स्त्रीचं वस्तुकरण आणि त्यातून निर्माण होणाऱ्या ठोकळेबाज स्त्रीप्रतिमा हा वरवर पाहता या फोटोंचा विषय आहे. स्वत:चा चेहरा वापरूनही ही आत्मचित्रं नाहीत. उलट, कोण म्हणजे मी? आणि काय म्हणजे चित्र? याच्या शोधात त्या दोघींना अधिक रस आहे.
पाच फोटो. अगदी निरनिराळे. यापैकी दोन फोटोंतला चेहरा सिंडी शर्मनचा आहे आणि तीन फोटोंमध्ये पुष्पमाला दिसतेय. जुन्या काळच्या सुविद्य तरुणींचा म्हणून जो फोटो दिसतो आहे, त्यात पुष्पमालासह श्रीलता राव शेषाद्री यांचाही सहभाग आहे.
इथले हे पाच फोटो निरनिराळ्या व्यक्तींचेच पहिल्या नजरेत वाटणं स्वाभाविक होतं. इतकंच काय, निरनिराळ्या काळांतलेही वाटू शकतील, असेच हे फोटो आहेत.
बरं, फोटोग्राफी हीसुद्धा कलाच कशी काय आहे किंवा ‘आर्ट फोटोग्राफी’ वगैरे कुठं कुठं शिकवलं जातं, त्या अर्थानं हे फोटो काही कलात्मक वगैरे नाहीत. यथायोग्य आहेत, बरे आहेत, पण त्यात फोटोग्राफीच्या तंत्रांऐवजी फोटोतल्या व्यक्तीच्या हावभावांना, कपडय़ांना अधिक महत्त्व दिलं गेलं आहे.
हे फोटो ‘दृश्यकला’च आहेत. ते आर्ट गॅलऱ्यांमध्ये लागतात, म्युझियममध्ये प्रदर्शित होतात, लिलावातबिलावात विकले जातात.. ही हल्लीच्या दृश्यकलेची ‘बाह्य़ लक्षणं’ या फोटोंना लागू पडतातच, शिवाय ‘कलेच्या अर्वाचीन इतिहासात अभिव्यक्तीचे आणि आशयाचे जे मार्ग चोखाळून झाले आहेत, त्यापेक्षा निराळी वाट शोधून दृश्य आशयाची अभिव्यक्ती करणं’ ही समकालीन कलेची पूर्वअटदेखील हे फोटो पूर्ण करतात. ‘कलावंतांनी अशी प्रतिमानिर्मिती करावी की, ज्या प्रतिमांच्या आधारे आजच्या मानवी वास्तवातल्या मुद्दय़ांची चर्चा करता येईल’ ही समकालीन कलेचे प्रेक्षक वा ‘भोक्ते’ असलेल्यांची अपेक्षाही हे फोटो पूर्णच करतात. असं बरंच.
हे शब्द कठीण वाटले असतील आणि मुळात फोटोंमध्ये काहीच कलात्मक दम नाही म्हणून कठीण कठीण शब्दांत त्यांची भलामण चाललीय असं वाटत असेल तर तुम्ही हे जाणून घ्यायलाच हवं की, सिंडी शर्मन आणि पुष्पमाला या दोघींना हे फोटो अस्सेच दिसणारे हवे होते की पाहणारे म्हणतील- ‘हँ.. हे असले फोटो पाह्य़लेत आम्ही!’
पण या पाहणाऱ्यांतले जे ‘भोक्ते’ आहेत, ते निराळा विचार करतील. तो काय ते नंतर पाहू. आधी तुम्ही काय विचार केलाहेत या फोटोंचा?
आता तुम्ही जे फोटो पाहिलेत ते ‘खरे’ होते.. आणि सिंडी वा पुष्पाचे फोटो ‘खोटे’ आहेत- ‘नाटकी’ या अर्थानं खोटे आहेत.. हे तुम्हाला (आत्ताच का होईना,) कळलंय की नाही?
पण या दोघी तेच ते करताहेत वर्षांनुर्वष. स्वत:चेच खोटेखोटे फोटो काढून घेण्याची कला. फोटोपुरतं नाटक. फोटोच्या क्षणात सामावलेला नाटय़कण. इतकी र्वष ‘तेच ते’ करूनही या दोघींनी आपापल्या परीनं वैविध्य आणलं, नावीन्यही आणलं.
पुरावा आहे ना वैविध्य आणलं, नावीन्य आणलं अशा भलामणीला- बघा ना फोटो नीट!
तरी सिंडी शर्मनचे दोन्ही फोटो एकाच मालिकेतले आहेत. ‘अनटायल्ड फिल्म स्टिल्स’. साधारण १९७०च्या दशकापासून तिनं ही मालिका सुरू केली आणि बरीच र्वष ती या एकाच मालिकेतले फोटो करत होती. हॉलीवूडच्या नायिकांचं ठोकळेबाज चित्रण ती या तिच्या स्वत:च्या ‘अनटायटल्ड फिल्म स्टिल्स’मधून उघडं पाडत होती.
याचं अनुकरणच आपल्या पुष्पमालानं केलं. जणू अभिसारिकाच भासणारी एक नर्स, या विषयावरला तिचा फोटो चीड आणतो. परिचारिकांच्या संघटनेनं पुष्पमालाच्या घरावर मोर्चा न्यावा, जागोजागच्या पोलीस ठाण्यांत पुष्पमालाविरुद्ध परिचारिकांनी तक्रारी दाखल कराव्यात, असाच हा फोटो ठरू शकला असता. तसं झालं नाही. उलट अनेक स्त्रियांनीच, ‘सगळे पुरुष नर्सेसना असंच समजतात गं’ अशी दाद पुष्पाकडे येऊन व्यक्त केली. हेच नेमकं पुष्पाला हवं होतं. पुरुषी नजरेला बाई कशी दिसते, हेच दाखवायचं होतं.
‘एन्सायक्लोपीडिया ऑफ इंडियन सिनेमा’ नावाचा एक ग्रंथ आशीष राजाध्यक्ष यांनी बंगळुरूच्या ‘सेंटर फॉर फिल्म स्टडीज’तर्फे सिद्ध केला, तो प्रसिद्धही झाला, तर या ग्रंथासाठी बराच अभ्यास नि लेखनाचं काम पुष्पमालानं केलं होतं. ती तिची सुरुवात. सिंडी शर्मनचे फोटो तोवर गाजत होते, पण आता लोकांनी याला सिंडीचं अनुकरण म्हटलं तरी चालेल, आपण भारताच्या संदर्भात हे करायलाच हवं म्हणून पुष्पानं ही मालिका केली. त्यातून ‘हंटरवाली- फिअरलेस नादिया’ या पात्राची एक कहाणीच पुष्पानं तयार केली आणि त्या नसत्या चित्रपटाची ‘स्टिल्स’ शोभतील, असे फोटो मात्र काढवून घेतले.
पुष्पा आणि सिंडी, दोघींची सुरुवात चित्रपटांतल्या प्रतिमांपासून झाली असली, तरी दोघीही ती वाट सोडून दोन निरनिराळ्या दिशांनी पुढे गेल्या. त्यापैकी सिंडीची दिशा होती ‘स्त्री प्रतिमांच्या (उपलब्ध) चित्रणाचं दर्शन’ घडवणारी, तर पुष्पाच्या कामाचं वर्णन ‘भारतीय स्त्री रूपं आणि संस्कृतीतल्या स्त्री कल्पनांची व्यामिश्रता दाखवणारे फोटो’ असं करता येईल.
हे सगळं फक्त वाचूनच कळावं, अशी अपेक्षा नाही. पाहूनच अधिक कळेल, यात शंकाच नाही.
वाचताना एक प्रश्न मात्र जरूर पडेल.. आपलेच फोटो काढून घेतलेत, म्हणजे कॅमेरा हाताळायला कुणी तरी दुसरं होतं.. तरीही ‘कलाकार’ म्हणून या दोघींची नावं कशी?
त्याचं एक व्यावहारिक उत्तर असं की, कल्पना त्यांची होती- त्यासाठीची ‘इन्व्हेस्टमेंट’सुद्धा त्यांची होती आणि बाकीचे फक्त नेमून दिलेलं काम करत होते.
दुसरं जरा विचित्र उत्तर असं की, हे फोटो त्यांचे नाहीतच .. ‘सेल्फ पोर्ट्रेट’ किंवा आत्मचित्रं आठवून पाहा- त्यांच्यात आणि या फोटोंमध्ये फरक आहे. फोटो असतील स्वत:चे, पण इतक्या वेळा स्वत:चा चेहरा (किं वा अन्य अवयव) दाखवूनही मी अमुक आहे असं या दोघींना अजिबातच सांगायचं नाहीये किंवा मी कोण आहे याचं उत्तरही शोधायचं नाहीये.
मी कोण, हा प्रश्नच त्या दोघींच्या मते इथं गौण आहे. कुणी तरी म्हणजेच मी असणार, हेच इथं ठरलेलं आहे.. आता हे कुणी तरी म्हणजे कोण, हे प्रत्येक फोटोगणिक बदलेल. त्यानुसार, कोण म्हणजे मी, हेही निरनिराळ्या वेळी निरनिराळं ठरेल.
विश्वभगिनित्व (युनिव्हर्सल सिस्टरहूड) या स्त्रीवादी संकल्पनेची ही जणू दृश्य अभिव्यक्ती होती. त्यात पुष्पानं, गुन्हेगार स्त्रियांच्या जागी स्वत:चे फोटो काढवून सामाजिक वळणाची भर घातली. केवळ स्त्रीचित्रण नव्हे, तर स्त्रीस्वभावाचंही जे काही ठोकळेबाज जनरलायझेशन (सामान्यीकरण) केलं जातं, त्याचा फेरविचार करण्याचं एक आमंत्रण पुष्पाच्या या फोटोंनी दिलं. त्या अर्थानं, मुद्दय़ांची चर्चा करण्यासाठी हे फोटो उपयोगी पडले. ते तसे ज्यांनी उपयोगी पाडले, तेच या फोटोंचे खऱ्या अर्थानं भोक्ते ठरले आणि ठरतीलही.
हे सारं का बोलतोय आपण? आपल्याला फक्त फोटोंबद्दल वा स्त्रियांबद्दल बोलायचं नाहीये- एकंदर ‘चित्रं- प्रतिमा आणि प्रतिमांचं वस्तूकरण’ याचाही विचार आपल्याला पुढेमागे करायचा आहे.
प्रतिमांच्या वस्तूकरणाचा विचार केल्याखेरीज आजकालचं कलाभान वाढणं अशक्य आहे.

Story img Loader