्या प्रमुख आर्थिक सल्लागार या पदावर त्यांची नियुक्ती नुकतीच झाली आहे. केंद्रीय अर्थ खात्यातील हे पद आर्थिक धोरणांना आकार देण्यात, अगदी अर्थसंकल्पातील तरतुदींचाही मसुदा ठरवण्यात महत्त्वाची भूमिका निभावणारे असते. या नियुक्तीपूर्वी दिल्लीतील राष्ट्रीय लोक-वित्त आणि धोरण संस्थेत रिझव्र्ह बँक अध्यासनावरील विशेष प्राध्यापक या पदावर ऑक्टोबर २०१३ पासून पटनाईक होत्या.
दिल्ली विद्यापीठातून १९८५ साली अर्थशास्त्रात पदवी आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या आर्थिक अभ्यास व नियोजन विभागातून १९८७ मध्ये स्नातकोत्तर पदवी घेणाऱ्या पटनाईक यांनी तेथेच एम.फिल. केले; पण पीएच.डी.साठी ब्रिटनच्या ‘नेहरू जन्मशताब्दी शिष्यवृत्ती’चा लाभ घेऊन त्या सरे विद्यापीठात गेल्या. भारतातील आर्थिक सुधारणांनंतर वाढलेली सरकारी कर्जे आणि त्यावरील उपाय हा त्यांचा अभ्यासविषय १९९५ सालच्या या पीएच.डी.पासूनच होता. १९९६ ते २००२ पर्यंत दिल्लीच्या राष्ट्रीय उपयोजित आर्थिक संशोधन परिषदेत वरिष्ठ अर्थतज्ज्ञ या पदावर काम करतानाच, २००० पासून त्यांचे लेखन सुरू झाले; परंतु प्रत्यक्ष ‘एक्स्प्रेस’मध्ये २००४ ते २००६ अशी दोन वर्षे त्या होत्या. राष्ट्रीय लोक-वित्त आणि धोरण संस्थेतील विविध पदे त्यांनी २००६पासून सांभाळली. तिथे असतानाच, २००८-२००९ मध्ये ‘पॉलिसी विथ पटनाईक’ या चित्रवाणी कार्यक्रमातील सहभाग हे त्यांचे वैशिष्टय़ ठरले. स्तंभलेखन चालू होतेच, परंतु संशोधन व सरकारी अभ्यासगटांतील सहभाग असा आवाका वाढत गेला. २५ संशोधनलेख लिहिणाऱ्या पटनाईक यांचा संशोधनातील दबदबा मोठा आहे. भारताकडील परकी चलन गंगाजळीची ‘जमा’ बाजू, तिच्यावरील बंधने आणि या जमेचा वापर, याबाबत त्यांचा शब्द महत्त्वाचा मानला जातो. सरकारसाठी काही अभ्यासकांच्या साथीने आठ स्वतंत्र अभ्यासपत्रे (वर्किंग पेपर) तयार करणाऱ्या पटनाईक यांनी, २००२ पासून विविध सरकारी अभ्यास-समित्यांवरही (वर्किंग ग्रुप) काम केले आहे. यापैकी थेट परदेशी गुंतवणुकीविषयीच्या अभ्यासगटाने जो अहवाल दिला, त्यावर आधारित धोरणेही ठरली, परंतु राजकीय मतभेदांपायी हे धोरण रखडले. आर्थिक धोरणांच्या अशा राजकीय प्रदेशात आता प्रसन्न व्यक्तिमत्त्वाच्या पटनाईक यांचा प्रवेश होत आहे.

Story img Loader