शिवाजी सावंत यांनी महाभारतासारख्या महाकाव्यातून कर्णाची शोकात्मिका नेमकी हेरली आणि पल्लेदार, रसाळ भाषेत ‘मृत्युंजय’ सादर केलं. या पुस्तकाचं गारूड कायम का असावं?
वयाच्या तिशीच्या आत लिहिलेल्या काही कादंबऱ्या मराठीमध्ये माइलस्टोन मानल्या जातात. शिवाजी सावंतांची ‘मृत्युंजय’, भालचंद्र नेमाडय़ांची ‘कोसला’, व्यंकटेश माडगूळकरांची ‘बनगरवाडी’ या तिन्ही कादंबऱ्या या लेखकांनी वयाच्या अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी लिहिलेल्या आहेत. पण या तिन्हींमध्ये विक्री, खप आणि प्रभाव याबाबत सावंतांची ‘मृत्युंजय’ अधिक सुदैवी ठरत आली आहे. अजून पाच वर्षांनी या कादंबरीचा सुवर्णमहोत्सव साजरा होईल, पण त्याआधीच ती पुन्हा चर्चेत आली आहे. या कादंबरीने नुकताच कोर्टातला सामना जिंकला असून आता ती नव्या रूपात आणखी काही वाचक-प्रदेश पादाक्रांत करायला सज्ज झाली आहे. गेल्या वर्षी पुण्याच्या मेहता पब्लिशिंग हाऊसने व्यंकटेश माडगूळकरांच्या सर्व पुस्तकांचे हक्क विकत घेतले, तेव्हा मराठी प्रकाशन व्यवहारामध्ये बरीच खळबळ उडाली होती. काहींनी छन्न-प्रच्छन्न टीकाही केली होती. पण मेहतांनी माडगूळकरांची सर्व पुस्तके नव्या दिमाखात बाजारात आणली आणि लगोलग शिवाजी सावंत यांच्या ‘मृत्युंजय’, ‘छावा’, ‘युगंधर’ या कादंबऱ्यांचेही हक्क विकत घेण्याची तयारी दाखवली. त्याला सावंतांचे सध्याचे प्रकाशक कॉन्टिनेन्टलने हरकत घेऊन मेहतांना कोर्टात खेचण्याचा प्रयत्न केला. त्याचा निकाल नुकताच अपेक्षेनुसार मेहतांच्या बाजूने लागला आहे. आता सावंतांच्या तिन्ही लोकप्रिय कादंबऱ्या नव्याने उपलब्ध होतील. त्याची सुरुवात ‘मृत्युंजय’पासून होत आहे. १९६७ साली प्रकाशित झालेल्या या कादंबरीने सावंतांना ‘मृत्युंजयकार’ अशी उपाधी मिळाली. आतापर्यंत या कादंबरीच्या २७ आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. शिवाय तिचे हिंदी, कन्नड, इंग्रजी, गुजराती, मल्याळम् अशा नऊ भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. अलीकडच्या चार-पाच वर्षांच्या काळात या कादंबरीच्या पायरेटेड प्रतीही पुण्या-मुंबईत राजरोस मिळू लागल्या. त्यांनाही वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या पायरेटेड प्रतींची किती विक्री झाली, याची अधिकृत आकडेवारी मिळण्याची सोय नाही. पण या सर्वाचा विचार केला तर पन्नास लाख वाचकांनी ही कादंबरी आत्तापर्यंत वाचली आहे, असे अनुमान काढता येते. १९९० साली कोलकात्यातील ‘रायटर्स वर्कशॉप’ या प्रख्यात प्रकाशन संस्थेचे संस्थापक-संचालक पी. लाल यांनी ‘मृत्युंजय’ची नोबेल पुरस्कारासाठी शिफारस केली होती. जगातल्या या सर्वोच्च सन्मानाच्या दारावर दस्तक देणारी ही मराठीतली पहिलीच कादंबरी. या सर्वाचा इत्यर्थ असा आहे की, गेली ४५ र्वष ‘मृत्युंजय’ वाचकांवर गारूड करून आहे.
‘मृत्युंजय’च्या लोकप्रियतेचे रहस्य सांगताना सावंत नेहमी एक विधान करायचे, ते असे- ‘रामायण जीवन कसे असावे हे सांगते, तर महाभारत जीवन कसे आहे हे सांगते.’ मानवी जीवनातल्या कमालीच्या गुंतागुंतीच्या आणि अनाकलनीय वाटणाऱ्या वाटा-वळणांचे यथार्थदर्शन महाभारतातून होते. महाभारतातला कुठला ना कुठला प्रसंग कोणत्याही माणसाला स्वत:च्या आयुष्याशी जोडता येतोच येतो. त्यामुळे रामायण थोडय़ा नवथर, भाबडय़ा वा ध्येयवादी लोकांना आवडते, तर महाभारत हे जगण्याचा पुरेसा अनुभव घेतलेल्या कुणालाही आपलेसे वाटते. रामायणाला कुणी विराट म्हणत नाही, ते भाग्य महाभारताच्याच वाटय़ाला शतकानुशतके आलेले आहे, ते त्यामुळेच. ‘मृत्युंजय’ ही उघडपणेच महाभारतावर आधारित कादंबरी आहे.
सर्जनशील साहित्य नवी नैतिकता सांगत नाही, तर ते समाजात रूढ वा मान्य असलेल्या नैतिकतेच्या गोष्टींची जोडाजोड, तोडमोड करून तयार होते. महाभारत नेमके तसे आहे. कटकारस्थाने, हेवेदावे, रागलोभ, सत्ताकांक्षा, मानापमान, प्रेम-द्वेष, अहंकार, स्खलनशीलता, अवहेलना, कुचंबणा, पराक्रम, त्याग, सचोटी, प्रामाणिकपणा, शालीनता अशी सगळी मानवी मूल्ये महाभारतात पाहायला मिळतात.
शिवाय माणसांना सुखात्मिकेपेक्षा शोकात्मिका जास्त आवडतात, आपल्याशा वाटतात. हे जागतिक साहित्यातल्या अभिजात म्हणवल्या जाणाऱ्या कादंबऱ्यांची नावे पाहिल्यावर सहज लक्षात येते. अशा कादंबऱ्यांच्या नायकाकडे श्रेष्ठ दर्जाची गुणवत्ता असावी लागते, पण त्याचे योग्य श्रेय त्याला उपभोगता येत नाही. त्याच्या वाटय़ाला सतत दुर्दैव यावे लागते. अशा नायकाचा शेवट अकाली वा दु:खदरीत्या व्हावा लागतो. त्यामागे कपट-कारस्थाने, धोका, दबाव असेल तर आणखीच उत्तम. महाभारतातला कर्ण नेमका तसा आहे. (भीष्म, अश्वत्थामा, अभिमन्यूही काही प्रमाणात तसेच आहेत.) कर्णाच्या वाटय़ाला जन्मापासूनच अवहेलना आली. कुंतीपुत्र असूनही चाकरी करावी लागली. श्रेष्ठ असूनही दुय्यमत्व पत्करावे लागले..आणि अंगी शौर्य असूनही केवळ शापामुळे मरण पत्करावे लागले. म्हणजे उच्च कोटीच्या शोकात्म नायकाची सारी लक्षणे कर्णाच्या चरित्रात सापडतात. त्यामुळे कर्णासारखे वीर पुरुष जेव्हा कादंबऱ्यांचे नायक होतात, त्यातही सावंतांसारखे जादुई शब्दकळेच्या लेखकाचे नायक होतात, तेव्हा ते आणखीनच धीरोदात्त, भव्य होतात. सर्जनशील साहित्यात नेहमीच प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट केल्या जातात. ‘मृत्युंजय’मध्ये कर्णाचेही तसेच होते. बरे, हा कर्ण होमरच्या ‘ओडिशी’तला नाही की, दान्तेच्या ‘डिव्हाइन कॉमेडी’तला नाही. तर तो आपल्या संस्कृतीचा अपरिहार्य भाग असलेल्या, आपल्या पूर्वजांच्या कैक पिढय़ांना मुखोद्गत असलेल्या महाभारतातला आहे. हा ऋणानुबंधही ‘मृत्युंजय’ला दशांगुळे वर उचलतो.
अतिशय पल्लेदार, रसाळ आणि ओघवती भाषा हे शिवाजी सावंतांच्या लेखणीचे वैशिष्टय़. भरजरी, दिपवून टाकणाऱ्या उपमा-अलंकारांची लयबद्ध पखरण हा प्रधान शैलीविशेष. त्यामुळे त्यांची भाषा सामान्य वाचकाला बेमालूमपणे संमोहित करते. ‘मृत्युंजय’ मध्ये तर ते खूपच होते. खरे तर ही कादंबरी, त्यात सावंतांसारखा शब्दप्रभू तिचा निर्माता. त्यामुळे त्यात तथ्यांची मोडतोड जरा जास्तच आहे. पण प्रेम शास्त्रकाटय़ाच्या तराजूत तोलायची गोष्ट नसते. ‘मृत्युंजय’वरच्या वाचकांच्या प्रेमाचेही तसेच आहे. त्याला सत्याची, तथ्याची, साक्षेपाची चाड नाही. विवेकाची भीडमुर्वत नाही. तो आपला ‘मृत्युंजय’वर लुब्ध आहे. या लुब्धतेला विश्रब्धतेची जोड आणि साक्षेपाचा आधार कधी मिळेल, हे सांगता येत नाही. महाभारतातील प्रत्येक पात्रांशी सावंतांचा ऋणानुबंध जडला होता, तसाच वाचकांचाही सावंतांच्या ‘मृत्युंजय’शीही जडला आहे, जडलेलाच राहील. कारण जगण्याचे महाभारत सतत चालूच असते आणि रणांगणात उभ्या असलेल्या मर्त्य मानवांपुढे सत्य, न्याय, विवेक, बुद्धिवाद या गोष्टी कोवळ्याच ठरतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा